प्रस्तावना
(२२) दत्तो नागनाथ : हा शहाजीराजाच्या दरबारचा कोणी सुप्रसिद्ध मुत्सद्दी असावा. ह्याचा व जयरामकवीचा काही शरीरसंबंध होता. नाव पूर्वपरिचित नाही. विश्वनाथ भट्ट ढोकेकराहुन हा इसम निराळा असावा.
(२३) विश्वनाथभट्ट मंगल पाठक : याजकडेस प्रात:स्मरण उच्च व मधुर स्वराने पढून राजाला उठविण्याचे काम असे. नाव पूर्वपरिचित नाही. विश्वनाथभट्ट ढोकेकराहून हा इसम निराळा असावा.
(२४) प्रभाकरभट्ट राजगुरू : हा राजाचा वर्षपुरोहित व राजगुरू. ह्याचे चरणतीर्थ राजा ग्रहण करीत असे. नाव पूर्वपरिचित नाही.
(२५) मल्लीनाथ वंशज : रघुवंशादी महाकाव्यांवर टीका करणारा मल्लीनाथ त्रिचनापल्लीचा राहणारा. त्याचे तीन-चार वंशज आश्रयार्थ राजाकडे आले असता, त्यांची व राजाची गाठ प्रभाकरभट्ट राजगुरू यांच्या द्वारा जयरामाने घालून दिली. नावे कवीने दिली नाहीत.
(२६) भीमराय : भीमराव हा जासुदांचा मुख्य असे. नाव पूर्वपरिचित नाही.
(२७) अभेद गंगाधर : एकोजी राजा संभाजीराजाच्या मरणोत्तर युवराज झाला, त्याचा अमात्य. ह्याचे आडनाव अभेद. अभेद म्हणजे अभयद. अभयद म्हणजे अभयंकर, अभ्यंकर. हे आडनाव चितपावन दिसते. हा वेदव्युत्पन्न असून अग्निहोत्री असे. मनाचा दयाळू असून पापभीरू असे. ह्याची जयरामावर कृपादृष्टी असे.
(२८) एकोजीराजे भोसले : शहाजी व तुकाई यांचा पुत्र, संभाजी व शिवाजी यांचा कनिष्ठ सापत्न बंधू. संभाजीनंतर, खरे पाहता, शिवाजीला युवराजपद मिळावयाचे. परंतु शिवाजीने त्या काळी स्वतंत्र राज्यच कमाविण्याचा उपक्रम केल्यामुळे व दूरवर्तित्वामुळे युवराजपद शहाजीने समीपवर्ती एकोजीराजास दिले. नाव एकोजी, एकराज असे दिले आहे, व्यंकोजी असे दिले नाही. खरे मूळचे नाव एकोजी, एकराज की व्यंकोजी, व्यंकटेश? कर्नाटकात हे व्यंकटेश दैवत मोठे प्रख्यात आहे. त्या प्रांतात पुत्र झाला म्हणून व्यंकटेश व्यंकोजी हे नाव शहाजीने आपल्या मुलास ठेविले असण्याचा संभव आहे. मूळ व्यंकटेश हा अपभ्रंश विकंकटेश ह्या संस्कृत शब्दाचा आहे. व्यंकटेश ह्या अपभ्रष्ट शब्दाचा अपभ्रंश वेंकट, वेंकू, एकू, एकोजी. उलटपक्षी एक हेही शहाजीच्या मुलाचे पाळण्यातील नाव असू शकेल. एक शब्दापासून एकू, एकोजी. एकोजी व एंकोजी ह्या दोन शब्दांचा उच्चार बहुतेक सारखा असल्यामुळे कोठे कोणी एकोजी असा उच्चार करीत व कोणी एंकोजी उच्चार करीत. एंकोजी उच्चार करणारे मूळ नाव व्यंकोजी समजत व एकोजी उच्चार करणारे एक समजत. ह्यातून खरे मूळ पाळण्यातील नाव कोणते त्याचा निर्णय मूळ पत्रिका वगैरे सापडल्याशिवाय करता येणे मुष्कील आहे. तत्रापि समकालीन जयराम ज्याअर्थी एकराज, एकोजी हे नाव देतो त्या अर्थी तेच मूळचे नाव असावे असा तात्पुरता निर्णय करणे वावगे नाही. सोमवंशीय पुरूरव्याच्या रयनामक पुत्राच्या पुत्राचे नाव एक असे होते. सिंह, शरभ ही जशी पुरातन भारतीय नावे तसेच एकही पुराण भारतीय व्यक्तिनाम आहे.