प्रस्तावना
(५०) अल्लीखान : ह्या कवीच्या समस्येस उत्तर देताना जयरामाने शहाजीच्या अल्लंगगडच्या स्वारीवर कवित्व मोठ्या बहारीचे केले आहे. ते मुळातच वाचण्याची शिफारस केल्यावाचून राहवत नाही.
(५१) बालकवी : नाव दिले नाही.
(५२) रघुनंदरामानुज : नावाचा पूर्वपरिचय नाही.
(५३) जदुराय : हा कवी शहाजी संबंधाने विनोदाने म्हणतो की, राजा!
तुझ्यासारख्याची पारख कोणाला नाही. तुझ्या हाती चामड्याचे दाम लाल होतात! येथेच शहाजी महाराजाचा उजवा नव्हे, डावा नव्हे तर, केवळ हातच असा जो संताजी राजा त्याचे वर्णन कवीने केले आहे. संताजी राजा हा शहाजीला नरसाबाईच्या पोटी झालेला पुत्र होय. नरसाबाई ही शहाजीची गौण स्त्री. सबब कवीने हिचे नाव जिजाई व तुकाई यांची नावे देताना दिले नाही. याच अनुषंगाने जयरामाने दरबारातील फाल्गुन मासच्या वसंतलीलेचे वर्णन केले आहे.
(५४) दुर्गठाकूर : दुर्ग ठाकूर हा शहाजीच्या सलगीतला कवी दिसतो. राजा ह्याला दर महिना एक होन पगार देत असे. एकदा राजाने ह्याला एक घोडा व पालखी बक्षीस दिली. ह्याच्या सांगण्यावरून राजाने जयरामाला सत्तावीस मराठी पद्यरत्ने गुंफण्याची आज्ञा केली व ती जयरामाने आनंदाने मान्य केली. ह्या मराठी पद्यात (१) तरवारीच्या एका कचक्याने शाहाजीने पर्वतप्राय हत्तीचे शीर कसे तोडले, (२) रणात भाल्याने शत्रूंची बख्तरे शहाजी कशी फोडी, (३) शत्रूंच्या स्त्रिया तुंगभद्रेच्या तीरी पर्णकुटी करून भिलडीची रकटी नेसून कशा लपत, (४) शहाजीने यवन जमीनदोस्त केले म्हणून कर्नाटकातील ब्राह्मण त्याला धन्यवाद कसा देत, (५) वैदिकविद्येचे संगोपन शहाजीच्या हस्ते कसे झाले, (६) शहाजी व शहाजहान यांनी हिंदुस्थानची व दक्षिणेची वाटणी कशी केली, (७) शहाजीने जयरामास सुलक्षणी घोडा बक्षीस कसा दिला, (८) कवी जदुराज व एक मुलगा ह्यांच्यात ...पतीचा हास्यकारक संवाद कसा झाला, (९) युधिष्ठिर व शालिवाहन हे रेवा उल्लंघू शकले नाहीत, परंतु शहाजीने ती नदी कशी ओलांडली, (१०) लहान लहान बालकवी शहाजीपुढे पद्ये कशी म्हणत व शहाजी त्यांना कसा नावाजी, वगैरे वर्णन आले असून, जयरामाने नंतर बारा भाषांत पद्ये करून ती राजाला समर्पण केली. त्यातील मराठी पद्यांचा सारांश असा तुझ्या दरबारात मोठमोठ्या कवीस आश्रय मिळतो, तेथे माझ्यासारख्या क्षुद्र कवीचे पोट भरल्यास त्यात आश्चर्य कसले? असा प्रस्ताव करून जयराम खालील तपशील देतो. दक्षिणभूमी ही शहाजीची नवरी आहे. वलीपास नावाचा शिसोद्यांच्या कुळात एक राणा झाला. त्याच्या वंशात मालोजीराजे भोसले जन्मले. मालोजीने शंभुमहादेवावर तळे बांधून देव संतुष्ट केला. मालोजीची राणी उमाई हिचे पोटी राजा शहाजी जन्मला. शहाजीने आसमुद्र पृथ्वीचे पालन केले आहे. शहाजीच्या सैन्याचा तळ दीडदीड गाव लांबरूंद पडे. शहाजी सदा युद्धकर्मात गुंतलेला असे.