प्रस्तावना
(५७) अकब्बरपूरचा कवी : याने पूर्वी भाषेत शहाजीचे स्तवन केले आहे.
(५८) अनामक पंजाबी कवी : याने पंजाबी भाषेत कवन केले आहे.
(५९) हिंदुथानी अनामक कवी : याने हिंदुस्थानी भाषेत स्तुती गायली आहे. हा म्हणतो - बर्गी, बक्सर, ठट्टा, भक्कर, बागलाण, काबूल या देशांतील सरदार शहाजीच्या दरबारात सेवा बजावीत असतात. कोणी हात जोडून उभे आहेत, कोणी पुढे धावत आहेत, कोणी पैजार झाडीत आहेत, कोणी पिकदाणी धरीत आहेत, कोणी राजाच्या डोक्यावर छत्र धरीत आहेत, कोणी पेचकश संभाळीत आहेत, कोणी शहाजीचे स्तुतिस्तोत्र गात आहेत आणि कोणी नुसतेच उभे आहेत. कवीचा सांगण्याचा मनोदय असा आहे की, शहाजीच्या दरबारात व सैन्यात काबूल, पंजाब, हिंदुस्थान, बागलाण, टठ्ठा, भक्कर वगैरे प्रांतांतील राजा हे उपपद धारण करणारे लोक नोकरीस असत व नाना प्रकारची पडतील ती कामे करण्यास राजी असत.
(६०) फारसी कवी : याने फारसीत कवन केले आहे.
(६१) गुजराथी कवी : याने गुजराथीत स्तुती केली आहे.
(६२) मोरिर्नाभाट : याने बागलाणीत स्तुती केली आहे. त्यात तो म्हणतो की, शहाजी ज्याच्यापासून चाकरी घेतो त्याला नौबत देतो आणि ज्याची चाकरी घेत नाही त्याला नागवा करून सोडून देतो. तसेच कवी आणिक लिहितो की, शहाजीच्या सैन्याच्या कुचाच्या कर्ण्याचा धुधु:कार ऐकून बागलाणच्या राणीला काय करावे ते सुचेनासे झाले आणि ती आपल्या दादल्याला म्हणाली की, तू आपल्या दाढीमिश्या बोडून व डोळ्यांत काजळ घालून बायकोचा वेश घे आणि शहाजीच्या गोटात बटकीसारखा डोईवर मडके घेऊन पाणी भर!
(६३) बर्गीकवी : नाव पूर्वपरिचित नाही. आदिलशाहीत एकटा शहाजी तेवढा मर्द गाजी आहे, अशी ह्या कवीने उक्ती काढिली आहे. मोंगलांना भय पडले, रूमशामवाले शिपाई डरले आणि प्राण घेऊन जो बचला त्यावर खुदाची मर्जी म्हणूनच शहाजीच्या हातून तुटला, असेही उद्गार कवीने काढिले आहेत.
(६४-६५) मोदलराय व कोट्टापोबराय : नावे अपरिचित.
(६६-६७) लालमनि व घनशाम : नावे अपरिचित
(६८) विश्वंभर भाट : अपरिचित, कर्नाटक, कलिंग व तेलंगण येथील राजांच्या पराभवाचा उल्लेख हा कवी करतो.
(६९-७०) बलदेव नरायन व अनंत नरायन : अपरिचित. येथे प्राकृत कवींची नामावळी संपली. प्रत्येक कवी जयरामाला समस्या घाली व जयराम त्या त्या कवीच्या भाषेत समस्येची पूर्ति करी. पूर्तीत शहाजीचा कोणता तरी वास्तविक गुण किंवा पराक्रम काव्यभाषेने गायिलेला आहे. म्हणजे ह्या परिशिष्ट खंडातील सुमारे दोनशे पद्ये शहाजीच्या स्तुतिपर आहेत. शेवटी चंपूच्या समाप्तीस वर्णन आहे की, जयरामाने आपल्या मातापितरास काशीवास घडावा म्हणून राजापाशी द्रव्य मागितले व ते शहाजीने त्यास खुश होऊन दिले. अखेरीस, राजाच्या समोर अशी सुंदर पद्ये गाऊन माझ्यासारखे पालखीपदस्थ व्हावे म्हणून इतर कवींना उपदेश करून जयरामाने परिशिष्टखंडाची व चंपूची परिसमाप्ती केली आहे.