प्रस्तावना
३८ माहुलीचा किल्ला शक १५५८ च्या कार्तिकात रणदुल्लाखानाला खाली करून दिल्यानंतर, शहाजी आपल्या जहागिरीच्या प्रिय अशा पुणे प्रांतात गेला व तेथे आपले दहा पंधरा हजार सैन्य व लढाऊ सरंजाम म्हणून काही काळ राहिला. शहाजहानाची पातशाही मनसबदारी करण्याची शहाजीला बिलकुल सोय नव्हती. कारण असला महत्वाकांक्षी व मसलती चाकर शहाजहानाला मानवण्यासारखा व पचण्यासारखा नव्हता. फक्त मामुली वहिवाट म्हणून व पातशाही मुत्सद्यांच्या कानाला गुदगुल्या व्हाव्यात म्हणून आपण पातशाही चाकर होण्यास खुषी आहोत असे शहाजीने माहुली खाली करून देताना बोलणे लाविले होते. परंतु ते केवळ सामोपचारिक होते. शहाजी पातशहाकडे जात नव्हता व पातशहालाही शहाजी नको होता. असल्या नाकापेक्षा जड मोत्याची वेसण आपल्या नाकाला सुखासुखी कोण अडकवून घेतो? स्वतंत्र संस्थान पुणे प्रांती उभारण्याला हा काळही समीचीन नव्हता. नाहीतर अडीच वर्षे स्वतंत्र राज्य चालविलेल्या शहाजीने तो उपक्रम अंमलात आणिल्याशिवाय ठेविला नसता. निजामशहाच्या नावावर अडीच वर्षे स्वतंत्र राज्य शहाजीला जसे चालविता आले तसे आपल्या स्वत:च्या नावावर ते तो चालवू जाता तर शहाजान, आदिलशाहा व कुतुबशहा असे सर्वच मुसलमान त्याला विरोध करते. निजामशहाचे नाव पुढे केल्यामुळे आदिलशाहा व कुतुबशहा त्याला थोडेफार अनुकूल होते. तत्रापि शहाजहान प्रतिकूल होता. दिल्लीच्या यवनाला सगळ्याच शाह्या खावयाच्या होत्या. तो नवीन स्थापिल्या जाणा-या हिंदूशाहीला तर मुळीच टिकू न देता. मोंगल, आदिलशाहा व कुतुबशहा या तिघांना धाब्यावर बसवून त्यांच्या नावावर स्वतंत्र राज्य चालविण्याला देशातील जाणत्या व कर्त्या मराठा व ब्राह्मण मंडळींचा जो नि:स्वार्थ पाठिंबा व सहकारिता लागते तिची जाणीव महाराष्ट्रात अद्याप व्हावी तितकी उत्पन्न झाली नव्हती. शहाजीच्या यत्नाने ती नुकती कोठे पैदा होऊ लागली होती. स्वतंत्र राज्य आपल्यालाही चालविता येते; ही जाणीव ब्राह्मणांना व मराठ्यांना शहाजीच्या नेतृत्वाखाली जी अल्पस्वल्प आली ती पुढे उत्तरोत्तर वाढत जाऊन शिवाजीच्या उपयोगी पडली, सध्या शहाजीच्या उपयोगी पडण्याजोगी नव्हती. तेव्हा हाही विचार शहाजीला तूर्त बाजूस ठेवावा लागला. कोणतेही हत्यार आणि त्यातल्या त्यात सैन्यासारखे बोलते, चालते जिवंत हत्यार, रिकामे ठेविले असता धन्याला इजा करते आणि निकामी राहू दिले तर गंजून निरुपयोगी होते. करता बाळगलेले सैन्य कामगिरी मिळून जेथे गुंतले जाईल असे स्थळ शोधून काढण्याचा मार्ग तेवढा शहाजीला खुला राहिला. एतदर्थ त्याने नारो त्रिमळ हणमंते मुजुदार या आपल्या इतबारी मुत्सद्याला (शिवदिग्विजय पृष्ट ५०) विजापूरास पाठविले. महमद आदिलशाहाला शहाजीसारख्या सरदाराच्या मदतीचे अगत्य ह्या वेळी विशेषच भासत होते. आदिलशाही दरबार व लष्कर किती दुर्बल झाले होते ते गेल्या लढाईत निदर्शनास आलेच होते. स्वत:च्या प्रांताचेही संरक्षण त्यांच्या हातून नीटपणे होणे कठीण पडत असे. त्यात नवीन मिळालेल्या निजामशाही प्रांताची व्यवस्था लावण्याच्या ओझ्याची भर पडली. खेरीज कर्नाटकातील पुंड पाळेगारांनी दक्षिणेकडील आदिलशाही प्रांतात कैक वर्षे दंगा चालविला होता. करता आदिलशाहीला शहाजी सारख्या कर्त्या सरदाराची जरूर होती. प्रसंगी शहाजहानासारख्या सार्वभौमालाही तोंड देण्यास उत्सुक असा सरदार आपल्या बाजूस असणे आदिलशहाला इष्ट होते. अशा ह्या अनेक कारणांचा समवाय होऊन आदिलशाहाने शहाजीराजास आपल्या दरबारी येण्याचे आमंत्रण पाठविले. बखरकार लिहितो की, शहाजीचा आदिलशहाने बहुत गौरव केला, शहराबाहेरील एका बागेत बैठक करून बराबरीचे इराद्याने शहाजीची भेट घेतली आणि पुणे वगैरे पूर्वीची निजामशाही जहागीर कायम करून, नवीन कनकगिरी वगैरे प्रांत सैन्याच्या खर्चास लावून दिले. विजापूरी सरदारीचा बंदोबस्त प्रमाथी संवत्सरी म्हणजे शक १५६१ त कायमचा कागदोपत्री झाला. शिवदिग्विजयकाराने शहाजी १५४८ त प्रथम विजापूरास गेल्याचा शकाचा आकडा आणि ह्या दुस-या खेपेस विजापूरास सरदारी कायम मिळाल्याचा संवत्सर यांची एका ठिकाणी गफलत केली आहे.