प्रस्तावना
सापडली आहेत त्यापैकी बहुतेक मामूल इनामासंबंधाची वगैरे दरबारी कारकुनांनी लिहिलेली आहेत. शिवाजीने स्वत: विनंती, आज्ञा वगैरे निशाणी केलेले पत्र सापडावयाचे म्हणजे शहाजी, संभाजी, एकोजी, जिजाबाई, रामदास, तुकाराम इत्यादी जिवलगांना लिहिलेल्या पत्रांखेरीज किंवा सामराज नीळकंठ, पिंगळे, मालुसरे, पालकर वगैरे प्रेमातल्या व विश्वासातल्या दरबा-यांना स्वत: खाजगी लिहिलेल्या पत्रांखेरीज सापडणार नाही. त्यातल्या त्यात एक पत्र धुळे येथे रा. देव यांच्या संग्रहास आहे. त्याच्या समाप्तीस शिवाजीने आपली निशाणी घातली आहे असे मला व रा. देव यांना वाटत आहे. त्या पत्राचा देवांनी गाजावाजा मुद्दाम केला नाही. अश्या हेतुने का, ते पत्र व निशाणी यांचे दर्शन घ्यावयाला कोणी हरीचा लाल येतो किंवा नाही व त्याच्या विश्वास्यता किंवा अविश्वास्यता या संबंधाने कोणी चिकित्सा करतो किंवा नाही. त्या पत्राचा फोटो देणे काही अवघड नव्हते. परंतु वरील कारणाकरिता तो मुद्दाम दिला नाही. खात्री आहे की, जसजसा शिवाजीचा खुद्द स्वत:चा पत्रव्यवहार मुबलक सापडत जाईल तसतशी शिवाजीच्या खुद्द निशाणीची पत्रे हटकून सापडतील. बाकी शिवाजीबरोबर शहाजी, एकोजी, संभाजी, राजाराम, इत्यादींची हस्ताक्षरे अद्याप सापडावयाचीच आहेत. शहाजी, एकोजी, संभाजी व राजाराम यांच्या पत्रव्यवहाराच्या संशोधनासंबंधाने एक बाब इथे पुन्हा सुचवून ठेवितो. ह्या राजाच्या कालच्या पत्रव्यवहाराची खाण पेशवाई पत्रव्यवहाराच्या खाणीखाली बुजून गेलेली आहे. म्हणजे तत्कालीन मुत्सद्यांची व लढवय्यांची घराणी पेशवाई मुत्सद्यांच्या व लढवय्यांच्या घराण्यापुढे फिकी व निस्तेज होऊन धुळीस मिळाली किंवा कोनाकोप-यात दबली आहेत. त्यांना उजेडात आणण्याला पेशवाई दफ्तरे शोधून काढण्यात जो खर्च लागला त्याहून कितीतरी पटीने जास्त खर्च लागेल.