प्रस्तावना
१३. शहाजी, एकोजी व संभाजी ह्यांनी घातलेल्या समस्यांचे वर्णन जयरामाने जसे केले तसे शिवाजीने घातलेल्या समस्यांचे वर्णन त्याने का केले नाही अशी शंका काढल्यास तिचे स्वल्पात परिहरण असे की, शक १५७५ पासून शक १५८० पर्यंतच्या काळात शिवाजी शहाजीच्या दरबारात कधीच नव्हता. शिवाजी संबंधाने जयरामाने केलेला दुसरा उल्लेख असा आहे :
टिकेचा धणी लेंक ज्याचा शिवाजी । करी तो चहूं पातशाहाशि वाजी ॥
तयाला रणा माजि हें एक माने । अरी जैं गला घालुनी ये कमानें ॥१३३॥
कवी म्हणतो की, शहाजीचा लेक व वारस जो शिवाजी तो शहाजीच्या हयातीनंतर राजत्वदर्शक जो तिलक ऊर्फ टिक्का त्याचा प्रथम हक्कदार आहे, शिवाजीने चारी पातशहास लढाईच्या रणांगणावर फिरवून घोड्यासारखे जेर केले आहे व शत्रुराजांच्या गळ्यात कमाना अडकवून त्याने त्यास नरम आणिले आहे. ह्या खेरीज तिसरा उल्लेख सबंध काव्यात शिवाजीसंबंधाने नाही. वरील श्लोक शहाजीने ऐकिलेला होता, त्यावरून उघडच झाले की, शहाजीच्या कर्नाटकातील राज्याचा भूरितम भाग टिक्क्याचा धनी जो शिवाजी त्याला मिळावा अशी शहाजीची इच्छा होती. जयरामाने केलेले शिववर्णन यथार्थ होते व ते शहाजीस मान्य होते हे सांगावयाला नकोच. शिवाजी व संभाजी यांची आई जी जिजाई तिजसंबंधाने जयराम लिहितो की,
जशी चंपकेशीं खुले फुल्ल जाई । भली शोभली ज्यास जाया जिजाई ॥
जिचे कीर्तिचा चंबु जंबुद्विपाला । करी साऊली माऊलीसी मुलाला ॥१३१॥
जिजाई ही शहाजीसारख्या धीर, उदार व पराक्रमी पुरुषाला चांगलीच साजण्यासारखी बायको होती आणि ती केवळ नव-याच्या कीर्तीवर विकत नसून, स्वत:च्या धीर, उदार व गंभीर वृत्तीने तिची कीर्ती त्या काळी सर्व भरतखंडभर पसरली होती, इतकेच नव्हे तर तिच्या कीर्तीच्या चंबूखाली म्हणजे घुमटाखाली म्हणजे घुमटाच्या सावलीखाली सर्व जंबुद्वीप म्हणजे जंबुद्वीपातील सज्जन लोक यवनांच्या जुलुमाला कंटाळून आश्रयार्थ येत असत, असे जयराम लिहितो. जिजाई ही कोणत्या तोलाची बाई होती ह्याचा अंधुक तर्क जयरामाच्या ह्या तत्समकालीन उक्तीवरून करता येतो. पुणे व सुपे प्रांताची व्यवस्था पहाणा-या, शिवाजीच्या शिक्षणाकडे लक्ष देणा-या, स्वत: गोरगरिबांचा समाचार घेणा-या व गुणी सज्जनांना आश्रय देणा-या ह्या बाईच्या कर्तबगारीचे तपशीलवार वर्णन न देता केवळ एक त्रोटक श्लोक करून कवी गप्प बसला हे पाहून कवीवर संशोधकांचा राग झाल्यास तो अयथार्थ होणार नाही.