प्रस्तावना

१०६. शहाजीकालीन मराठे लोक वैदिक व पाणिनीय क्षत्रियांच्याहून इतके सरस्वतीपराङ्मुख का झाले, ते महाराष्ट्री व संस्कृत भाषा सोडून अडाणी मराठी भाषा बोलू का लागले, त्यांचे किंवा त्यांच्या करिता निर्मिलेले मराठी वाङ्मय इतके बाल्यावस्थ का दिसते, आठशे वर्षे भारतरामायणाचा एकच एक पाडा मराठी वाङ्मय का वाचते, म्हसोबापासून महादेवापर्यंतचे वन्य व वैदिक देव मराठे लोक का भजतात, वैदिक मंत्र टाकून मराठी आरत्या मराठे का म्हणतात, रक्त वर्ण जाऊन श्यामल ऊर्फ सावळा वर्ण मराठयांच्या कातडीचा का झाला, मराठयांच्या डोक्यांचे मेजमाप आर्य डोक्याच्या मेजमापाहून भिन्न का येते, साम्राज्ये करण्याचे सोडून सामान्य ग्रामसंस्थाही चालविण्याची अक्कल मराठयात अद्यापही का नाही, इत्यादी गूढ भासणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याच्या मिषाने इथपर्यंतचा लेखनप्रपंच करता करता ते गूढ प्रश्न स्पष्ट व खुलासवार सुटून शंकास्थाने झाडून पुसून मोकळी झाली. मराठे हे केवळ माहाराष्ट्रिक लोक नव्हेत, केवळ नाग लोक नव्हते, किंवा केवळ उत्तरदेशीय क्षत्रिय नव्हते; ते मुख्यत: नाग व माहाराष्ट्रिक ह्या लोकांच्या मिश्रणापासून निपजलेले अगदी नवीन लोक आहेत, बालराष्ट्र आहेत, सबब, भाषा, वाङ्मय, कर्तबगारी, उपासना, धर्म, देवधर्म, चालीरीती व राजकीय उमेद इत्यादी तत्संबंधक सर्व बाबी बाल्यदशेत आहेत, त्या प्रौढ दशेतील असतील अशी अपेक्षा करणेच मुदलात अनैतिहासिक आहे. शहाजी व शिवाजी ह्या उत्तरदेशीय भोजक्षत्रियांच्या नंतर फक्त पंचवीस वर्षात सर्व राजकीय सत्ता चित्पावन ब्राह्मणांच्या हाती का गेली, पुढे शंभर वर्षांनी चित्पावनसत्ता अस्तंगत झाली असता मराठयांच्या हाती राजसत्ता जाणे शक्य का नव्हते, अद्याप मराठा क्षत्रिय व मराठा कुणबी बहुतेक निरक्षर स्थितीत का आहेत, इत्यादी अनेक प्रश्नांचीही उत्तरे वरील तपशिलाच्या साहाय्याने सुलभ होतात. एणेप्रमाणे ६३ व्या कलमात केलेल्या प्रतिज्ञेनुरूप शहाजीकालीन मराठे म्हणजे कोण लोक आहेत व ते इतके निकृष्टावस्थ काय म्हणून दिसतात, इत्यादी प्रश्नांची उत्तरे दिली. ह्या उत्तरदानांत जी विवेचनसरणी अनुसरावी लागली व गर्भितार्थाची जी पुष्टी होऊ द्यावी लागली तिची स्मरणी नमूद करून ठेवितो :

१) प्रथम ब्राह्मण ऊर्फ ब्रह्मन् हा एकच शुक्लभास्वरवर्णी वर्ण होता.

२) त्याला रक्तलोहितवर्णी क्षत्र ऊर्फ क्षत्रिय लोक भेटून ब्रह्मक्षत्रनामक द्वैवर्ण्य बनले.

३) पुढे पीतवर्ण विश् लोक समावून त्रैवर्ण्य उत्पन्न झाले.

४) शेवटी उत्तरकुरूत व उत्तरमद्रांत कृष्णवर्ण क्षुद्रांचा समावेश होऊन जगत्प्रसिध्द चातुर्वर्ण्य निर्माण झाले.

५) मूळ एकाच शुक्लभास्वरवर्णी लोकांचे तांबडे, पिवळेव काळे असे भिन्न वर्ण होणे अशक्य आहे. पांढरे, तांबडे, पिवळे व काळे लोक जसजसे भेटले तसतसे क्रमश: मिळत जाऊन ऐकवर्ण्य, द्वैवर्ण्य, त्रैवर्ण्य व चातुर्वर्ण्य अशा चार रूपांतून ही चातुर्वर्ण्यसंस्था क्रमश: उद्भवली.