Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
(२९) कृष्णभट्ट विदुषक : हा एकोजीराजाच्या पदरचा विदूषक ऊर्फ खुषमस्क-या. विदूषक ऊर्फ खुषमस्क-ये बाळगण्याचा परिपाठ आपल्या ह्या देशात फार प्राचीन आहे. पेशवे व पेशव्यांचे सरदार यांजवळ खुषमस्करे असत. दक्षिणेतील काही सरदारांच्या येथील काही खुषमस्क-ये मी पाहिलेले आहेत. खुषमस्क-या म्हटला म्हणजे तो वाकड्या तिकड्या अंगाचा व अवयवांचा, ठेंगू, औपरोधिक थट्टा करण्यात- परंतु खरा अर्थ धन्याच्या मनात भरवून देण्यात - निष्णात असा असे. एकोजीचा कृष्णंभट्ट ह्याच वर्गातील दिसतो. नाव पूर्वपरिचित नाही.
(३०) बघेल कवी : नाव दिलेले नाही.
(३१) जनार्दन पंडित : जनार्दन नारायण हणमंते. नारायणसंभवं म्हणून जयरामकवीने स्पष्ट म्हटलेच आहे. ह्याची चालचलणूक रुबाबदार असून हा शिव व विष्णु ह्या दोन्ही दैवतांचा उपासक होता. कर्नाटकात शैव व वैष्णव यांचे बंड व द्वैत फार. सबब, दोघांचाही मिलाफ एकमेव अद्वितीय ब्रह्मात म्हणजे भागवत धर्मात करणारा हा मुत्सद्दी तरुण युवराज जो एकोजी त्याच्या दरबारास साजेसाच होता. हे पूर्वपरिचित नाव आहे.
(३२) कमलाकर : हा यशवंतराव श्रीकरणाधीश याचा आश्रयदाता. ह्याचे उपकार यशवंतरावाने योग्यतेस चढल्यावर फेडिले. हे नाव आहे की आडनाव आहे न कळे.
(३३) यशवंतराव : हा एकोजीचा श्रीकरणाधीश. हा राज्यातील करवसुलीचा अधिकारी व विद्वान ब्राह्मणांचा कैवारी होता. नाव अपरिचित.
(३४) कोयाजीराजे भोसले : हा शहाजीचा रक्षापुत्र. याच्यावर एकोजीराजाची फार कृपादृष्टी असे. नाव पूर्वपरिचित नाही.
(३५) त्रिमल्लवेंकट नाईक : हे दोघे शहाजीच्या दरबारचे प्रख्यात कानडे गवयी. नावे पूर्वपरिचित नाहीत.
ही पस्तीस नावे शहाजी महाराजांच्या खास दरबारातील कारभा-यांची, पंडितांची व कवींची झाली. ह्यापैकी बहुतेक सर्व संस्कृत व प्राकृत भाषा जाणणारे असून, कित्येक तर पट्टीचे शास्त्रज्ञ व कलाज्ञ होते. शहाजी महाराजाने एकोजी राजाला जेव्हा युवराजपद दिले त्यावेळी त्याने त्याला कारभारीही पिढीजाद मंडळीतून निवडून दिले. बखरीतून लिहिलेले असते की बेंगळुराहून शिवाजीराजाची पुणे प्रांती रवानगी झाली तेहा त्याजबरोबर अमात्य वगैरे कारभारी नेमून दिले होते. ह्या लिहिण्यात किती तथ्य आहे हे वरील प्रघातावरून स्पष्ट दिसते. राजपुत्रांना फार लहान वयापासून कारभारी नेमून देऊन, त्यांच्याकरवी त्यांना राजकीय व्यवहार शिक्षण भोसले मंडळी देत असत. एकोजी राजाला युवराज हा किताब असून शिवाय सवाई महाराज असाही अलकाब त्याच्या नावपुढे जोडीत. तेव्हा शिवाजी महाराजांना महाराज हे पद फार लहान वयात लावण्यात आलेले कागदोपत्री आढळल्यास त्याचे आश्चर्य वाटावयाला नको. महाराज ह्या किताबाखेरीज छत्रपती हा लौकिक किताब शिवाजी महाराजांना जनतेकडून फार लहानपणी मिळालेला आहे. शिवाजी हा दरिद्री, टाकून दिलेला, दरोडेखोर पोर होता, तेव्हा त्याला राजा, महाराजा व छत्रपती हे किताब अल्पवयात मिळणे अशक्य होते अशी कित्येक तुटपुंज्या माहितीच्या लेखकांची समजूत कशी झाली असावी तेही आता समजून येण्यास मार्ग होतो. राजा हा तर किताब सर्व अस्सल दक्षिणी मराठ्यांना वंशपरंपरेने हजारो वर्षे लागत आलेला आहे.