प्रस्तावना

आहं अजानि गर्भधम्
आ त्वं अजासि गर्भधम्

अर्थ
हे आमच्या गणांच्या पुढाऱ्या! तुला आम्ही बोलावितो,
हे आमच्या प्रियांच्या प्रिय पुढा-या! तुला आम्ही बोलावितो,
हे आमच्या ठेव्यांच्या मुख्य ठेव्या! तुला आम्ही बोलावितो,

हे माझ्या वसू!
मी आपले घबाडहलविते किंवा ओढत्ये,
तू आपले घबाड हलव किंवा ओढ.
गर्भध = घबाड म्हणजे गर्भ धारण करण्याचा अवयव. गणपतिअथर्वशीर्षात गणांच्या पुढाऱ्याचे रूप वर्णिलेले आहे. गणांचा हा लढाऊ पुढारी हातात पाश, अंकुश व हत्तीचा एक दात ही शस्त्रे घेऊन व तांबडी वस्त्रे लेऊन, शत्रूंचा धुव्वा उडवून देई. असा हा ब्रह्मन् लोकांचा ऊर्फ ऋषींचा पुढारी जो ब्रह्मणस्पती ऊर्फ गणपती तो असे. त्याची आराधना प्रथम केल्यावाचून गणांतील गणांचे कोणतेही कृत्य निर्विघ्नपणे तडीस जाण्याचा संभव नसे. सबब, कोणतेही लहानमोठे कृत्य करावयाच्या प्रारंभी गणाच्या प्रत्यक्ष पुढाऱ्याची कोणत्या ही कृत्याला संमती घ्यावी लागे. अशीही प्राचीन गणराज्यसंस्था माहाराष्ट्रिक ऊर्फ महरट्ट लोकात प्रचलित होती. राज्य करण्याची ही अगदी प्राथमिक पध्दती माहाराष्ट्रिक लोकांत असल्यामुळे, ते जेव्हा दंडकारण्यात वसाहती करण्यास आले, तेव्हा त्यांनी नागपूरपासून तुंगभद्रेपर्यंतच्या प्रांतात अक्षरश: हजारो चिमकुली चिमकुली अशी गणराज्ये स्थापिली. बहुतेक प्रत्येक तर्फेला म्हणजे दहावीस मैल लांबीच्या प्रदेशाला एकेक गणराज्य असून, तेथील मुख्य राजधानीच्या गावाला राजपुरी राजुरी, रायरी, राजगड, रायगड अशी नावे असत. महाराष्ट्रात राजपुऱ्या, राजुऱ्या, रायऱ्या इत्यादी राज हे आद्याक्षर असणारी जी अनेक गावे सापडतात त्याचे कारण महरट्टांची ही प्राथमावस्थिक गणराज्यसंस्था होय. माहाराष्ट्रिकांची राजकीय स्थिती ज्याप्रमाणे अगदी प्राथमावस्थिक होती त्याच प्रमाणे त्यांची भाषा जी महाराष्ट्री तीही तितकीच प्राथमावस्थिक होती. संस्कृतात जसे व्याकरण, धर्म, न्याय, मीमांसा, इतिहास इत्यादी शाखांत विपुल व भव्य वाङ्मय त्याकाळी होते, असे भव्य व विपुल वाङ्मय महाराष्ट्री भाषेत असण्याचा संभव सुध्दा नव्हता. माहाराष्ट्रिक लोक दक्षिणेत बौध्दक्रांतीकाली जेव्हा उतरले तेव्हा त्यांचे वाङ्मय लौकिक स्त्रीपुरुषप्रणयविषयक लावण्यांच्या स्वरूपाचे असून, ते अद्याप अक्षरनिविष्टही झाले नव्हते. फक्त माहाराष्ट्रिक जनतेच्या तोंडी होते.