Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
४७. तह झाल्यावर औरंगजेब मसनद मिळविण्याकरिता जो एकदा नर्मदेच्या उत्तरेस गेला तो वीस पंचवीस वर्षे तिकडेच गुंतला. तहानंतर परिस्थिती बदलली म्हणून शिवाजीने आदिलशाहीचे लचके तोडण्याचा आपला नित्याचा उद्योग तसाच चालू ठेविला आणि शहाजी सुखासमाधानाने कर्नाटकात राज्याराम करू लागला. शक १५८० त श्रीशैलमल्लिकार्जुनप्रांती शहाजीने एकोजीराजास मोहिमेवर पाठविले. एकोजीच्या अंगी संभाजीचे पाणी नव्हते. तो स्वभावाने किंचित मृदू असून बराच संथ असे. त्याने बापाच्या दरा-यावर तो प्रांत काबीज केला. जयरामकवी ह्या मोहिमेत एकोजीबरोबर होता. ह्या वेळचे शहाजीचे वर्णन करताना जयराम लिहितो की, कधी डोंगराळ प्रांतातील संस्थानिकावर लहानसहान मोहिमा करण्यात, कधी अरण्यात शिकार खेळण्यात व कधी विद्वान लोकांशी व विश्वासातील मुत्सद्यांशी सुखसकथा करण्यात त्याचा वेळ जाई. १५८० त शहाजीची उमर साठीच्या पलीकडे गेली असून, त्याच्या आयुष्याची इतिकर्तव्यता बहुतेक संपल्यासारखी झाली होती, स्वतंत्र राज्य करण्याचा फार दिवसांचा त्याचा हेतू सफल झाला होता आणि हरीहरी म्हणत ईश्वरचिंतनात राहिलेले आयुष्य घालविण्याची सोय त्याने कमवून ठेविली होती. गेल्या साठ वर्षांतील आपल्यावर आलेले प्रसंग, आपण केलेल्या स्वा-या व मोहिमा, आपण लढविलेल्या युक्त्या व डावपेच, तत्कालीन राजपुरुष, मुत्सद्दी व योद्धे इत्यादीच्या कर्तबगा-या व गुणदोष वगैरेंची इत्यंभूत वर्णने करण्यात त्याला सौख्य वाटे. तत्रापि राज्यकारभाराकडे त्याचे दुर्लक्ष नसे. स्वारीशिकारीचा प्रसंग आल्यास त्यावर तो स्वत: जाई. जन्मल्यापासून गेल्या साठ पासष्ठ वर्षांत त्याला फुरसत व विश्रांती अशी फक्त दोनदा सापडली. १५७१ त महमदशहाने विजापूरास ओलीस ठेवून घेतले तेव्हा बळजबरीची आणि आता येणारी ही आपखुषीची. शक १५८०, १५८१ व १५८२ ही तीन साले त्याची प्राय: स्वस्थतेची व आरामाची गेली. ह्या अवधीत शिवाजीने जे अद्भुत चमत्कार केले ते लक्ष लावून पहाण्यात तो गुंग असे. प्रसंगी सल्ला द्यावासा वाटल्यास तो शिवाजीकडे आपल्या दरबारातील मुत्सद्दीही पाठवी. शक १५७५ त मोरो त्रिमळ पिंगळे यास त्या वर्षीच्या घडामोडीत कोणते धोरण ठेवावे ते सांगून त्याने पाठविले होते. असाच एक प्रसंग शक १५८३ त उद्भवला. त्या साली चैत्रात शहाजी आरणी, पोर्टो नोव्हो वगैरे प्रांतावरील स्वारीत गुंतला होता. त्यावेळी त्याला अशी बातमी लागली की, औरंगजेब गृहकलहातून नुकताच मोकळा झाला आहे व बंगालच्या सुभेदारीवर असलेला उपद्व्यापी मीर जुमला आदिलशाही व कुतुबशाही खालसा करण्याचा आग्रह त्याला करीत आहे. शक १५७९ त ही दोन राज्ये औरंगजेबाला खालसा करता आली नव्हती. त्याचे वरकरणी कारण मुसलमान इतिहासकार असे देतात की, शहाजहान व दारा शुकोह औरंगजेबाच्या आड आले.