प्रस्तावना

क्वचित रिकामा वेळ सापडल्यास त्यात तो पंडितांशी ब्रह्मचर्चा करी, कवींना समस्या घाली व भाटांची कवने ऐके किंवा शाहिरांचे मराठी पवाडे श्रवण करी, कधी शुकसारिकांच्या आलापाने मनरिझवी, कधी नाचबैठक पाही, कधी यज्ञयाग करवी, कधी कारभा-यांशी खलबत करी, कधी साधुसंतादि महानुभावास म्हणजे योग्यास दरबारी भेटीस आणी, कधी सत्पात्री दानधर्म करी व कधी आंधळ्या दुबळ्यांचा समाचार घेई. भरतखंडात जी बारा ज्योतिर्लिंगे आहेत त्याची त्रिकाळ पूजा शहाजीच्या खर्चाने चाले. त्याला सर्वतो प्रकारे शोभणारी अशी जिजाई नामे स्त्री आहे. तिची कीर्ती सर्व भरतखंडभर लोक गातात. राजाची दुसरी स्त्री आहे, ती रोज नित्यदाने देत असते. शहाजीचा पुत्र शिवाजी तर असा बिंडा निपजला आहे की, मोंगलादी चारी पातशाहांना त्याने सतावून जेरीस आणिले आहे. शिवाजीचा धाकटा भाऊ जो एकोजीराजा तो इंद्राला जसा उपेंद्र तसा शिवाजीला शोभतो. असा शहाजी महाराजा हा केवळ जगन्नाथ आहे. लोक शहाजीचे दर्शन घेण्यास टपलेले असतात. शहाजीची बरोबरी राजा जनकालाही करता येणार नाही. देशोदेशीच्या बायका आपल्या नव-यांना शहाजीची भेट घेण्यास जा आणि शहाजीराजा आपल्या मनात धरून घरी आपणास दाखवावयास आणा म्हणून नव-यांना बजावतात. शहाजीराजाची नजर परधन व परस्त्री यांचा अपहार करण्याकडे नाही.

(५५) सुबुद्धिराव : ह्याला शहाजीने काही दिवस आपल्या जवळ ठेवून घेतले होते. हा उत्तर प्रदेशातील घाटमपूरचा राहणारा. ह्याने उत्तरदेशी भाषेत शहाजीराजे शिसोदे यांचे वर्णन असे केले आहे की, शहाजी महाराजाच्या दानशुरत्वापुढे इतर राजे लज्जायमान झाले. हा कवी म्हणतो की, शहाजीमुळे सर्व हिंदूंची बूज राहिली व जसे श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून धरून गोपांचे संरक्षण केले तसे शहाजीने आपल्या छत्रसिंहासनधारणाने सर्व हिंदूंचे रक्षण केले. ह्या कवीच्या शब्दांचा वाच्यार्थ असा होतो की, शहाजी सिंहासनाधीश्वर व छत्रपती नावाने झाला नसला तरी कृतीने झाला होता.

(५६) ढुंढरी कवी : ह्याने ढुंढार भाषेत कवित्व केले. त्यातील मतलब असा - शहाजीच्या फौजेचे कूच झालेले पाहून कोणी विचारले की, फौज कोठे चालली? तेव्हा भाटाने उत्तर दिले की, राजगड चितोडच्या दिशेने फौज जाणार, राजा शहाजी हा चितोडच्या राण्याचा भाऊबंद आहे, तर भिऊ नका. पण भय न समावून अंभेरच्या राजाने शहाजीला अगोदरच निरोप पाठविला की, मी घासदाणा देण्यास तयार आहे. याचा अर्थ एवढाच की, उत्तरेकडील रजपूतची दक्षिणेकडील भोसल्यांना सहानुभूती दाखविण्यास तयार होते व भोसल्यांना ते आपले भाईबंद समजत असत.