प्रस्तावना

४५. शक १५७५ च्या कार्तिकमार्गशीर्षात जुमल्याची वाताहत केल्यावर शहाजीने कर्नाटकातील चिल्हर संस्थानिकांकडे लक्ष दिले. विजयानगरच्या रायलूने रामराव नावाचा वकील औरंगजेबाकडे मदतीकरिता पाठविला असून, त्याने प्रांतात स्वत:त बहुत बंडाळी आरंभिली होती. त्याचा शहाजीने जंतकल येथे पराभव केला (जयराम) आणि पेनकोंडा, कर्नूळ, वेल्लोर, कपली वगैरे पूर्वेकडील प्रांत काबीज केले. पेनकोंड्याच्या स्वारीत नबाब इखलासखान शहाजीच्या बरोबर होता. परंतु, शहाजीच्या सूर्यप्रकाशापुढे त्याच्या दिवटीचे तेज फारसे पडले नाही. नंतर १५७६ च्या वैशाखज्येष्ठात अल्लमगड काबीज करून शहाजीने फिरंग्यांच्या गोवा प्रांतावर स्वारी केली आणि तेलीचेरीपर्यंत दौड करून बहुतेक सर्व कर्नाटक आपल्या अंमलाखाली पूर्ववत आणिले. ह्यावेळी त्याच्या जवळ साठ सत्तर हजार फौज होती, असे जयराम लिहितो. येणेप्रमाणे कर्नाटक मोकळे केल्यावर शहाजी बहुतेक स्वतंत्र राजाप्रमाणे राहू लागला. त्याच्या दरबारच्या थाटाचे वर्णन जयरामाने केलेले मागे दिलेच आहे. शहाजीचे प्रस्थ इतके बेसुमार वाढलेले पहाण्यास ह्यापुढे महमद आदिलशहा फार वर्षे जगला नाही. अलीकडील दोन वर्षांत तो दुखण्याने अंथरुणावर पडूनच होता. शक १५७७ त शिवाजीने चंद्रराव मो-याला मारून जावळी घेतली, प्रतापगडचा किल्ला बांधिला व पूर्वेकडील आदिलशाही प्रांतावर तो चालून येणार, अशा बातम्या उठल्या. ह्या खबरा येऊन थोडा काळ जातो न जातो तो शक १५७८ त शिवाजीने रायगड व सुपे काबीज केल्याचे वृत्त येऊन थडकले. इकडे कर्नाटकात शहाजीचा पुत्र संभाजी कनकगिरीच्या संस्थानिकाची बंडाळी मोडण्यास शक १५७७ त गेला. त्याच कामगिरीवर अफजलखानही जात होता. अफजलखानाचे व शहाजी-संभाजीचे फार दिवसांचे वाकडे होते. त्याने उचल खाऊन संभाजीचे व अफजलखानाचे कनकगिरीस भांडण झाले. त्यात गोळा लागून संभाजी मरण पावला. त्यामुळे सहजच शहाजीचा राग अफजलखानावर झाला. येणेप्रमाणे पुण्याकडील व बंगळूरकडील काळजी उत्पन्न करणा-या बातम्या एका पाठीमागून एक ऐकून आधीच खंगून गेलेला महमदशहा जास्त थकून शक १५७८ च्या मार्गशीर्षात मरण पावला व इहलोकच्या शारीरिक व राजकीय यातनांचा वारसा आपल्या एकोणीस वर्षांच्या मुलास देता झाला. महमद आदिलशहाच्या कारकीर्दीत, आदिलशाही राज्याचा विस्तार पूर्वीच्या इतर शहांच्या कारकीर्दीतल्याहून दिसण्यात जास्त झालेला दिसतो. उत्तरेस भीमानदी पासून दक्षिणेस त्रावणकोर संस्थानापर्यंत आणि पूर्वेस पूर्व समुद्रापासून पश्चिमेस पश्चिम समुद्रापर्यंत जेवढा म्हणून मुलूख आहे तेवढा सर्व आदिलशाही अंमलाच्या नावाखाली शक १५७८ त होता. त्यामुळे वरवर पाहणा-या लेखकांना ही कारकीर्द, विस्तार, शक्ती व ऐश्वर्य या तीन बाबतीत अत्युच्च कोटीप्रत गेलेली भासते (जदुनाथकृत औरंगजेबाचा इतिहास). परंतु हा केवळ भास आहे. वस्तुस्थिती अगदी निराळी होती. कारण, तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील सर्व म्हैसूरप्रांत व कर्नाटक प्रांत शहाजीच्या अंमलाखाली बहुतेक स्वतंत्र झाला होता आणि कृष्णेच्या व भीमेच्या पश्चिमोत्तरीय सर्व प्रांत शिवाजीने सर्वस्वी आक्रमिलेला होता. हे दोन भाग वगळले - आणि ते वगळणे इतिहासदृष्टीने अवश्य आहे - तर बाकी जो प्रांत राहतो त्याचा विस्तार महमदशहाच्या पूर्वीच्या कारकीर्दीतील राज्यविस्ताराहून कमी होता, हे कबूल करणे भाग आहे. हा विस्तार कमी का झाला? ह्या प्रश्नाचे उत्तर कठीण नाही. शक्ती व सामर्थ्य कमी झाले म्हणून विस्तारही संकोच पावला. थडगी, मशिदी, घुमज व रंगमहाल यात सर्व पैसा चूर होऊन, विजापूर शहरात थोडेसे ऐश्वर्य दिसे. परंतु ते त्या शहरापुरतेच होते. शहराबाहेर सर्व मराठा देश कंगाल व कलाहीन बनून गेला होता. तात्पर्य, महमदशहाच्या कारकीर्दीत आदिलशाहीचा विस्तार, सामर्थ्य व ऐश्वर्यही उत्तरोत्तर संकोच पावत होती.