प्रस्तावना

३६. शहाजीने नवीन निजामशाहीचा कारभार करून ह्या वेळी शक १५५५ च्या श्रावणापासून शक १५५७ च्या माघापर्यंत सुमारे ३२ महिने म्हणजे दोन वर्षे आठ महिने झाले होते. ह्या अवधीत घोडेस्वार व पायदळ मिळून त्या जवळ दहा पंधरा हजार करोल फौज तयार होती, तिजोरी म्हणावी तशी भरलेली होती आणि त्याचा व त्याच्या सैन्याचा उत्साह उमदा होता. परराष्ट्रात त्याची मुख्य मदार आदिलशहाच्या मदतीवर होती आणि दोघांनी परस्परास मदत करण्याची अभिवचनेही दिली घेतली होती. मिळून शहाजहानाच्या प्रचंड शक्तीला तोंड देण्याची सामुग्री शहाजीने बरीच चांगली जुळविली होती. हुलकावणीचे पेच करून शहाजहानाला आपण हैराण केल्याशिवाय राहणार नाही अशी शहाजीची खात्री होती. फक्त आदिलशहाने शेवटपर्यंत टिकाव धरला पाहिजे अशी त्याची अपेक्षा होती. ह्या अपेक्षेत एक व्यंग नुकतेच उद्भवले होते. शक १५५७ च्या मृगाच्या सुमारास खवासखान व मुरारपंत यांना महमद आदिलशहाने ठार करविले होते. हे दोघेही शहाजीचे पुरस्कर्ते असून, त्यातल्या त्यात मुरारपंताचे शहाजीवर पुत्रवत प्रेम व विश्वास होता. शहाजीला आजपर्यंत निजामशाही उभारण्याच्या कामी मुरारपंताची मदत अंत:करणपूर्वक झाली होती व तो जिवंत असता तर त्याहूनही जास्त होऊन बहुश: शहाजहानाचा, त्याच्या इतर सरदारांप्रमाणे, पराभव झाला असता, निदान शहाजहानाला शह बसता, कदाचित सर्वच गोष्टींना निराळा रंग चढता. मागील रकान्यात सांगितलेच आहे की, शहाजहानाने शहाजीपाशी इरादतखानाकडून आदिलशाहीच्या वाटणी संबंधाने बोलणे चालविले व ते सर्व शहाजीने खवासखानास कळविले. ह्या वेळी तरुण महमद आदिलशहाची व वृद्ध खवासखानाची चित्तशुद्धी नव्हती. करता, इरादतखानाच्या बोलण्यातील भावार्थ लक्षात घेऊन, खवासखानाने व मुरारपंताने शहाजहानास असे कळविले की, आपण दक्षिणेत येऊन विजापूरातील अंदाधुंदी मोडून टाकण्याची इच्छा करीत असाल तर सबंध आदिलशाहीच आपल्या स्वाधीन करतो. खवासखानाचा हा निरोप जाताच शहाजहानाने दक्षिणच्या मसलतीची सज्जता केली. हा सर्व प्रकार महमद आदिलशहाला कळून त्याने रणदुल्लाखानाच्या साह्याने खवासखान व मुरारपंत यास ठार केले. हे पुरस्कर्ते गेल्यामुळे, आदिलशाही दरबारात शहाजीला पाठिंबा देणारा कोणी राहिला नाही. हे व्यंग सोडिले, तर शहाजीची शत्रूला तोंड देण्याची तयारी होती. शहाजहान दक्षिणेत शक १५५७ च्या माघात उतरल्याबरोबर शहाजीने प्रथम मासाहेब व मूर्तिजाशहा ह्यांची रवानगी घाटाखाली माहुलीच्या किल्ल्यावर केली, नंतर जाधवरावादी दुटप्पी मंडळीला इष्ट दिशेची वाट धरण्यास फुरसत दिली आणि स्वत: सरहद्दीवर शत्रूला तोंड देण्यास तयार राहिला.