प्रस्तावना

३५ तुळापुराहून मुरारपंत दौंडावरून परिंड्याकडे गेला व शहाजी आपण उभारलेल्या नवीन निजामशहाच्या राज्याची डागडुजी करण्यास लागला. खिळखिळी झालेल्या निजामशाहीची डागडुजी शहाजीला चार प्रकारांनी करणे जरूर पडले. (१) गेलेला प्रांत पुन: शत्रूच्या हातून मिळविणे, (२) मिळविलेल्या प्रांताची आबादी करणे, (३) ठिकठिकाणी ठाणी धरून राहिलेल्या निजामशाही अभिमानी सरदारांची मिळवणी करणे आणि (४) आदिलशहा व शहाजहान यांच्याशी सामदामादी व्यवहार सुरू करणे, ह्या चार कामगि-या स्वतंत्र राज्याच्या पुनरुज्जीवनाची अंगे होती. पैकी १५५५ च्या आश्विनापासून १५५६ च्या ज्येष्ठापर्यंतच्या नऊ महिन्यात शहाजीने निजामशाही तळकोंकण, जुन्नर, अहमदनगर, नाशिक, त्र्यंबक, पुणे, नीरथडी इतका प्रांत म्हणजे दक्षिणेस नीरेपासून उत्तरेस चांदवडच्या डोंगरापर्यंतचा प्रांत आणि पूर्वेस अहमदनगरापासून पश्चिमेस समुद्रापर्यंतचा प्रांत आपल्या अंमलाखाली आणिला आणि प्रांतातील सर्व किल्ले व लष्करी ठाणी मराठे व ब्राह्मण अंमलदार नेमून फौजबंद केली. हे काम करीत असता शहाजीराजाच्या दौलतेची व शौर्याची आधिक्यता पाहून पश्चिम महाराष्ट्रातील शहाण्णव कुळीचे अनेक म-हाटे राजे व सरदार त्याला येऊन मिळाले (बृहदीश्वरशिलालेख). शिवकाली मावळे मावळे म्हणून ज्यांची पुढे ख्याती झाली ते हेच कुलीन लोक होत, ओझी वाहणारे सामान्य क्षुद्र कुणबी नव्हते. फतेखानाच्या अंमलाला कंटाळून परागंदा झालेले जाधव वगैरे कदीम मराठेही शहाजीराजाने आपल्या दरबारी बोलविले. ह्याच वेळी शिवाजीपंत, सखाराम मोकाशी, चतुर इत्यादी निजामशाही कारकून व मुत्सद्दी ब्राह्मण मंडळींच्या करवी व अत्रे, हणमंते, उपाध्ये वगैरे आपल्या मुत्सद्यांच्या द्वारा रयतेची आबादी करवून फौजेच्या व सरकारच्या खर्चाचे बंधनिर्बंध शहाजीने घालून दिले. चतुर हा प्रसिद्ध चतुर साबाजीचा मुलगा. हा आपल्या बापाप्राणेच लेखनकलाकुशल असे. चतुर साबाजी म्हणजे सामान्य कारभारी नव्हे. अकबराचा जसा तोडरमल्ल तसा निजामशाही राज्यातील हा प्रख्यात श्रीकरणाधिप होता. मलिकंबरी जमीनमोजणी जी म्हणतात ती ह्या चतुर साबाजीने केली. मुख्य वजीर म्हणून ती पाहणी व मोजणी मलिकंबराच्या नावावर मोडते इतकेच. फौजबंदी व जमीनमहसूल यांची व्यवस्था लावीत असता सिद्दी रैहान सोलापुरी, श्रीनिवासराव जुन्नरास, सिद्दी साया सैफखान भिवंडीस, सिद्दी अंबर दंडाराजपुरीस आणि असेच दुसरे किल्लेदार व जमीनदार आपापल्या घरी पुंडाई करून त्या त्या जागा बळकाविण्याच्या उद्योगात होते. पैकी सिद्दी रैहान हा आदिलशाही नोकर बनल्यामुळे त्याची ब्याद आयतीच टळली. ह्या मनुष्याने शहाजीवर एव्हापासून जो दात धरला त्याचा अनुभव शहाजीस पुढे कर्नाटकात आला. तत्रापि, प्रस्तुत प्रसंगी शहाजीस त्याचा उपयोग झाला. त्याने व मुरारपंताने शहाजीस मिळून सुमारे शक १५५५ च्या फाल्गुनात मोहबतखान व शुजा यांची परिंड्यास दाणादाण उडवून दिली व शहाजीवरील मोंगलांचा शह उडवून दिला. त्यामुळे निजामशाही अंमल बसविण्याचे काम शहाजीस निर्धास्तपणे साधिता आले. भिवंडीच्या सैफखानास निजामशहास रुजू होण्याकरिता शहाजीने बोलाविले, परंतु ते बोलावणे अमान्य करून सैफखान परभारे आदिलशाहीत निघून जाऊ लागला. तेव्हा पाठलाग करून शहाजीने त्याला बाभळगावच्या चकमकीत कैद केले व मुरारपंताच्या मध्यस्थीकरिता सोडून दिले. हा मनुष्य पुढे आदिलशाही चाकर झाला. जुन्नरच्या श्रीनिवासरावाला नरम आणण्यास