प्रस्तावना
आंध्र, आंध्रजातीय, आंध्रभृत्य, शालिवाहन, शाकवाहन आणि शातवाहन, अशा सहा संज्ञा आंध्रभृत्य म्हणून जे राजे महाराष्ट्रदेशात झाले त्या राजांना लावलेल्या पुराणातून, शिलालेखातून व संस्कृतग्रंथांतून आढळतात. ह्या संज्ञांचा अर्थ काय! प्रथम शालिवाहन शब्द घेऊ. वाहनं आहित्तात् (८-४-८) या सूत्राप्रमाणे शालिवाहन असे णकारान्त रूप असावयास पाहिजे, परंतु सर्वत्र निरपवाद शालिवाहन असे नकारान्त रूप आढळते. याचा अर्थ इतकाच की शालिवाहन हे नकारान्त रूप योजिणारे जे आंध्रभृत्य म्हणून कोणी लोक ते पाणिनीय कालीन शालिवाहण हे शुध्द म्हणजे संभावित रूप न योजिता, अशुध्द म्हणजे अशिष्ट शालिवाहन असे नकारान्त रूप योजीत. म्हणजे आंध्रभृत्य हे स्वत:च्या नावाचा शिष्टउच्चार न करता, अशिष्ट उच्चार करीत. अर्थात सकृद्दर्शनी असे म्हणावे लागते की आंध्रभृत्य लोक संस्कृत उच्चार करणारे नसून प्राकृत उच्चार करणारे लोक होते. अर्थात, शालिवाहन हा शब्द व हे नकारान्त उपनाम पाणिनिकालानंतर प्रचारात आहे. इतिहासावरून सिध्दच आहे की शालिवाहन राजे पाणिनि नंतर अनेक शतकांनी उदयास आले. अपभ्रष्ट उच्चारावरूनही हीच बाब सिध्द होत आहे. हे झाले उच्चारासंबंधाने. आता शालिवाहन या शब्दाचा अर्थ काय ते पाहू.
वाहनं आहितात् (८-४-८) या सूत्राप्रमाणे शालिवाहण हा सामाजिक शब्द शालयो बाह्मा: यस्मिन् वाहने तत् शालिवाहणम्. साळीचे भात भरलेली जी गाडी तिला पाणिनीय काली शालिवाहण म्हणत. शालिवाहण हे विशिष्ट चिन्ह ज्यांचे ते शालिवाहण लोक किंवा कुटुंब. कदंब वृक्ष हे ज्यांचे विशिष्ट देवक त्या कुटुंबाचे जसे कदंब हे आडनाव, तसेच शालिवाहण हे विशिष्ट देवक ज्यांचे ते शालिवाहण या कुटुंबाचे आडनाव. शालिवाहण राजांचे शालिवाहण हे देवक असण्याचे कारण असे दिसते की ज्या देशात हे लोक प्रथम रहात असत तेथे साळीचे तांदूळ हे निर्वाहाचे मुख्य धान्य असे. असा देश म्हटला म्हणजे शालिवाहनांचा आंध्र देश. आंध्रदेशात खाण्याचे मुख्य धान्य साळीचे तांदूळ अद्यापही आहेत व पुरातन कालीही होते. तात्पर्य, शालिवाहन हे आडनाव धारण करणारे राजघराणे मूळचे आंध्रदेशीय होते, हे शालिवाहन या शब्दावरून सिध्द होते. इतिहासावरून व शिलालेखावरून सर्वप्रसिध्दच आहे की शालिवाहनराजे आंध्रदेशीय होते.
आता शाकवाहन या शब्दाचा अर्थ करू. पाणिनीयदृष्टया शाकवाहण असा हवा. ज्या अर्थी शाकवाहन असा पाठ सर्वत्र आढळतो त्याअर्थी शालिवाहन शब्दावर जी टीका केली ती सर्व याही शब्दाला लागू पडते. शाकवाहण म्हणजे भाजीची गाडी. विशेषत: आळू वगैरे भाजीची गाडी. आंध्रदेशातील भात खाणाऱ्या लोकांना आळू वगैरे भाजीही पुरातनकालापासून फार आवडत असे असे दिसते. सबब शालिवाहन आडनावाइतकेच शाकवाहन हेही आडनाव आंध्रजातीय राजांच्या एका कुळाला लागले जावे हे साहजिक आहे. पाणिनीच्या क्तेन नत्र्विशिष्ठेनानत्र् (२-१-६०) या सूत्राला शाकपार्थिवानां सिध्दये उत्तरपदलोपस्योपसख्यानं हे वार्तिक कात्यायन जोडतो. शाकप्रिय: पार्थिव: शाकपार्थिव:। भाजी ज्या राजाला विशेष आवडते तो शाकपार्थिव म्हणावा, असे कात्यायन सांगतो. पाणिनीला हा शाकपार्थिव शब्द व अर्थात अर्थ माहीत नाही. कात्यायनकाली भाजी विशेषत: आळादिकांची भाजी ज्या राजांना प्रिय होती अशा राजांना शाकपार्थिव ही संज्ञा कात्यायनकाली सर्वतोमुखी झालेली होती व भाषेत रूढ होऊन गेली होती, सबब कात्यायनाने हा शाकपार्थिव शब्द नमूद करून ठेविला. तर कोणी य:कश्चित् माणूस भाजीवर सडकून हात मारणारा असता तर त्याच्या संबंधाने शाकमनुष्य: इत्यादी संज्ञा प्रचलित झाल्या असत्या की काय याचा फारसा संशय घ्यावयाला नको. बहुश: अशी संज्ञा सामान्य माणसासंबंधाने प्रचलित होण्यात विशेष मातब्बरी नसते. राजे वगैरे राष्ट्रातील अत्यंत प्रमुख लोकांच्या अत्यंत क्षुद्र सवईवरही जनतेची सूक्ष्म नजर असते व त्या थोर लोकांच्या क्षुद्र लकबांचेही स्तुतीस्तोत्र किंवा निंदाकुत्स्ना लोकांच्या भाषणाचा विषय होऊन बसतो. अशारीतीने हा शाकपार्थिव शब्द अस्तित्वात आलेला आहे.