प्रस्तावना

गडांत मिर जूमला सकलिकीं जही कोंडिला ।
उदंड रण मांडिला परि रुका न त्याणें दिला ॥

शहाजीने जुमल्याला गडात कोंडून सडकून चोपला, पण त्याने कवडीही दिली नाही. शेवटी लाचार होऊन व भीतीने गांगरून जाऊन तो शहाजीला शरण आला. त्याला दिल्लीश्वराचा पुत्र जो अवरंगझेब त्याचे पाठबळ होते. परंतु, शहाजीपुढे त्याला मान वाकवावी लागली. पातशाहाजादा अवरंगझेब याच्यासारख्याचे पाठबळ असलेल्या कुबेरतुल्य मीर जुमल्याचा पराभव करून, शहाजीने दिगंत कीर्ती मिळविली आणि आदिलशाहांना लघुत्वाप्रत पोहोचविले.

(४९) सुखलाल : मीर जुमल्यावरील गुत्तीच्या स्वारीनंतर कवीने म्हणजे सुखलालाने विजयानगरच्या रायलूवरील स्वारीचा उल्लेख केला आहे. ह्या स्वारीत शहाजीने जंतकलची लढाई मारिली व रायलूची सर्व फौज धुळीस मिळविली. तेव्हा विजयानगरच्या राजाने क्षत्रियत्वाची लाज सोडून पलायन केले. ही वार्ता ऐकून कवी म्हणतो, शहाजीची ख्याती सर्व राजांहून श्रेष्ठ झाली आणि शहाजीच्या कथा भरतखंडात सर्वतो मुखी झाल्या. गुणीजनांना तर शहाजी कर्ण किंवा भोज यांचा अवतार भासला व त्यांनी त्याला शिसोद्यांच्या कुळाचा अवतंस ही पदवी दिली. शिवाजीला पुढे क्षत्रियकुलावतंस म्हणजे भरतखंडातील सर्व क्षत्रिय कुळांचा अवतंस ही पदवी विद्वानांनी दिली, तिच्या फार पूर्वी शहाजीला शिसोदेकुलावतंस ही पदवी कवींनी दिलेली लक्षात ठेवण्यासारखी आहे. ह्या काळी, कवी म्हणतो की, शहाजीची छाप गोवळकोंडा व श्रीरंगपट्टण या प्रांतांवर बेमालूम बसली व कर्नूळ वगैरे कर्नाटकातील बहुतेक प्रांत शहाजीच्या हाती आले. ह्या काळी महंमद आदिलशाहाची सर्व भिस्त शहाजी महाराजांवर होती. शहाजीजवळ ह्या काळी साठ सत्तर हजार फौज असून, अफजलखान महम्मदशाही हा आदिलशाही सरदार व शहाजहान हे त्याला वचकून असत. मोंगलाला सरहद्दीपलीकडे हाकून देऊन, सर्व दुश्मनांना जमीनदोस्त करून व कर्नाटकातील सर्व जमीनदार वठणीस आणून, शहाजीने महम्मदशाहाचे इतके प्रेम संपादिले की, तो सांवतराय ह्या मुत्सद्यापाशी वारंवार म्हणे की, मेरी बादशाही शहाजीने राखी है!!! सांवतरावाच्या द्वारा शहाजी महमदशहाशी पत्रव्यवहार करीत असे. तसेच कोणाच्या हातून झाले नाही ते कर्नाटक जिंकण्याचे काम शहाजीने केले, असे उद्गार महंमदशहाने काढिले. येणेप्रमाणे सेतुबंधरामेश्वरापासून रूमशामपर्यंत शहाजीच्या पराक्रमाची राय पसरून गेली. यानंतर कवीने शहाजीच्या पिन्गोडा ऊर्फ पेनकोंडा प्रांतावरील स्वारीचा उल्लेख केला आहे. त्यात तो म्हणतो की, पिन्गोडा शहाजीमहाराजांनी खलास केला आणि त्याचे श्रेय दरबारी म्हणजे आदिलशाहाच्या दरबारी यखलासखानास पिन्गोडा मिळाले! कितीही पराक्रमी पुरुष असो, तो जोपर्यंत दुस-याचा नोकर म्हणून मिरवतो, तोपर्यंत त्याच्या पराक्रमाचे सर्व श्रेय त्या दुस-याच्या नावावर जाते. बापाची ही मानहानिकारक गुलामगिरी पाहून, शहाजीचा मुलगा जो शिवाजी तो प्रथमपासूनच कोणाची ताबेदारी न करता स्वतंत्र बाण्याने वागू लागला. तालीकोटच्या लढाईनंतर विजयानगरचे राजे पिन्गोड्याच्या किल्ल्यात रहात असत. हा जिल्हा कर्नाटकातील दुर्भेद्यातील दुर्भेद्य असा त्या काळी मानला गेला होता. पिंगोड्याच्या स्वारीनंतर तेलीचेरी प्रांतावर शहाजीने स्वारी केली म्हणून कवी वर्णन करतो.