प्रस्तावना
तात्पर्य, आदिलशाही राज्यात जी पदवी शहाजीराजाने कमविली होती तीच पदवी मीरजुमल्याने कुतुबशाही राज्यात साधिली. तीनशे मैल लांब व पन्नास मैल रूंद इतक्या विस्तीर्ण प्रदेशावर ह्याचे राज्य पसरलेले असून, त्याची हद्द शहाजीच्या बंगळूरच्या राज्याला येऊन भिडली. नंतर ती हद्द सरकत सरकत आदिलशाही प्रांतात घुसली. अर्थात भांडण उपस्थित झाले. त्याला तोंड देण्यास त्याच्याहूनही सवाई असा खंदा सरदार पाठविणे जरूर; करता शहाजीराजाची रवानगी तिकडे झाली. आपल्या जहागिरीची तसनस होऊ नये, म्हणून शहाजीला ह्या मोहिमेची सरदारकी पत्करणे इष्टच होते. शिवाय, कर्नाटकची हवालदारी कायमची पत्करल्यासारखी स्थिती शहाजीची गेली दहा वर्षे झालीच होती. कर्नाटकात कोणतीही मोहीम होवो; तीत प्राय: शहाजी शक १५५९ पासून असेच असे. शहाजीला पाठविण्यात महमदशहाचा अंत:स्थ हेतू असा होता की, मीर जुमल्यासारख्या जबरदस्ताशी सामना करण्यात शहाजी प्राणसंकटी पडला किंवा पराभूत झाला तर आपल्या अस्तनीतील केवळ आगच विझली. शहाजी बंगळूरप्रांतात जाऊन पाहतो तो त्याच्या नजरेस असे आले की, बिदनूरच्या डोंगराळ मुलखातील शिवाप्पा नाईक, पेनगोंड्याचा राजा रायल, तसाच अल्लमगडचा नायक वगैरे पाळेगार उठले असून, उपद्व्यापी व संपत्तीच्या मदाने धुंद झालेला मीर जुमला खुद्द बंगळूर प्रांताचा काही भाग बळकावून बसला आहे. तेव्हा, सर्वात विशेष प्रबळ असा जो मीर जुमला त्याचा समाचार शहाजीने प्रथम घेतला. जयराम लिहितो की, शहाजीने मीर जुमल्याची इतकी पराकाष्टेची दुर्दशा उडवून दिली की, थकून व रंजीस येऊन तो जवाहि-या धड लढेही ना, धड आडकाठीही करी ना किंवा धड खडा राहून भिडे ही ना. एक पळण्याचा तेवढा धडा जुमला जेरीस येऊन गिरवीत बसला. शेवटी दे माय धरणी ठाय अशी हबेलंडी होऊन, जुमला शहाजीचे रट्टे खात खात गुत्तीच्या किल्ल्यात शिरला. तेव्हा शहाजीने वेढा देऊन चोहो बाजूंनी रस्ता बंद केला. शेवटी दाती तृण धरून जुमला एकदा शहाजी सांगेल तो तह मान्य हाती लागून शिवाय जडजवाहीर वगैरेही शहाजीस बरेच मिळाले. जुमला शहाजीस पेषकस म्हणजे खंडणी व लढाईचा खर्च देण्यास राजी झाला. ह्या युद्धाचा असा परिणाम झाला की, कुतुबशहा किंवा त्याचा कोणी सरदार यांनी पुन: कर्नाटकात तोंड म्हणून दाखविले नाही की पुन: पाऊल म्हणून घातले नाही. पूर्व समुद्रापर्यंत सारे कर्नाटक शहाजीच्या चरणी मिलिंदायमान झाले. मीर जुमला हिंदुस्थानातील व हिंदुस्थानाबाहेरील सर्व मोठमोठ्या दरबारात प्रसिद्ध असून, त्याचा धुव्वा शहाजीने उडविला ही बातमी जेव्हा शहरोशहरी व प्रांताप्रांती पसरली तेव्हा शहाजीच्या सामर्थ्याची बडेजाव चोहोकडे झाली. जयराम लिहितो, ह्या पराक्रमाने शहाजीचे नाव सेतुबंधरामेश्वरापासून रूमशामपर्यंत ज्याच्या त्याच्या तोंडी निघू लागले. जुमल्यासारख्या तोलदार सरदाराची ही दुर्दशा उडालेली पाहून शहेनशहा जो शहाजहान तोही दचकला. महमद आदिलशहा तर मनातल्या मनात खजील होऊन गेला. मीर जुमल्यावर जय मिळून आदिलशाहीचा दबदबा राहिला, या विचाराने यद्यपि त्यास आनंद झाला, तत्रापि शहाजीचा बोलबाला अंदाजाबाहेर झालेला पाहून तो अतिशय विषण्ण होऊन गेला. शहाजीने विजापूरचे नाव राखिले, शहाजीच्या पराक्रमाने आदिलशाहीचे रक्षण झाले, वगैरे गौरवाची भाषा तो वापरी, पण त्या भाषेत तथ्य केवढे थोरले भरले आहे हे मनात येऊन, त्याला शहाजीचे भय वाटे.