Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
९३. उत्तरहिंदुस्थानातील तत्कालीन उच्चक्षत्रियांहून व उच्च अशोकादि राज्यकर्त्या वृषलांहून सुधारणेच्या बऱ्याच खालच्या पायरीवर असलेल्या ह्या माहाराष्ट्रिक गणांची बौध्दक्रांतिकाली अशी ही सामाजिक, राजकीय व भाषिक हालहवाल होती. दक्षिणेत वसाहती करून राहिल्यावर ह्यांच्या सामाजिक, राजकीय व भाषिक स्थितीत काय फेरबदल झाले त्याचे आता वर्णन करावयाचे. पैकी राजकीय स्थिती प्रथम घेऊ. आपापल्या गणा पूर्ती लहानशी गणराज्ये चालविण्याइतकीच ऐपत असल्यामुळे, ह्यांच्याहून वरिष्ठ दर्जाच्या राज्यपध्दती ज्यांच्या आंगवळणी पडल्या होत्या अशा उत्तरेकडील व पूर्वेकडील जास्त सुधारलेल्या लोकांच्या अंमलाखाली ह्या लोकांनी शकपूर्व १००पासून शकोत्तर १५५१ पर्यंत म्हणजे सोळाशे वर्षे रखडावे लागले. कनिष्ठ संस्कृतीच्या लोकांना वरिष्ठ संस्कृतीच्या लोकांच्या अंमलाखाली असेच रखडावे लागते. प्रथम ह्या गणराजांवर अशोकादिमौर्यांचा अंमल बसावयाचा. परंतु, इतरत्र अडचणी आल्यामुळे, मौर्यांना ह्यांच्या प्रांतांकडे लक्ष्य देण्यास सवड झाली नाही. ती सवड आंध्रदेशातील आंध्रभृत्यांना झाली. शकपूर्व १५० पासून शकोत्तर १५० पर्यंत ह्यांच्या वर आंध्रभृत्यांनी राज्य केले. नंतर दोन अडीचशे वर्षे म्हणजे शक १५० पासून शक ४०० पर्यंत देशात अधिराज्य असे कोणाचेच नव्हते. ह्या अनधिराजक कालानंतर शक ४०० पासून शक ६७५ पर्यंत चालुक्यांनी माहाराष्ट्रिकांवर अधिराज्य केले. त्यापुढे शक ६७५ पासून शक ८९५ पर्यंतच्या कालात माहाराष्ट्रिक राष्ट्रकूटांची सेवा करून होते. तदनंतर शक ८९५ पासून शक ११११ पर्यंत पुन: चालुक्यांचा ग्रह माहाराष्ट्रिकांच्या राशीस बसला. चालुक्यांचा ग्रह शक ११११ त सुटल्यावर शक १२४० पर्यंत यादवांची मगरमिठी माहाराष्ट्रिकांच्या पाठुंगळीस चिकटली. यादवांच्या मगरमिठीतून शक १२४० त मुक्त झाल्यावर नंतर मुसलमानांनी माहाराष्ट्रिकांवर जी स्वारी चढविली ती शहाजी राजे भोसले यांच्या हालचाली सुरू होत तोपर्यंत म्हणजे सुमार शक १५५१ पर्यंत चळली नाही. एणेप्रमाणे तब्बल सोळाशे वर्षे माहाराष्ट्रिक लोक परक्यांच्या अंमलाखाली होते. आंध्रभृत्य, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव इत्यादी महाराष्ट्रावरील राज्यकर्त्यांना परकीय म्हटलेले पाहून वाचकांना आश्चर्य वाटेल. परंतु, वस्तुथितीच तशी आहे. आंध्रभृत्य ऊर्फ शातवाहन हे माहाराष्ट्रिक लोकांहून अगदी भिन्न लोक होते. नाणेघाटातील भित्तिचित्रांत आंध्रभृत्य राजे महारठिगनकयिरोला आपल्याहून निराळया वंशातला म्हणून स्वच्छ लिहून ठेवतात. आंध्रभृत्य आणि माहाराष्ट्रिक हे जर एकाच वंशातील असते, तर महारठिणगाचा त्यांनी स्वतंत्र निर्देश केला नसता. आंध्रभृत्य ऊर्फ शातवाहन हे जर माहाराष्ट्रिक नव्हतं, तर ते कोण व कोठचे लोक होते ह्या बाबीचा निर्णय करणे अगत्याचे आहे.