प्रस्तावना

ह्या कला जर महाराष्ट्रातील महरट्ट लोकांच्या असत्या, तर चालुक्यराष्ट्रकूटादि राज्यकर्ते गेल्याबरोबर देशातून त्या समूळ नाहीशा झाल्या नसत्या. पुढे मराठयांच्या अंमलात त्या पुन: उदयास आल्या असत्या म्हणावे तर दोन अडीच शे वर्षांच्या मराठयांच्या अमदानीत एकही देऊळ किंवा एकही मूर्ति किंवा एकही चित्र असे दाखविता यावयाचे नाही की जे चालुक्यादींच्या देवालयाशी किंवा मूर्तीशी किंवा चित्राशी दूरचीही बरोबरी करील. ह्या सा-या रडगाण्याचा अर्थ असा की माहाराष्ट्रिक लोक बऱ्याच कनिष्ठ संस्कृतीचे लोक होते. साम्राज्ये चालविण्याची कला जशी त्यांच्या आटोक्याच्या बाहेरची होती तशाच इतरही उच्च कला त्यांच्या हो-यात येण्यासारख्या नव्हत्या.

९७. भाषेच्या वाङ्मयाच्याही प्रांतात माहाराष्ट्रिक लोक असेच मागसलेले होते. शाकवाहनांच्या कारकीर्दीत राज्यकर्ते प्राकृत भाषा बोलणारे पडल्यामुळे, महाराष्ट्री भाषेला किंचित उत्तेजन मिळाले. त्या उत्तेजनाचे फल एवढेच झाले की शे दोनशे महाराष्ट्री कवी किंचित् गुणगुण करू लागले. गाथासप्तशतीत बऱ्याच महाराष्ट्री कवींच्या कृतीतील उतारे हाल शातवाहनाने दिले आहेत. ह्या काव्यप्रांताखेरीज शास्त्र, व्याकरण, मीमांसा, गणित, ज्योतिष, स्थापत्य, इतिहास इत्यादी गहन विषयांवर महाराष्ट्रात एक ओळही लिहिली गेली नाही. रावणवहो, गौड वहो, कर्पूरमंजरी ही हलक्या वाड्मयावरील पाच चार मोठी म्हणावयाची पुस्तके काय ती महाराष्ट्री भाषेतील ग्रंथसंपत्ती होय आणि हेही पाच चार ग्रंथ महाराष्ट्री भाषा मृत्युपंथास लागल्या काळचे आहेत, महाराष्ट्रीच्या ऐन तारुण्यातील नव्हते. जैनमहाराष्ट्रीही निराळीच बोली असल्यामुळे, तीतील धर्मादिविषयक ग्रंथ प्रस्तुतप्रकरणी जमेस धरण्यासारखे नाहीत. संस्कृत नाटकात उच्च स्त्रियांच्या तोंडी जी पद्ये कवींनी घातलेली आढळतात ती एवढेच दाखवितात की महाराष्ट्री भाषेत सुंदर पद्यरचना बरीच कमाविली गेली होती. उच्च स्त्रियांच्या तोंडी महाराष्ट्रिक स्त्रियांशी विवाह करण्यात भूषण मानीत, अशाकरिता की ह्या महाराष्ट्रिक ऊर्फ माहाराजिक लोकांचा वंश त्याकाली अत्यंत शुध्द गणिला जाई. असा हा माहाराष्ट्रिकांच्या भाषेचा एकंदर पल्ला होता. वाड्मयवैपुल्याच्या दृष्टीने किंवा भारदस्तपणाच्या दृष्टीने हा पल्ला अत्यंत क्षुद्र होता. पण तोही थोडक्याच अवधीत संपुष्टात आला. शक पाचशेच्या सुमारास महाराष्ट्री भाषेला उतरती कळा लागली. शक पाच शे पर्यंत शिलालेख, ताम्रपट, काव्यग्रंथ वगैरे लिखाण प्राकृत भाषेत होत असे, ते चालुक्यांच्या अमदानी पासून बंद पडून संस्कृत भाषेत होऊ लागले. व्रात्यांच्या व पतितांच्या व पाखंडांच्या बौध्दक्रांतीला व त्यांच्या प्राकृत भाषांना आळा घालता घालता, वैदिक धर्माचे व संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन ब्राह्मणांना व त्रैवर्णिकांना शक चारशेपाचशेच्या सुमारास शक्य झाले. संस्कृतसिंह आखाडयात उतरल्याबरोबर प्राकृतमर्कटांनी भयाने बहुतेक प्राणत्याग केला. महाराष्ट्री भाषा सरकारदरबारांतून मागे पडावयालावैदिक धर्माचे पुनरुज्जीवन हे तर एक कारण झालेच. परंतु ह्याहून ही जबरदस्त कारण कित्येक शतके महाराष्ट्री भाषेला समाधी देण्याचे काम संथपणे करीत होते. ते कारण सामाजिक होते. महाराष्ट्रिक लोक ज्या काली दक्षिणारण्यात वसाहती करण्यास उतरले त्याकाळी त्यांना ह्या प्रदेशात त्यांच्याहूनही संस्कृतीने कनिष्ठ असे दुसरे एक लोक भेटले. हे लोक म्हणजे ज्यांना नागलोक म्हणतात ते. जनमेजयाने जेव्हा सर्पसत्र म्हणजे नागांचा नायनाट आरंभिला तेव्हा हे लोक उत्तरेतून दक्षिणेत आले. जनमेजयाच्या वेळची जी जुनाट संस्कृत म्हणजे वैदिक भाषा तिचा अपभ्रंश हे नाग लोक बोलत. ह्या नागलोकांची एकंदर संस्कृती महाराष्ट्रिकांच्या संस्कृतीहूनही खालच्या दर्जाची होती. ह्यांशी शरीरसंबंधादि मिलाफ माहाराष्ट्रिकांचा होऊन आस्तेआस्ते माहाराष्ट्रिक व नाग ह्यांच्या मिश्रणापासून एक नवीन राष्ट्र उत्पन्न होत होते. हे नवीन राष्ट्र म्हणजे ज्यांना महरट्टे, म्हराटे, म-हाटे, मराठे म्हणतात ते.