प्रस्तावना
१५ संस्कृतज्ञ व शास्त्रज्ञ अशा दरबारी मंडळींच्या यादीनंतर आता प्राकृत आगंतुक कवींची नावनिशी तपासू. ह्या नावनिशीत अकरा प्राकृत भाषाकवींचा उल्लेख आहे. मराठी पद्ये स्वत: जयरामने केली असल्यामुळे तत्कर्तृत्वासंबंधाने तपासाचे कारणच रहात नाही. बाकी राहिलेले ब्रज, गुजराथी, बख्तर, ढुंढार, पंजाबी, हिंदुस्थानी, बागलाणी, फारसी, उर्दू व कानडी अशा दहा भाषांतील जे कवी शहाजीच्या आश्रयास आले त्यापैकी दोन नावांखेरीज बाकीच्या नावांचा मला पूर्वपरिचय नाही. शक १५७५ त हयात असणा-या गुजराथी, बख्तर, ढुंढार, पंजाबी, बागलाणी, फारसी व कानडी कवींच्या नावांतून प्रस्तुत चंपूत आलेली नावे धुंडाळून काढावयाला त्या त्या भाषातील कविचरित्रे तपशीलवार उपलब्ध झाली पाहिजेत. ती तशी उपलब्ध नाहीत. सबब त्यांच्या संबंधाने अपरिचितत्वाचा पाढा वाचण्याचा प्रसंग येणार हे उघड आहे. ब्रज, हिंदुस्थानी व उर्दू ह्या तीन भाषांतील शक १५७५ त हयात असलेल्या कवींची ही तपशीलवार बारीक माहिती छापलेली माझ्या पहाण्यात नाही. तेव्हा ह्या कवींची पूर्वमाहिती काही एक नाही असे म्हणून स्वस्थ बसणे भाग आहे. आपल्या मराठीत कवी व काव्ये यांच्या बारीकसारीक सूक्ष्म नावनिशा जशा आपण प्रसिद्ध केल्या आहेत तशा नावनिशा इतर भाषांतील कवी व काव्ये ह्यांच्या तत्त प्रांतीय शोधकांनी प्रसिद्ध केलेल्या नाहीत. कालांतराने त्या जेव्हा केव्हा प्रसिद्ध होतील तेव्हा त्यातून प्रस्तुत चंपूतील नावे पटवून घेता येतील किंवा त्यात ही नावे नवीन म्हणून कदाचित घालता येतील.
(३६) रघुनाथ व्यास : माहिती नाही. बैरनके वधू फिरे बेरनके बनमे, अशी समस्या रघुनाथ व्यासाने जयरामाला घातली. तिचे पूरण करताना, शहाजीचा रणदुंदुभी वाजला असता शहाजहानच्या हृदयात धडकी भरली, असे विधान केले आहे.
(३७) रघुनंदन : हा ब्रजभाषाकवी. याच्या समस्येच्या उत्तरात जयरामाने बालकृष्णवर्णन केले आहे, शहाजीचा उल्लेख नाही.
(३८) ठाकूर चतुरद : याने शहाजीच्या वर्णनपर यमकबद्ध सवायी करण्यास जयरामास सांगितले. शहाजीने हाती फिरंग धरली की, फिरंग्यांचा चेह-याचा रंग उतरतो, असे जयरामाने तीत वर्णन केले आहे.
(३९) लछिराम : लछिराम म्हणजे लक्ष्मीराम. याच्या समस्येच्या पूर्तीत शहाजीच्या कीर्तीचे काव्यमय वर्णन कवीने केले आहे. ऐतिहासिक भाग तीत नाही.
(४०) श्याम गुसाई : याच्या समस्येच्या समाधानात शहाजीच्या शत्रुंवर व त्यांच्या बायकांवर जयरामाने काही काव्यकोट्या केल्या आहेत, ऐतिहासिक भाग नाही.