Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

४६. अशी उतरती कळा आदिलशाहीला लागली असता, अल्ली हे भाबडे पोर मसनदीवर आले. त्याला खाऊन टाकण्याला चार नक्र टपून बसले होते. पहिला नक्र शिवाजी, दुसरा नक्र शहाजी, तिसरा नक्र औरंगजेब व चौथा नक्र त्याचे अमीर उमराव. ह्या चार नक्रातून, पहिली कुरापत औरंगजेबाने काढिली. ही औलाद महमदशहाची नव्हे, असा आरोप बिचा-या अल्लीवर औरंगने आणिला. अल्लीशहा औलाद असो, अफलाद असो की नक्कल असो, त्याच्यामुळे औरंगचे कोणते गोत्र बिघडत होते ते देव जाणे! हा आरोप अल्लीच्या कारभा-यांनी साहजिकच नाकबूल केला. एवढे कारण लढाई पुकारण्याला औरंगजेबासारख्या बीलझिबबला बस झाले. दुसरे सैतान शिवाजी. त्या कज्जेदलालाला हे भांडण निघालेले पाहून केवळ हर्षवायू झाला. नवरा मरो, नवरी चुलीत जावो, दोहीकडून अवदान मारण्यास सवकलेल्या ह्या बुभुक्षिताने दोन्हीकडून आपला डाव साधण्याचा बेत केला. अल्लीशहालाही मदत करण्याचे अभिवचन दिले व औरंगजेबाचाही पक्ष उचलला. खबरदारी मात्र अशी ठेविली की, एकाची बातमी दुस-यास न कळे. तिसरे बुढ्ढे मिया शहाजी. ह्या वृद्ध कपीनी, आपण कशातच नाही म्हणून कानावर हात ठेविले. आपले बंगळूर बरे की आपण बरे. शहाजी म्हणजे आज साठ सत्तर हजार प्याद्याचा व घोड्याचा मालक. तो जर अल्लीशहास मिळता तर औरंगजेबासारख्या टारग्याची बिचा-या अल्लीशहाला बडविण्याची काय माय व्याली होती? पण ह्यावेळी कर्नाटक सुरक्षित ठेविले पाहिजे व तेथून आपल्याला हलता येत नाही, असा बहाणा ह्या म्हाता-याने केला आणि तेही खरेच. औरंगजेबाने कर्नाटकातील संस्थानिकांना चिथवून त्यांच्याकडून बंडाळी खरीच माजविली होती. चौथी भुते अल्लीशहाचे अमीर उमराव. ह्यांची तर सर्वांवर कडी. खाल्ल्या घरचे वासे जाळणारे हे शहाणे आपल्या धन्याशी हरामपणा करून, बाहेरच्या चोराला जाऊन मिळाले. अशी सारी वेताळसभा भाबड्या अल्लीशहाच्या भोवती कोलिते घेऊन नाचू लागली असता, औरंगजेबाने बेदर शक १५७९ च्या आषाढ शुद्ध तृतीयेस एका खटक्यासरसे हाटले. नंतर कल्याणीही झपाटली. औरंगजेबाने ही बडी शिकार मारिली, तर शिवाजीने तर त्याच्याही वरताण केली. औरंगजेबाला दिलेल्या वचनाला जागून, औरंगजेबाने बेदर घेण्याच्या अगोदर एक महिना म्हणजे १५७९ च्या वैशाखात आदिलशहाचे जुन्नर लुटून शिवाजी पहिला पंत झाला आणि एवढ्याने औरंगजेब कदाचित खूष होणार नाही म्हणून त्याच वर्षाच्या आश्विन वद्य द्वादशीस कल्याणभिवंडी हबकून आदिलशहाचा कोंकणातील राज्यभार त्याने हलका केला. औरंगजेबाला दिलेले अभिवचन अक्षरश: पाळीत असता, अल्लीशहाशी केलेला करार शिवाजी विसरला नाही. अल्ली आदिलशहाच्या मर्जीखातर शिवाजीने औरंगजेबाच्या अहमदनगर प्रांतातील गावे व खेडी लुटून खुद्द अहमदनगरास नसीरखानाशी ऊर्फ नौसिरखानाशी दोन हात करून ते शहर लुटिले. येणेप्रमाणे दोन्ही पक्षांना रिझविण्याच्या कामगिरीत शिवाजी गुंतला असताना, शहाजीनेही ह्या नाटकाला रंग आणिला. जदुनाथ सरकार देखील म्हणतात, Shahaji Bhonsla disobeyed his new master and set up for himselfhimself. अल्ली आदिलशहा औरंगजेबाने व शिवाजीने असा नागविलेला पाहून शहाजीनेही त्याच्या नाकाडावर ठोसा चढवून दिला आणि कर्नाटकातील त्याच्या इस्टेटीचा ताबा घेतला. नाटक असेच काही वर्षे रंगत रहावे व त्यात आपल्याला मनाजोगती सोंगे घेता यावी, अशी शहाजी व शिवाजी यांची इच्छा होती. परंतु, दायशुकोहची माशी शिंकून लढाई एकदम बंद झाली व तह झाला. त्याने शहाजी व शिवाजी यांना आपल्या बेतांना निराळे स्वरूप द्यावे लागले. तहाने बेदर, कल्याणी, परंडा, निजामशाही कोंकण व वांगी महाल इतक्या प्रांताला आदिलशाही मुकली. पैकी निजामशाही कोंकण शिवाजी दाबून बसलाच होता. आता विजापूर प्रांतापासून म्हैसूरच्या उत्तरेकडील तुंगभद्रेपर्यंतचा प्रांत तेवढा आदिलशहाच्या ताब्यात मोंगलांचा मांडलिक म्हणून राहिला. तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील प्रांत शहाजीने कायमचा बळकाविला होताच. महमदशहा मेल्यानंतर फक्त एका वर्षात, त्याच्या दिखाऊ ऐश्वर्याचे भांडवल फुटून, आदिलशाही दौर्बल्य अगदी उघडकीस आले.