प्रस्तावना

१६. पसतीस दरबारी मंडळी व पसतीस आगंतुक मंडळी मिळून एकंदर सुमारे सत्तर इसमांची नावे चंपूत दाखल आहेत. बालकवी वगैरे दोन चार क्षुल्लकांचा समावेश ह्या सत्तरात अनुपयोगी म्हणून केला नाही. नाहीतर ही संख्या पाऊणशेपर्यंत सहज वाढती. इतकी गुणी मंडळी ज्याच्या दरबारी शक १५७५ पासून शक १५८० पर्यंतच्या पाच वर्षांत जयरामाने प्रत्यक्ष पाहिली त्या शहाजी महाराजांचे ऐश्वर्य कोणत्या प्रतीचे होते त्याचा अंदाज कोणालाही करता येण्यासारखा आहे. प्रातरुत्थान, राजसभा व सैन्ययात्रा यांची जी वर्णने जयरामाने केली आहेत त्यावरून अंदाजाने नव्हे तर प्रत्यक्ष पुराव्याने सिद्ध करता येते की, त्या काळी एखाद्या स्वतंत्र राजाप्रमाणे शहाजीचा सर्व थाट असे. शहाजीची दिनचर्या येणेप्रमाणे असे. पहाटेस शेजघराजवळ बाळसंतोष, कुडबुड्ये जोशी व शाहीरलोक भूपाळ्या वगैरेंचे मधुरालाप काढून राजाला सुखशय्येवरून उठवीत. इतक्यात विश्वनाथभट्ट उच्चस्वराने प्रात:स्मरण संस्कृत भाषेत करीत. कित्येक ब्राह्मण पुण्याहवाचनाचे म्हणजे राजाला सुखाचा दिवस जावो अशा अर्थाचे मंत्र म्हणत, कित्येक विप्र ॐकारपूर्वक वेदपठण करीत, कित्येक स्वस्तिसाम्राज्यादि मंत्रांनी आशीर्वाद देत व कित्येक अग्निहोत्री वषकाट्कारार्पणात गुंतत. मंत्रपठनाच्या, भूपाळ्यांच्या व प्रात:स्मरणांच्या ह्या धांदलीत राजा शेजेवरून उठून अंगणात येऊन आकाशाकडे पाहून अरुंधति, शची, देवसेना व आकाशगंगा इत्यादी तारांगणावर नजर फेकून आणि शिव, विष्णु, स्कंद ऊर्फ खंडोबा, ब्रह्मदेव, लोकपाल, इंद्रादि देव, होमशालेतील अग्नी इत्यादींचे दर्शन करून दिशावलोकन करी. ह्याच सुमारास जंगम शंख फुंकीत, गुरव शिंग वाजवीत व घडशी चौघडा सुरू करीत. ह्या मंगलध्वनींच्या निनादात तुफान ऐरावत, सवत्सगाय, पुत्रिणी ब्राह्मणी, वर्धमान मानुष म्हणजे विदूषक, ठेंगू ब्राह्मण व पाण्यातून नुकताच बाहेर निघालेला डुक्कर हे शुभचिन्हक प्राणी राजापुढून जात. नंतर वाड्याच्या समोरील पटांगणात हजार पाचशे घोडेस्वार किंवा पाईक कवाईत करीत. त्यांची परेड देहली दरवाज्याच्या बाहेर येऊन पाहून, रथ, पालख्या शिबिका वगैरे वाहनांचे अवलोकन राजा करी. इतक्यात दरवेशी एखाद दुसरा सिंहाचा बच्चा व थट्टीकामदार एखादा माजलेला पोळ राजापुढे नाचत बागडत आणीत. नंतर हंस, चाष, मत्स्य यांचे शुभशकुन घेत घेत व दरवाजावरील तोरणाकडे पहात पहात वाड्यापाठीमागील अश्वत्थ, औदुंबर वगैरे शुभवृक्ष व पारिजातकादि पुष्पवृक्ष यांच्या छायेखालून राजा जाई. शेवटी दक्षिणार्वत शंखांतल्या तीर्थांचा नेत्रांना स्पर्श करून व वेळूच्या लंबायमान दांड्याच्या अग्रावर लटकत व फडफडत असलेल्या जरीपटक्याकडे सकौतुक दृष्टिक्षेप चढवून राजा नाडीपरीक्षणार्थ आपला हात राजवैद्यापुढे करी. सवेच एक ब्राह्मण एका हातात तेलाने भरलेली रुप्याची परात व एका हातात तुपाने भरलेली सोन्याची परात राजापुढे आणी. त्यात मुखाचे प्रतिबिंब पाहून व अष्टोदशे मंगलांचा शुभशकुन घेऊन राजा स्नानोपहारादि सेवन केल्यावर सभामंडपात प्रवेश करी. सभामंडपाला ऊर्फ दरबाराला नवगजी असे नाव असे. त्या नवगजीत राजे, उपराजे, संस्थानिक, परराष्ट्रीय वकील व सरदार आधीच येऊन हजर असत. पंडित, कवी, शास्त्री, वैदिक इत्यादी सरस्वतीपुत्रांचाही समुदाय