Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
४७ एकाच वैदिकभाषेत व्यावर्तक व समावर्तक अशी दोन प्रकारची सर्वनामे का असावी व आत्मनेपदी धातू व परस्मैपदी धातू असे धातूंचे दोन वर्ग का असावेत, या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, वैदिक समाज हा दोन पूर्ववैदिकसमाजाचे एकीकरण होऊन बनलेला मिश्र समाज होता. एका पूर्ववैदिकसमाजात फक्त आत्मनायक सर्वनामे असत व अर्थात आत्मनायक धातू असत. दुसऱ्या पूर्ववैदिकसमाजात फक्त परस्मायक सर्वनामे असत व अर्थात परस्मायक धातू असत. दोन्ही समाजाचे एकीकरण झाल्यावर मिश्र जी वैदिकभाषातीत दोन्ही प्रकारचे प्रयोग सहजच दिसू लागले व मिश्रभाषेला एक प्रकारचा विचित्रपणा आला. हा विचित्रपणा मिश्र समाजाच्या ध्यानात येऊन व उठल्या-बसल्या आत्मने आणि परस्मै रूपातील तारतम्याला जपत बसण्याचा वीट आल्यामुळे, पुढेपुढे दोन्ही रूपांचा उपयोग सरमिसळ एकाच अर्थाने होऊ लागला. परंतु, पाणिनीच्या काळापर्यत हा भेद भाषेत तीव्रतेने जागृत होता. कर्तरी प्रयोगात आत्मने व परस्मै हे तारतम्य पहाण्यात पुढेपुढे यद्यपि टंगळ-मंगळ होऊ लागली, तत्रापि आत्मनेचा अद्वितीय मान कर्मणी प्रयोगात जसाचा तसा कायम राहिला. क्रियाफल सदाच कर्तृगामी असल्यामुळे कर्मणीत परस्मैपद नाही. पाणिनीच्या काळी आस्मने व परस्मै हा भेद यद्यपि तीव्रतेने जागृत होता, तत्रापि पाणिनीच्या काळीसुद्धा लोक आत्मने व परस्मै यांची भेसळ मन मानेल तशी विकल्पाने करीत. यांची साक्ष खुद्द पाणिनीचीच देता येते. विभाषोपपदेन प्रतीयमाने, हे सूत्र पाणिनीने एवढ्याच करता रचले आहे. यजते म्हणजे स्वत: यज्ञ करतो. यजति म्हणजे दुसऱ्या करिता यज्ञ करितो. परंतु स्वयं हे उपपद जर वाक्यात घातले तर, यजते म्हणजे स्वत: करिता यज्ञ करतो याअर्थी स्वयं यजति असा परस्मायक प्रयोग पाणिनीच्या काळीही केला असता चालत असे. तात्पर्य, आत्मने आणि परस्मै हा भेद पाणिनीच्या काळीही किंचित मोडला जात असे, अशी जरी स्थिती होती, तत्रापि आत्मनेपदी रूपे टिकाव धरून पुष्कळ काळ राहिली. याची साक्ष वर्तमान मराठी भाषा देते. ज्ञानेश्वरीत करी हे परस्मै व उपकरे हे आत्मने रूप येते. वर्तमान मराठीत जेवे हे आत्मने व जेवी हे परस्मै रूप सध्याही आपण योजतो. एकंदरीत वांशिक स्वभाव जाता जात नाहीत व व्यसने सुटता सुटत नाहीत हेच खरे. कर्तृगामी क्रियाफल असते तेव्हा मराठीत मरे असे रूप होते आणि कर्त्रितरगामी जेव्हा क्रियाफल असते तेव्हा मारी असे रूप होते. ए आत्मनेची खूण आहे व ई परस्मैची खूण आहे.