Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
मालोजी शक १४७२ त जन्मला. बाबजीचे वय त्या वेळी सतरा वर्षांचे होते. लग्न बालपणी व्हावयाचे म्हणजे बापाची किंचित घरची बरी स्थिती असावी. पाटस, फलटण, बारामती व सुपे हे प्रांत जवळजवळ असल्यामुळे बाबजी निंबाळकराने फलटणच्या निंबाळकराशी सोयरिक करावी, हे साहजिक आहे. निंबाळकर मवाशी करून होते. तेव्हा त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने सोयरिक करणारा बाबजीही मवासपण करून असावा. नगरच्या व विजापूरच्या मुसलमानी अंमलात त्या काळी बहुतेक मराठे देशावर व कोकणात मवाशी करून असत. राज्ययंत्र असावे तितके सुयंत्र मुसुलमानी अंमलात तितपतच होते. तत्कालीन मराठ्यांच्या कुळकटात मारामा-या व दंगेधोपे यांचीच वर्णने आढळतात. मालोजी वयात आल्यावर मवासपणाची कवाईत बापापाशी व सास-यापाशी सहजच शिकला. पुढे वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी तो शिलेदार झाला (शक १४९९). ह्या वेळी मूर्तिजा निजामशहा नगरास राज्य करीत होता. शक १४९९ पासून शक १५१० पर्यंतची अकरा वर्षे शिपाईगिरी व शिल्लेदारी करीत करीत मालोजी पाच हजार घोड्यांचा मालक बनला. शक १५१० साली महमद कुली कुतुबशहाची बहीण मलिकाजहान इजशी इभ्राई आदिलशहाचे लग्न होण्याचे ठरले, त्याच्या आड मूर्तिजा निजामशाहा आला. मूर्तिजा निजामशहा ह्या वेळी राज्यकारभार वजिरावर सोपवून आवश्याच्या किल्ल्यावर ईश्वरचिंतन करीत रहात असे. तैनातीस मालोजीराजे भोसले यास ठेविले होते. मूर्तिजा निजामशहा इभ्राई आदिलशहाच्या लग्नाच्या आड गेला, सबब विजापूरचा सरदार दिलावरखान आवश्याच्या किल्ल्यावर चाल करून आला. त्याला मालोजीराजाने मोठ्या सफाईने हटवून मूर्तिजा निजामशहाचा बचाव केला. आवश्याच्या लढाईत मालोजीने दाखविलेल्या ह्या कर्तबगारीचा उल्लेख बृहदीश्वरशिलालेखकर्त्याने केला आहे. त्यात आवश्याच्या लढाईचा उल्लेख करून, मालोजीराजे ह्यापूर्वी बहुत युद्धात जय पावले होते, असे तो शिलालेखकार लिहितो. याचा अर्थ असा की, शक १४९९ पासून शक १५१० पर्यंतच्या काळातील अकरा बारा वर्षांच्या अवधीत मालोजीने निजामशाहाच्या वतीने अनेक मोहिमात पराक्रम करून आवश्याच्या युद्धप्रसंगी तर त्याने निजामशाहाचे प्राण वाचविले. आवश्याच्या लढाईनंतर मालोजीची साख इतकी वाढली की, पुढे शक १५१४ त इभ्राई आदिलशहाला सोडून नगरास आलेल्या दिलावरखानाच्या सल्ल्यावरून बु-हाण निजामशहाने जेव्हा मंगळवेढ्यापर्यंत आदिलशाही मुलुख जाळून पोळून उद्ध्वस्त केला तेव्हा त्याही मोहिमेत मालोजीने मोठा पराक्रम केला. ह्या पराक्रमाचा उल्लेख बृहदीश्वरशिलालेखकर्त्याने केला आहे. नंतर शक १५१५ त इभ्राइम आदिलशहाच्या इस्माएल नामक भावाने कोल्हापूर, बेळगाव प्रांती बंड करून बु-हाण निजामशाहाची मदत मागितली. त्या मदतीच्या सैन्यात सामील होऊन मालोजी भोसल्याने कोल्हापूर प्रांती आदिलशाही फौजेला बहुत त्रास दिला. ह्याच शक १५१५ साली मालोजीस भूमिगत द्रव्य सापडले व जगदंबेचा साक्षात्कार होऊन राज्यप्राप्तीचा वर मिळाला. ऐतिहासिकदृष्ट्या या वराचा अर्थ असा दिसतो की, महाराष्ट्र राज्य स्थापन करावे, अशी महत्वाकांक्षा ह्या वेळी मालोजीच्या मनात अत्यंत अंधुक अशी उद्भवली. शक १५१६ त मालोजीला वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी शहाजीनामे पुत्र झाला. शक १५२० त मोंगलाकडील म्हणजे अकबराकडील शीर ख्वाजा या सरदाराचा बीडच्या लढाईत बेइज्जत पराभव निजामशाही सरदारांनी केल्यावर त्या वर्षीच्या फाल्गुनातील रंगपंचमीचा उत्सव जाधवराव, भोसले वगैरे सरदारांनी मोठ्या थाटाने साजरा केला. त्या उत्सवात चार वर्षांच्या शहाजीस आपली तीन वर्षांची मुलगी जिजाऊ जाधवरावाने दिली असे विनोदाने वाक्य उच्चारिले. त्या विनोदी भाषणाचा वाच्यार्थ घेऊन मालोजी जाधवरावांशीं शरीरसंबंधाच्या गोष्टी बोलू लागला. ते म्हणणे अर्थातच जाधवरावाने मान्य केले नाही. त्यासरशी रागाच्या व अभिमानाच्या सपाट्यात मालोजीने शहाजीचे पहिले लग्न मोहित्यांची कन्या उमाबाई इजशी लाविले (बृहदीश्वरशिलालेख). ईर्ष्या वाढून भोसले व जाधव यांच्यात द्वंद्वयुद्धे होऊ लागली. ह्या सुमारास निजामशहाची व मोंगलांची युद्धे नांदेड, बीड वगैरे गंगथड प्रांतात चालू असून, निजामशहाचे ठाणे अवश्यास जुन्नरास व परिंड्यास हलते होते.