राजदर्शनाची उत्कंठतेने वाट पहात असे. नंतर भालदारांच्या ललका-यात व जनसंमर्दातून वाट काढीत येणा-या चोपदारांच्या ठणका-यात महाराज हातातील तरवारीचे अग्र जमिनीला टेकीत टेकीत (कारण शहाजी महाराजाचे वय ह्या काली साठीच्या पुढे गेले होते) सभास्थानात गंभीर रूबाबाने प्रवेश करून सिंहासनारूढ होत. हा प्रात:कालीन कार्यक्रम झाला. भोजनोत्तर दोन प्रहरांनंतरही कधीकधी स्वारीशिकार नसल्यास पंडित व कारभारी यांच्या सभेत बसून सायंकाळ पावेतो काजकारण, ब्रह्मचर्चा, काव्यविनोद, दानधर्म, पंगुपरामर्श, न्यायमनसुबी जेठीमल्लयुद्धे इत्यादी लघु किंवा जड व्यवहारात महाराज गुंतलेले असत. सायंकर्म आटोपल्यावर उपहारोत्तर खलबतखान्यात शेलक्या मुत्सद्यांच्या समवेत गुप्त कारवाई चाले. अशी ही शाहाजी महाराजाची दिनचर्या जयरामाने केवळ शब्दचित्राने रंगविलेली येथे वाक्यपटावर खुली करून दाखविली आहे. तीवरून शहाजीच्या ऐश्वर्याची कल्पना थोडीबहुत वाचकांना करून घेता येईल. शौर्याने पृथापुत्र जो अर्जुन त्यासारखा, दातृत्वाने विक्रमादित्यासारखा व ज्ञातृत्वाने भोजराजासारखा शहाजी आपणास दिसतो, असे जयराम जे लिहितो त्यात किती तथ्य आहे ते शहाजीच्या आश्रित कविमंडळींच्या यादीवरून, देवशेषादी विद्वानास त्याने करून दिलेल्या वर्षासनावरून व शक १५७५ पासून १५८० पर्यंतच्या पाच वर्षातील मीर जुमालादिकावरील त्याच्या स्वा-यावरून अंशत: समजून येण्यासारखे आहे. शक १५७५ त शहाजीचे वय साठीच्या घरात आलेले होते. साठपासून पासष्टपर्यंतच्या पाच वर्षातीलच तेवढी प्रत्यक्ष पाहिलेली हकिकत जयरामाने दिली आहे. पूर्वी साठ वर्षांची म्हणजे शक १५१६ पासून शक १५७५ पर्यंतची व पुढील शक १५८० पासून शक १५८५ पर्यंतची हकिकत त्याने दिलेली नाही. ह्या हकिकत न दिलेल्या काळातील शहाजीच्या कर्तबगारीचा शौर्याचा, औदार्याचा व ज्ञातृत्वाचा तपशील दुसरे कोणी कवी किंवा बखरकार जेव्हा आपणास संशोधनांती उपलब्ध होतील तेव्हा कळेल. शहाजीच्या आश्रयाला नाना देशचे संस्कृत व प्राकृत कवी, पंडित, शास्त्री, मराठी शाहीर इत्यादी मंडळी असे म्हणून जयराम सांगतो, त्यावरून आशा उद्भवते की शक १५१६ पासून शक १५७५ पर्यंतच्याही हकीकती पुढेमागे उपलब्ध व्हाव्या. जयरामाने आपल्या मनात शहाजीच्या वर्णनाचे एकंदर तीन भाग केले. पहिला भाग ज्ञातृत्वाचा, दुसरा भाग दातृत्वाचा व तिसरा भाग शौर्याचा. पैकी ज्ञातृत्वाचा व दातृत्वाचा तपशील येथपर्यंतच्या कविसमागमाच्या वर्णनात दिला आहे. कवींच्या समस्यांना उत्तरे देताना शहाजीच्या शक १५७५ पासून १५८० पर्यंतच्या पाच वर्षांतील युद्धांचे उल्लेख जयरामाने आपल्या उत्तरात गोवून दिलेले आहेत. चंपूकाव्यातील हे पाच वर्षांचे युद्धोल्लेख व पूर्वीच्या साठ वर्षांतील व पश्चातच्या पाच वर्षांतील राजकीय व यौद्धिक हकिकती क्रमवार मांडल्याने या थोर पराक्रमी व राज्याक्रामक पुरुषाच्या सत्तर वर्षांतील कर्तबगारीचा अहवाल एका ठिकाणी जुळल्यासारखा होईल व शिवाजीचा पूर्वावतार जो शहाजी त्याच्या कर्तबगारीवर शहाजीचा पश्चादवतार जो शिवाजी त्याने आपल्या कर्तबगारीची इमारत कशी उठवून दिली ते कळण्यास मार्ग होईल. हा अहवाल जुळविताना इतर अनुषंगिक बाबींचाही परामर्श घेणे संयुक्त व विषयपोषक दिसल्यास त्याचाही समावेश केला जाईल.