प्रस्तावना

३९ शहाजीलाही आदिलशाही चाकरी मनापासून आवडत होती असे नाही. स्वतंत्र संस्थान पुनरुज्जीवित करून त्याची वजिरी मुखत्यारीने ज्याने नुकतीच केली, वजिरीकरता स्वत:च राज्याधिकार बळकावून स्वत:च हिंदू राज्य स्थापिण्याची ज्याची ईर्ष्या, लहानगा मूर्तिजा दरबाराला भितो ह्या मिषाने तख्तावर त्यास घेऊन बसण्याचा परिपाठ पाडून दरबा-यांच्या नजरेला हिंदू राजा तख्तावर बसलेला पहाण्याची सवय ज्याने लाविली त्या मुत्सद्याला व सरदाराला दुस-याच्या दरबारी चाकरी करण्यात भूषण वाटणे शक्य नव्हते. केवळ अपरिहार्य प्रसंग म्हणून आदिलशाही चाकरी शहाजीने पत्करिली. ज्या सैन्याच्या दरा-याहून माहुलीहून शरीराला व अभिमानाला दुखापत न होता, शहाजीला अब्रू कायम राखून निघता आले ते निवडक सैन्य घेऊन तो आदिलशाहीत गेला. जरूर नसल्यामुळे, पागा, हत्ती, उंट, तोफखाना वगैरे जंगी सरंजाम जागजागी पुणे, चाकण, सुपे वगैरे आपल्या जहागिरीतील महाली ठेवून, फक्त घोडे व स्वार शहाजीच्या बरोबर होते (शिवदिग्विजय १२३). शहाजीच्या ह्या सरंजामाचा पुढे शिवाजीने उपयोग केला. बरोबर हणमंते, अत्रे, चतुर, उपाध्ये, पुरोहित वगैरे कारकून म्हणजे कारभारी मंडळीही नेली. जहागिरीत पुण्यास दादोजी कोंडदेव, विसापुरास बिलाल हबशी, चाकणास फिरंगोजी नरसाळा, सुप्यास संभाजी मोहिता व पुरंधरास नीळकंठराव, ह्या विश्वासातील इसमांकडे तेथील सोपणूक करून, पागा वगैरेंची जतणूक करण्यास सांगितले. ही मंडळी आदिलशाही सरकारच्या देण्याचा वेळच्या वेळी फडशा करून, जहागीरदाराचा पैसा दादाजीपंताकडे शिल्लक ठेवी. हे द्रव्य शिवाजीस पुढे उपयोगी पडले. विजापूरास जाताना शहाजीने आपल्या कबिल्याची व्यवस्था दादाजी कोंडदेवाच्या सल्ल्याने येणेप्रमाणे केली. शहाजीच्या कुटुंबातील खाशी माणसे ह्या वेळी म्हटली म्हणजे, वडील स्त्री जिजाबाई, धाकटी स्त्री तुकाबाई, रक्षास्त्री नरसाबाई व आणिक एक उपस्त्री, मिळून चार स्त्रिया; जिजाबाईचे पुत्र संभाजी, शिवाजी व एक कन्या; तुकाबाईचा पुत्र एकोजी; नरसाबाईचा पुत्र संतूजी किंवा संताजी आणि निर्नाक दुस-या उपस्त्रीचा पुत्र कोयाजी अशी कुटुंबातली एकंदर खाशी मंडळी दहा होती. पैकी, वडील पुत्र संभाजी, धाकटा पुत्र एकोजी व रक्षापुत्र संतूजी व कोयाजी व त्यांच्या तीन आया शहाजीबरोबर कायमच्या विजापूरास गेल्या. जिजाबाई व मधला मुलगा शिवाजी व त्याची बहीण, अशी तिघे जण कधी विजापूरास व प्राय: पुण्यास जहागिरीवर दादाजीपंताच्या सहवासात जाऊन येऊन असत. जिजाबाईची त्यावेळी सुमार चाळिशीची उमर असून, ह्यापुढे तिला संतती झाली नाही. संभाजी, शिवाजी व एक मुलगी अशी तीनच अपत्ये तिची जगली होती. आणिक चार पाच अपत्ये तिला झाली होती म्हणून बृहदीश्वरशिलालेखकार लिहितो. ती सर्व लहानपणीच निवर्तली. शक १५२५ त लग्न झाल्यापासून शक १५५८ त शहाजी विजापूरास जाईतोपर्यंतच्या तेहतीस वर्षात शिंदखेड, दौलताबाद, अहमदनगर, परंडा, भीमगड, संगमनेर, त्र्यंबक, वैजापूर, जुन्नर, पुणे, कोंडाणा व शेवटी माहुली अशा अनेक स्थलींची ऐश्वर्ये, संकटे, पळापळी, धराधरी, लढाया, खून, छापे, द्वंद्वयुद्ध इत्यादी भारततुल्य प्रसंग पाहून व सोहाळे भोगून शहाजीच्या धोरणाचा तिला पूर्ण अभ्यास व अनुभव आला होता. एक लढण्याची कला सोडून दिली, तर बाकीच्या बहुतेक सर्व राजकीय कला शहाजीच्या इतक्याच तिच्या अंगवळणी पडल्या होत्या. अकबर, जहांगीर, शहाजहान, इभ्राइम आदिलशहा, महमद आदिलशहा, चांद बिबी, मलिकंबर, फतेखान, लोदी, मोहबतखान, नूरजहान, आसदखान, खवासखान, मुस्तफाखान, मूर्तिजा निजामशहा व आदिलशाहीतील प्रसिद्ध व्यक्तींचे गुणदोष तिने प्रत्यक्ष पाहिले असून मालोजी, शहाजी, विठोजी, खेळोजी, लखुजी, अचलोजी इत्यादी सासर-माहेरच्या मंडळींच्याही प्रकृत्या तिने अनुभवलेल्या होत्या. नवरा मोहिमेवर असताना त्याच्याबरोबर तिने लढाया पाहिल्या होत्या व बरोबर नसल्यावेळी प्रांताची न्यायमनसुबी केलेली होती. अशा या कर्त्या व पोक्त बाईच्या हवाली पुण्याकडील जहागीर करून, दादाजी व सोनोपंत या वृद्ध मुत्सद्यांच्या सल्ल्याने शिवाजीचे व जहागिरीचे पालनपोषण करण्यास ह्या बाईस शहाजीने आपला प्रतिनिधी नेमिले व निर्धास्त अंत:करणाने विजापूरचा रस्ता धरिला. शिवाजीचे वय ह्या वेळी नऊ वर्षांचे असून, जिजाबाई व शहाजी यांच्या बरोबर दौलताबादेपासून माहुलीपर्यंतच्या स्थळी त्या त्या काळी तो होता.