प्रस्तावना
जयरामाच्या लिहिण्यावर जर विश्वास ठेविला तर गृहीत धरावे लागते की, जेथे पंबाजी भाषा बोलतात त्या पंजाबात शहाजी गेला होता. मांडवगडच्या स्वारीत माळव्यात गेला असता, बाघेलखंड, मथुरा, दिल्ली, लाहोर व काशी, ही स्थाने तरुण व उमद्या शहाजीने सरकारी तह, सल्ला, कुमक वगैरे कामांनिमित्त पाहिली असावीत असे म्हणावे लागते, त्याशिवाय जयराम इतक्या निश्चयाने खुद्द शहाजीच्या तोंडासमोर असे विधान करणार नाही. निजामशाहाच्या व शहाजीच्या लष्करात पंजाबापासून लखनौपर्यंतच्या व हरद्वारपासून इटार्शीपर्यंतच्या मुलखातील हजारो उनाड हिंदू व मुसलमान लढवय्ये शिपाईगिरी करून असत. त्यांच्या पंजाबी, बख्तर, ढुंढार, उर्दू, हिंदुस्थानी इत्यादी भाषांशी शहाजीचा परिचय झाला असेल या बाबीसंबंधाने वाद नाही. स्वत:च्या लष्करात शहाजी ह्या भाषा सदोदित ऐकत होता. परंतु ह्या भाषा ज्या प्रांतात बोलल्या जात होत्या त्या प्रांतात शहाजी कधी गेला असेल, हा वादाचा व संशयाचा प्रश्न आहे व शहाजी मलिकंबराच्या नर्मदेपलीकडील मांडवगडच्या स्वारीच्या काळी त्या प्रांतातून जाऊन आला असावा, अशी संशयनिवृत्ती होण्यासारखी आहे. मांडवगडाच्या स्वारीच्या वेळी शहाजी ऐन पंचविशीच्या भरात होता आणि शारीरिक व मानसिक गुणांनी संपन्न असून, दहा पाच हजार लष्कराचा कप्तान होता. अशा पराक्रमी सरदाराच्या अवलोकनात जयराम म्हणतो ते देश त्या काळी आले असण्याचा संभव आहे.
(४३) नारायणभट्ट गुरू : शहाजी जर आपल्या बाजूस मिळेल तर आपल्याला फार जोर येईल असे शहाजहान म्हणाला, या बाबीवर कवित्व करण्यास नारायणभट्टाने जयरामास सांगितले. तेव्हा जयरामाने खालील कोटी केली. भगवान् शेषशायी नारायणाने ब्रह्मदेवाला पृच्छा केली की, ब्रह्मदेवा! त्रिभुवन सुखी आहे ना? तेव्हा ब्रह्मदेवाने उत्तर दिले की, नारायणा! त्रिभुवन पूर्ण सुखी आहे, आपण क्षीरसिंधूत खुशाल पडून असावे. कारण त्रिभुवन चारी दिशांनी सुरक्षित आहे. पूर्वेस सूर्य व पश्चिमेस चंद्र खडा पहारा करीत आहेत आणि उत्तरेस शहाजहान व दक्षिणस शहाजी जय्यत राखण करीत आहेत. शक १५५० च्या सुमारास शहाजीचे प्रस्थ केवढे वाढले होते ते वरील उक्तीवरून स्पष्ट होते. इत शहाजू है, उत शाहजहा, इकडे शहाजी व तिकडे शहाजहान, अशी म्हण त्या काळी सर्व भरतखंडभर सर्वतोमुखी झाली होती, तीच जयरामाने काव्यात गोवून दिली. शक १५५६ च्या सुमारास शहाजीची चाळिशी उलटली, असे वर्णन जयराम पुढे एका कवितेत करतो. एका लढाईत शहाजीने आपल्या तरवारेने समोर चालून आलेल्या हत्तीची सोंड उतरल्याचे वर्णनही जयरामाने दुस-या कवितेत केले आहे.