प्रस्तावना
(४४) गयंद कवी : नाव पूर्वपरिचित नाही.
(४५) द्वारकादास : याला शहाजीने एक खास घोडा बक्षीस दिला. हा जातीचा वैश्य होता.
(४६) देव काशीकर : याला शहाजीकडून वर्षासन असे.
(४७) शेष व्यास काशीकर : यालाही शहाजीकडून वर्षासन असे. देव व शेष व्यास वगैरे काशीकर विद्वानांचा व भोसल्यांचा संबंध केवळ शिवाजीच्या वेळी नव्याने घडून आला असे नव्हे. तर शहाजी महाराजांपासूनच काशीकर विद्वानांचा बडेजाव भोसल्यांच्या दरबारी होत आला आहे. स्वदेशी व परदेशी हजारो विद्वानांना शहाजीकडून वर्षासने पोहोचत असत असे जयराम लिहितो. काशीकरांच्या वर्षासनासंबंधी लिहिताना जयरामाने शहाजीची तुलना धर्म, शिबी, हरिश्चंद्र, पुरू, जनक यांशी केली आहे.
(४८) बलिभद्र कवी : याला शहाजीने हत्ती दान दिला. याच्या समस्येचे उत्तर देताना शहाजीच्या मीरजुमल्यावरील स्वारीचा विस्तृत उल्लेख जयरामाने केला आहे. मीर जुमला हा इराणी जवाहि-या अब्दुल्ला हुसेन कुतुबशहा याचा वजीर. संपत्तीबद्दल व मुत्सद्देगिरीबद्दल हा त्या काळी सर्व हिंदुस्थानात मशहूर होता. शक १५७४ त याने दक्षिण कर्नाटकावर तेलंगणातून म्हणजे गोवळकोंड्याहून स्वारी केली. कर्नाटक जिंकण्याची आदिलशहाप्रमाणेच कुतुबशहांनाही जरूरी व लगत्याचा मुलूख म्हणून सोय होती. आदिलशहाच्या वतीने म्हणून शहाजी कर्नाटकात गेला. मीर जुमला कर्नाटकात उतरल्यावर त्याच्याशी शहाजीचे खडाजंगी युद्ध झाले. त्यात मीर जुमलेची पराकाष्ठेची दुर्दशा शहाजीने उडवून दिली. कवी म्हणतो, जुमला लढेहीना, आडकाठीही करीना, खडा राहून भांडेहीना, असा अगदी जेरीस आला. पळता भुई त्याला थोडी झाली. शेवटी शहाजीने त्याला गुत्तीच्या किल्ल्यात वेढा देऊन कोंडिले. भयाने बरोबरचे सर्व सैन्य सोडून देऊन, गुत्तीच्या उंच किल्ल्यावर जुमला लपून बसला व नामोहरम होऊन अखेरीस तहास आला. मीर जुमल्यावरील ह्या स्वारीमुळे शहाजीचे नाव रूमशामपर्यंत प्रख्यात झाले. शहाजीच्या या बड्या स्वारीचे वर्णन मुसुलमान तवारिखकार देत नाहीत, इतकेच नव्हे तर उल्लेख सुद्धा करीत नाहीत. आदिलशाहाच्या किंवा निजामशाहाच्या अमुक अमुक मुसलमान सरदाराने अमक्या तारखेस अमुक केले, असा मजकूर लिहून, शहाजीचे नाव दुय्यम किंवा सिय्यम म्हणून हे तवारीखकार अधूनमधून क्वचित काढतात व शहाजी प्रबळ झाला म्हणूनही लगेच तकरार करितात. ह्या लिहिण्याचा अर्थ उघड आहे. मुसुलमानी पातशाहीत मराठा सरदार प्रबळ होऊन, लढाया जिंकून, डोईजड झाल्याची हकीकत सहजच विकारवश होऊन हे तवारिखकार लिहीत नाहीत. कुतुबशाहाकडील सरदार मीर जुमला याशी शहाजीचे जे युद्ध झाले ते शक १५७४ त शहाजी विजापूरच्या कचाट्यातून स्वतंत्र झाल्यावरचे असल्यामुळे मुसलमान तवारीखकार त्याचा उल्लेख आदिलशाही तवारिखेत करीत नाहीत, हेही एक अनुल्लेखाचे कारण आहे. आदिलशाही बंधन ढिले करून शहाजी स्वतंत्रपणे कर्नाटकात राज्य कधी करू लागला त्याचे विवेचन पुढे येणार आहे. मीर जुल्यावरील स्वारीचे वर्णन हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषात प्रस्तुत चंपूत आले आहे. मीर जुमला जवाहि-या अत्यंत श्रीमान् असून पराकाष्टेचा कवडीचुंबक होता, असे खालील पद्यावरून दिसते –