प्रस्तावना

(४१) ठाकूर शिवदास : याच्या समस्येच्या पूर्तीत जयराम म्हणतो की, हे मालोजीच्या पुत्रा, शाहाजीराजा, तुझ्या शत्रुंच्या स्त्रिया रानात वानरांच्या हाती सापडल्या. त्या स्त्रियांची थाने वानरांना ताडफळे वाटली. त्यांचे ओठ पिकलेली तोंडली भासली व दात डाळिंबाचे दाणे दिसले. ऐतिहासिक भाग नाही.

(४२) केहरि : केहरि म्हणजे केसरी. याच्या समस्येच्या उत्तरात शहाजीच्या कीर्तीचे काव्यमय वर्णन जयरामाने केले आहे. ऐतिहासिक भाग नाही.

अश्या नाना प्रकारच्या समस्या व त्यांची जयरामकृत उत्तरे ऐकून शहाजीराजा कवीवर बहुत खुष झाला. त्यामुळे जयरामाचे नाव दाही दिशात दुमदुमू लागले. तेव्हा जयरामाने प्रतिप्रसन्न होऊन राजावर जे कवित्व केले त्यात म्हटले आहे की, हे राजा, तू जे जे देश जिंकलेस किंवा पाहिलेत त्या त्या देशची भाषा मी शिकलो आहे व तुझ्या आश्रयाला आलो आहे. संस्कृत एक व मराठी गोपाचलीय, गुर्जर, वक्तर, ढुंढार, पंजाबी, हिंदुस्थानी बागलणी, फारशी, उर्दू व कानडी अशा अकरा मिळून बारा भाषा कवीला येत होत्या. ह्या बारा भाषा जेथे बोलत होत्या ते देश शहाजीने जिंकिले किंवा पाहिले, असे जयराम म्हणतो. पैकी, कानडी व मराठी ह्या दोन भाषा ज्या कर्नाटक व महाराष्ट्र देशात बोलत ते देश शहाजीने साक्षात जिंकले व पाहिले होते संस्कृत पंडितांची भाषा, फारसी यवनांच्या दरबारची भाषा व उर्दू लष्करातील भाषा शहाजीच्या नित्याच्या परिचयाच्या होत्या. तेव्हा त्या संबंधाने जयरामाच्या विधानाला हरकत घेण्याचे कारण नाही. अहमदनगरच्या बहिरी निजामशाहीची गादी मोंगलांच्या तडाक्यातून बचावीत असता, बागलाणीव गुजराथी भाषा जेथे बोलतात त्या बागलाण व गुजराथ प्रांतात शहाजीला शिरावे लागले हे सुप्रसिद्ध आहे. एकूण सात भाषांचा हिशेब लागला. बाकी राहिल्या ब्रज, बख्तर, ढुंढार, पंजाबी व हिंदुस्थानी ह्या पाच भाषा व देश. हे देश शहाजीने कधी जिंकले किंवा निदान पाहिले? मलिकंबराची पातशाहा जहांगीर आणि शहाजादा शहाजहान याशी १५४० च्या सुमारास जी युद्धे झाली त्या युद्धात तरुण शहाजी वृद्ध मलिकंबराबरोबर मांडवगडापर्यंत गेला होता. मांडवगडच्या स्वारीत ब्रज, हिंदुस्थानी, बख्तर व ढुंढार या भाषा जेथे बोलतात त्या मध्य हिंदुस्थानात शहाजी गेलेला होता. ह्या स्वारीत नेमाडी, रजपुतानी व मारवाडी ह्या भाषा शहाजीच्या कर्णपथावरून गेल्या असल्या पाहिजेत. आता राहिली फक्त पंजाबी. पंजाबात म्हणजे दिल्लीच्या पश्चिमेस व खुद्द दिल्लीस शहाजी केव्हा गेला असावा?