प्रस्तावना

१७. प्रथम ह्या पराक्रमी पुरुषाचे खरे नाव काय त्या बाबीची विचक्षणा करू. प्रस्तुत चंपूत शाह, षाह, साहे, साहिजू, साहजू, शाहे, शाहजी, साह, साहजी, साहज, शाहबा, शाहाजी, शहाराज, शहाजी, साहजी, शा, साहि इतके उच्चार या पुरुषाच्या नावाचे आले आहेत. बखरीतून शहाजी, शाहाजी, शाहजी व तवारिखातून शहाजी, शाहाजी व क्वचित इतरत्र स्याहाजी असाही उच्चार आढळतो. पैकी मूळ खरा उच्चार कोणता? ह्या पुरुषाचे मूळ नाव सिंह असावे. सिंह या शब्दाला जित् शब्द जोडून सिंहजित् शब्दाचा अपभ्रंश सिंहजी, सिंहाजी, सिंह उच्चार अपभ्रंश सीहँ. त्यावरून सीहँजी. सीहँ असा अपभ्रष्ट उच्चार जुन्या मराठीत होतो. सीहाँजीचा अपभ्रंश स्थाजी, स्याहाजी, श्याहाजी, शाहाजी, शहाजी, शाहाजी, साहाजी इ. इ. साहाजीचा ब्रज, उर्दू, वगैरे अपभ्रंश साहजू, षाह, शाह इत्यादी. मूळ नाव सिंह असावे ह्याला प्रमाण ह्या पुरुषाच्या धाकट्या भावाचे नाव शरभोजी. शरभ हे नाव तंजावरातील भोसल्यांच्या नावात मशहूर आहे. शरभजित् = शरभोजी = सरफोजी. एका भावाचे नाव सिंह व दुस-या भावाचे नाव शरभ. सिंहक आणि शरभक ही मनुष्यनामे संस्कृत वाङ्मयात प्रसिद्ध आहेत. जातिनाम्न: कन (५-३-८१) या सूत्रात पाणिनी सिहक: शरभक: ही नावे सांगतो. तात्पर्य, मूळ नावे सिंहक, शरभक अशी संस्कृत होती. नगरच्या शहासरीफ या फकिराच्या नावावरून शहाजी व सरफोजी ही नावे नवसाकरिता दिली, ही मखलाशी नंतरची आहे. सिंह व शरभ या संस्कृत नावांच्या जवळजवळ शाह व सरिफ ही फारसी किंवा अरबी नावे उच्चारात असल्यामुळे मखलाशीला सौकर्य आले, इतकेच. अहमदनगरच्या निजामशाही दरबारात वावरावयाचे असल्यामुळे, आपली नावे मुसलमान पीराच्या नावावरून पडली, असा बहाणाही एतन्नामधारकांकडून पातशाही मर्जी संपादण्याकरिता केला गेला असण्याचा संभव आहे. परंतु मूळ नावे संस्कृत होती हे बृहदीश्वराच्या देवालयातील शिलालेखातल्या शरभ या उच्चारावरून ताडता येते.