प्रस्तावना

३७. शहाजहानाने आपल्या प्रचंड सेनासमुद्राचे चार भाग केले. पैकी, एक भाग कुतुबशहाला अडविण्याकरिता व एक भाग आदिलशहाच्या व शहाजीच्या मध्ये घालण्याकरिता पाठवून, दोन भाग शहाजीला जमीनदोस्त करण्याकडे त्याने योजिले. आड पडण्याच्या ऐवजी कुतुबशहा ताबडतोब शरण आला, कारण आदिलशहाच्या जुलमापासून मुक्त करणारा कोणीतरी प्रबल वाली त्याला हवाच होता. तेव्हा त्याच्यावर पाठविलेले सैन्य आदिलशहावर धाडिलेल्या सैन्याच्या मदतीला गेले. आदिलशहावर जे सैन्य पाठविले होते त्याचा मुख्य रोख आदिलशहाला चीत करण्याचा नसून, शहाजीला दक्षिण दिशेने कोंडण्याचा होता. तात्पर्य, उत्तरेकडून, पूर्वेकडून व दक्षिणेकडून शहाजीचा कोंडमारा करण्याचा ह्या मोंगली सैन्याच्या चारही तुकड्यांचा बेत होता. उघडच आहे, लढाईचा मुख्य विषय शहाजी होता. त्याला समूळ उखळून काढून, निजामशाहीचा सर्व मुलूख मोकळा करण्याकरिता शहाजहानाने ही प्रचंड तयारी केली होती. शहाजहानाची अशी योजना होती की, होता होईल तो सर्व मोहीम फाल्गुनापासून ज्येष्ठापर्यंत, म्हणजे बरसात लागण्याच्या पूर्वी, चार महिन्यात खलास व्हावी. शहाजी हे दोन्ही डाव ओळखून होता. विजापूरकरांना व आपल्याला शहाजहान विभक्त करणार व बरसातीच्या आत सर्व मोहीम खलास करणार हे बीज ओळखून, शहाजीने प्रथम लढाईचे तोंड अंगावर उत्तरेकडून नगर, चांभारगोंदे, बारामती, नीरथड या दिशेने दक्षिणेकडे घेत घेत आदिलशाहीच्या कोल्हापूर, मिरज व रायबाग प्रांतापर्यंत नेले आणि चांदवडच्या डोंगराजवळील सरहद्दीवरील किल्ले एकेक सोडीत सोडीत ज्येष्ठअखेर सुमारे पंचवीस किल्ले बरसात लागे तोपर्यंत आस्ते आस्ते विशेष हातघाईवर न येता सोडून दिले. इकडे आदिलशहाने शहापूरचे धरण फोडून, विजापूराभोवती वीसपंचवीस मैल पाणीच पाणी करून देऊन, शत्रूला कुंठित केले. शहाजीचे अर्धे अधिक किल्ले व सबंध कोंकण प्रांत दोन अडीच महिने लढूनही शहाजहानाच्या हाती लागले नाहीत व पुढील दीड महिन्यात हाती लागतील अशी खात्रीही पटेना.