Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
आदिलशाही प्रांताच्या आश्रयाने हुलकावण्या दाखवीत दाखवीत शहाजीने शहाजहानाच्या सरदारांना दौड करावयाला लावून सडकून घुमविले व दमविले. तेव्हा शहाजहानाने तो सैतानी हुतूतू सोडून देऊन परत येण्यास आपल्या सरदारास फर्माविले व आपल्या सैन्याची अब्रू कशीतरी त्या वेळेपुरती बचाविली आणि शहाजीचा पाठराख्या जो आदिलशहा त्याला आपल्या बाजूला ओढून घेण्याच्या हेतूने त्याच्याशी तहाचे बोलणे लाविले. आदिलशहाच्या घरात सर्वत्र बजबजपुरी माजली असून, लढाईचे अवसान त्याच्या ठायी बेताचेच होते. शहाजीची पाठराखणी तो आपण होऊन बिलकूल करीत नव्हता, सहजगत्या आदिलशाही प्रांताच्या बाजूने शहाजी पाठ करून लढत होता, इतकाच अर्थ. सबब, शहाजी जाणे आणि लढाई जाणे, आपण ह्या दंगलीतून सुरक्षित निसटून जावे, म्हणून आदिलशहाने शहाजहानाचे तहाचे बोलणे मान्य केले. त्यातून विशेष काही जखम न होता, निजामशाही प्रांतातील वाटणी आपल्याला शहाजहान देतो हे ऐकून तर आदिलशहाच्या मान्यतेला उत्सुकतेचे कोंब फुटले. दोन्ही शहांध्ये शक १५५७ च्या वैशाखात तह ठरला. त्यात प्रस्तुत प्रकरणाला मुद्याचे असे एकच कलम होते. ते हे की, शहाजी आपल्या ताब्यातील सर्व प्रांत व किल्ले मोंगलांच्या हवाली करी तोपर्यंत आदिलशहाने त्यास कोणत्याही प्रकारची मदत करू नये व आपल्या प्रांतात येऊ देऊ नये. ह्या प्रकरणी, दुर्बल आदिलशहाचे सामर्थ्य अजमाविण्यात शहाजहानाने दाखविलेल्या मूर्खपणाची इयत्ता जास्त किंवा शहाजहानाची घाबरपट्टी न ओळखणा-या बालिश आदिलशहाच्या मंदबुद्धीची इयत्ता जास्त, या बाबीचा निर्णय करीत बसण्यात हाशील नाही. महमदशहा तह न करता लढाई चालवून मोंगलांचे सैन्य गुंतवता तर शहाजीने मोंगलांच्या सैन्याला पिंगा घालावयाला लावून धुळीस मिळविले असते आणि निजामशाही व आदिलशाही यांचा जवळ येत चाललेला मृत्यू टळला असता. ही दूरदृष्टी बालिश महमदशहाला व त्याच्या मुत्सद्यांना नसल्यामुळे त्यांनी तहाची फुकट फळे चाखण्यात सौख्य मानिले. आपल्या प्रांतात या किंवा नका येऊ, हे शहाजीला सांगण्याची प्राज्ञा महमदशहाची नव्हती व मोंगली सैन्य तेथून परतल्यावर त्या प्रांती राहण्याची शहाजीलाही आवश्यकता नव्हती; सबब तहानंतर शहाजी उत्तरेकडे पुणे प्रांती, बरसात येत चाललेली पाहून शक १५५८ च्या वैशाखात निघून गेला व स्वत:च्या एकट्याच्या हिमतीवर मोंगलाला हात दाखविण्याच्या तयारीस लागला. बरसातीत मावळात, घाटमाथ्यावर व तळकोंकणात लढणे प्राय: धोक्याचे असते. परंतु शहाजीसारखा शूर, युद्धकुशल, चलाख व मसलती माणूस बरसातीच्या चार नव्हे सहा महिन्यात काय काय नवीन व्यूह रचील याची भीती पडून, शहाजहानाने आपल्या सरदारास लढाई पावसाळ्यातही ज्यारीने चालविण्याचा हुकूम केला आणि आपण स्वत: आग्र्यास शक १५५८ च्या आषाढात मोहीम खलास करता आली नाही म्हणून मनातल्या मनात विषाद मानीत चालता झाला.