प्रस्तावना
(८) विश्वनाथभट्ट ढोकेकर : देशस्थ ब्राह्मण. राजाच्या मर्जीप्रमाणे चालण्यात चतुर म्हणून जयराम याचे वर्णन करतो. नाव पूर्वपरिचित नाही.
(९) नीळकंठभट्ट श्रोत्रिय : श्रोत्रिय म्हणजे श्रोत्री हे देशस्थ आडनाव पुणे, सातारा, नगर या प्रांतात आढळते. हा राजाचा श्रोत्रिय. राजापुढे भारतादि पुराण वाची. नाव पूर्वपरिचित नाही.
(१०) प्रल्हाद सरस्वती : सरस्वती हे देशस्थ आडनाव. हा दरबारी कवी होता. पूर्वपरिचित नाही.
(११) वीरेश्वरभट्ट चतुर : हा राजाच्या पदरचा गायक. चतुर हे देशस्थ आडनाव. चतुर साबाजी या मुत्सद्याच्या जोडनावात हे आडनाव आढळते. साबाजीपंत ह्या निजामशाही मुत्सद्याचे आडनाव चतुर. साबाजीपंत हा देशस्थ ब्राह्मण; कायस्थ नव्हे, हे पंत या विशेषणावरून स्पष्ट आहे. हे नाव पूर्वपरिचित नाही.
(१२) अक्कय्यशास्त्री पल्लकचेरीकर : हा तत्कालीन प्रसिद्ध शास्त्री. पूर्वपरिचित नाही. कर्नाटक ब्राह्मण.
(१३) तुकदेव : तुकदेव हे देशस्थात आडनाव आहे. हा पुराण सांगण्यात मोठा पटाईत असे. तुकदेवांचे घराणे वाई प्रांतातील आहे.
(१४) शेष पंडित : शेषपंडित म्हणजे शेषोपंत. शेष हे व्यक्तिनाम ब्राह्मणात व ब्राह्मणेतरात आढळते. शेखोजी आंग्रे म्हणजे मूळ शेषोजी आंग्रे शेषोपंतांचे आडनाव कवीने दिले नाही. नाव पूर्वपरिचित नाही. हा सर्वशास्त्रज्ञ होता म्हणून जयराम म्हणतो. जगन्नाथ हे शेषोपंतांचे आडनाव असावे. शिवाय हे पद क्लिष्टही आहे. शहाजहानकालीन जगन्नाथ पंडिताची ही स्मृती हे पद करून देते. जगन्नाथ जसा शहाजहानाच्या दरबारी तसा शेष शहाजीच्या दरबारी.