प्रस्तावना
तात्पर्य, शंका संकुचित होता होता आता इतकी संकुचित झाली की, शिवाजीला बावन मातृका काढता व वाचता येत होत्या की नव्हत्या एवढाच प्रश्न काय तो प्रत्यक्ष पुराव्याने सिद्ध करावयाचा राहिला. हा प्रत्यक्ष पुरावा पुढे येई तोपर्यंत शंकाखोर आपला संशय सोडणार नाहीत. परंतु हा शंकाखोरपणा शंकाखोरांना फार जाचक होण्याचा संभव आहे. शिवाजीचे साक्षात हस्ताक्षर स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय शिवाजीला लिहितावाचता येत होते असे म्हणण्यास संशयखोर तयार नाहीत. परंतु ही अपूर्व शंका काढणा-यांना आम्ही असा सवाल करतो की, शहाजी, संभाजी, एकोजी व कोयाजी यांची तरी हस्ताक्षरे शंकाकारांनी प्रत्यक्ष पाहिली आहेत काय? ही भोसलेमंडळी सोडून द्या. भास्कराचार्य, जगन्नाथ पंडित, गागाभट्ट, एकनाथ, मुक्तेश्वर इत्यादी पंडितवरांची तरी हस्ताक्षरे शंकाकारांनी पाहिली आहेत काय? हे महाराष्ट्रपंडितही बाजूस ठेवू. सीझर, अलेक्झांडर, आदिलशाहा, ऍरिस्टॉटल, चॉसर ह्यांची तरी हस्ताक्षरे शंकाकारांनी पाहिली आहेत काय? ह्यांपैकी कोणाचीही हस्ताक्षरे उपलब्ध नसता, ह्यांच्या साक्षरतेसंबंधाने शंकाखोरांना संशय नाही. मग फक्त शिवाजीमहाराजावरच त्यांची एवढी करडी नजर काय म्हणून? ह्या शंकाखोरपणातील इंगित असे आहे की, ह्या शंकेखोरांची मनं फार ढिली आहेत. कोणी धूर्ताने वाटेल ती कंडी पिकविली की ह्यांना संशय पडलाच. जे जे म्हणून खरेखोटे, बरेबुरे ह्यांच्या कानावर जाईल ते ते ह्यांच्या मनावर पारख न होता गाफीलपणाने तात्काळ बिंबते. इंग्रजांचे राज्य पुढील वर्षी जाईल, स्वराज्य येत्या पावसाळ्यात सुरू होईल, आपण आर्य नसून खरे आर्य युरोपियन लोक आहेत, वगैरे शेकडो अफवा हे लोक बिनपारख ग्रहण करतात. त्यातलीच शिवाजीच्या साक्षरतेसंबंधाची भिकार अफवा आहे. पिकल्याशिवाय विकत नाही, संशय ज्याअर्थी आला त्याअर्थी येथे काहीतरी पाणी मुरत असणार, इत्यादी लौकिक म्हणींचा पगडा ढिल्या मनावर फार बसतो. तो पगडा जयरामासारख्या समकालीन कवीच्या प्रत्यक्ष पुराव्यावर विश्वास ठेवून त्यांनी आता झुगारून द्यावा व शिवाजी विद्यासंपन्न होता, इतकेच नव्हे तर त्या तैलबुद्धीच्या पुरुषाला बावन्न मातृकांचे य:कश्चित ज्ञान होते हेही बिनसंशय मान्य करावे. कुळातील बाकीच्या सर्व पुरुषांना अक्षरज्ञान होते आणि शिवाजीलाच एकटयाला तेवढे नव्हते, हा प्रवादच मुळी बाष्कळ आहे. मूळ कंडी पिकविणा-यांचा असा कुत्सित हेतू होता की, शिवाजीला अक्षरज्ञान नव्हते असा प्रवाद फैलविला म्हणजे पुढे त्याला संस्कृतप्राकृत ज्ञान नव्हते, प्रगल्भ विद्या नव्हती इत्यादी दोष इत्यादी दोष या थोर पुरुषावर सहजच लागू पडतील. परंतु जयरामकवीच्या समकालीन लेखाने ह्या कुत्सित कंड्यांना आता कायमची मूठमाती मिळाली आहे. सबब, या वादाला रजा देऊन, एतदनुषंगिक दुस-या एका प्रश्नाला जाता जाता सहज स्पर्श करू. साक्षरते संबंधाने व विद्यासंपन्नत्वासंबंधाने आता काही एक शंका राहिली नसल्यामुळे सध्या अत्यंत साधा व सीधा असा एक प्रश्न संशोधकांपुढे आला आहे की, शिवाजीचे हस्ताक्षर, अद्याप इतकी तपे संशोधने करून, कसे सापडले नाही? ह्या प्रश्नाला उत्तर असे आहे की, शिवाजीची शंभर सव्वाशे देखील अस्सल पत्रे अद्याप सापडलेली नाहीत.