प्रस्तावना
(१५) अनंत शेष पंडित : हा काशीतील शेष उपनावाचा विद्वान पंडित पुणतांब्याहून शालिवाहनाच्या तेराव्या शतकात महाराष्ट्रात जेव्हा सर्वत्र यावनी माजली तेव्हा श्रीक्षेत्र पुण्यस्तंभ येथील पाच पट्टीच्या विद्वानांची घराणी आपली हजारो पोथ्यापुस्तके घेऊन श्रीक्षेत्र वाराणसी येथे देशत्याग करून गेली. त्यातले शेषांचे घराणे. ह्या शेष घराण्यातील वीरेश्वर शेषापाशी प्रसिद्ध कवीवर जगन्नाथ पंडिताने पातंजलभाष्याचा अभ्यास केला असे जगन्नाथाने आपल्या रसगंगाधरात लिहिले आहे :
'शेषांकप्राप्तशेषामलभणिति रभूत् सर्वविद्याधरो य:' जगन्नाथ शहाजहान व शहाजी यांचा समकालीन होता, हे सर्वसिद्ध आहे. शहाजीराजांच्या आश्रयास आलेला अनंत शेष हा अलंकारशास्त्रज्ञ होता. हे नाव परिचितांपैकी आहे.
(१६) संभाजीराजे भोसले : हा शहाजी व जिजाई यांचा वडीलपुत्र व शिवाजीचा ज्येष्ठ बंधू. नाव परिचित आहे. याचा विधीयुक्त यौवराज्याभिषेक झाला होता, असे जयराम लिहितो.
(१७) यलोजी महाले घंटाघोष : यलोजीला दोन आडनावे होती, महाले व घंटाघोष. हा देशस्थ ब्राह्मण. योग, न्याय, मीमांसा, काव्य, नाटक, अलंकार इत्यादी शास्त्रात व कलात निष्णात असा हा विद्वान पंडित युवराज संभाजी राजे भोसले यांचा परमस्नेही होता, असे जयराम लिहितो. हे नाव पूर्वपरिचित नाही. ह्याच्या वर्णनात जयराम भानुविरचित रसमंजरीचा उल्लेख करतो. नायकभूषण म्हणून विशेषण यलोजीला कवी लावतो, त्यावरून कदाचित पिढीजात धंद्याने हा सराफ असावा.
(१८) रघुनाथ पंडित : रघुनाथ नारायण हणमंते, नारोपंत हणमंत्याचा पुत्र. हा वयाने तरुण, परंतु बुद्धीने पोक्त होता. काळ्या लोखंडी बोरूची लेखणी कानावर ठेवून हा राजापुढे आला. हा हर हुन्नर कला जाणणारा होता. राजाच्या सांगण्यावरून जयरामाचा आदर ह्याने केला. नाव पूर्वपरिचित आहे.
(१९) सखो पंडित : आडनाव दिले नाही. भांडागार, बागा, थट्टी, कलावंत यांच्यावरील अधिकारी असे. सेवकांना पगार वाटण्याचे काम याजकडे असे. सर्व लोकांशी मित्रत्वाने वागण्यात व मिठ्ठे बोलण्यात हा प्रवीण असे. राजाचा हा केवळ बहिश्वर प्राण असे. नाव पूर्वपरिचित नाही.
(२०-२१) रघुनाथपंत व लक्ष्मणपंत : दोन दरबारी मुत्सद्दी. यांना लोलिंबकर्मकरो ल्लंब्बौ असे विशेषण कवीने लाविले आहे. लोलिंबकर्म म्हणजे नर्मकर्म संपादण्यात राजाचे हे साह्यकारी होते. राणीवशाची व्यवस्था पाहण्याचे काम यांजकडे असावे. नावे पूर्वपरिचित नाहीत.