शहाजीने निराळीच युक्ती लढविली. श्रीनिवासराव हा जातीचा मराठा होता व स्वतंत्र संस्थानिक बनावे अशी त्याची आकांक्षा होती. आपण मोंगली सरदार आहो अशी वेळ पडल्यास तो बतावणीही करी. त्याच्याकडे आपला मुलगा संभाजी याजकरिता शहाजीने त्याच्या मुलीची मागणी केली आणि बोलणे करता करता त्याला गिरफ्तार केले. शिवाजीने चंद्रराव मो-याशी आपल्या बापाची हीच युक्ती योजिली. श्रीनिवासराव दस्त झाल्याने जुन्नर, जीवधन वगैरे त्याच्या ताब्यातील सर्व किल्ले शहाजीच्या हाती पडले. तेव्हा त्याने लहानग्या मूर्तिजा निजामशहास भीमगडाहून उचलून निजामशहाची अगदी जुनी राजधानी जे जुन्नर तेथे ठेविले. दंडाराजपुरीच्या शिद्याकडे शहाजीने कानाडोळा केला. तोफा वगैरे युरोपियन लढाऊ सामान त्याच्याद्वारा शहाजी व आदिलशहा यांना मिळण्याची सोय असे. खेरीज पाण्यावरती अंमल बसविण्यास शहाजीजवळ आरमारही नव्हते. करता, सिद्दी अंबर याला दुखविण्याच्या भरीस शहाजी पडला नाही. ह्याच वेळी बागलाणच्या राजाने नाशिक-चांदवडकडील काही निजामशाही किल्ले बळकाविले होते ते त्याने तंबी देऊन सोडविले. येणेप्रमाणे पुंडांची वासलात लावून शहाजीने निजामशाहीचा जम पुन: बहुतेक पूर्ववत बसवून दिला. दौलतीत खाशांपैकी सर्वात वृद्ध व अनुभवी जी मासाहेब तिच्या सल्ल्याने सर्व कारभार चाले. मुत्सद्दी व सरदार यांचा रोज दरबार भरे. लहानग्या मूर्तिजाचे सर्व बालपण कोकणात अज्ञातवासात गेल्यामुळे त्याला दरबारचा रीतिरिवाज माहीत नव्हता. बुढ्ढे बुढ्ढे ब्राह्मण मुत्सद्दी, अक्राळविक्राळ असे मिशाळ मराठे सरदार, काठीवाले भालदार व चौरीवाले चोपदार पाहून तो, नजर मेली नसल्यामुळे, बिचके व दरबारात येण्याची टाळाटाळ करी. तेव्हा मासाहेबाच्या सल्ल्यावरून व आग्रहावरून शहाजीराजे त्या मुलास घेऊन तख्तावर बसू लागले. शहाजीच्या कर्तबगारीने निजामशाहीचे हे असे पुनरुज्जीवित ऐश्वर्य विलोकन करून शहाजहान पातशहाने तोंडात बोट घातले आणि गेल्या दोन वर्षांतील मोहिमांचा उपद्व्याप व्यर्थ जाऊन दक्षिण जिंकण्याचा पुन: पहिला पाढा वाचावा लागणार म्हणून विषाद मानिला. पंचसहस्री, षट्सहस्री, बंडखोर, आदिलशाहीचा साथीदार असा वाढत वाढत शहाजी निजामशाहीचा मुख्य वजीरच नव्हे तर मुख्य चालक बनला, कदाचित असाच वाढू दिल्यास तो निजामशाही ढोंगाच्याऐवजी स्वत:चेच स्वतंत्र हिंदू राज्य स्थापील, असा तर्क शहाजहानाने केला आणि इरादतखानाच्या हस्ते शहाजीशी सामनीति आरंभिली. शहाजीचा चुलत भाऊ मालोजी भोसले पातशाही चाकर झाला होता. त्याजकडून इरादतखानाने स्नेहाचे बोलणे शहाजीपाशी काढिले की, पातशहा आपणास थोरातल्या थोर अशा केवळ राजपुत्रास मिळणा-या बेवीसहजारी मनसबेची अपूर्व देणगी देण्याचे चाहतात, फक्त आपण इतकेच करावे की, आदिलशाही जिंकण्यास पातशहास साह्य द्यावे आणि आदिलशाही जिंकिल्या तर तीतील निमेनिम वाटणी घ्यावी. ह्या गुळचट बोलण्यातील रहस्य ओळखून शहाजीने सर्व हकिकत विजापूरचा मुख्य वजीर खवासखान यास कळविली (साने, पत्रे यादी ४३८). येणेप्रमाणे शक १५५६ चे बहुतेक सबंध साल शहाजीचे शांततेचे व वैभवाचे गेले. आपली सामनीति व भेदनीति फुकट गेलेली पाहून १५५६ च्या अखेरीस शहाजहानाने इरादतखानाकडून शहाजीवर दंडनीतीचा प्रयोग करून पाहिला. छप्पन सालाच्या अखेरीस इरादतखान शहाजीवर डोंगरी मुलखात चालून आला. परंतु शहाजीच्या हुलकावण्यामागे धावता धावता हैराण होऊन, धापा टाकीत तो दौलताबादेस हिरमुसलेला परत गेला. इरादतखानासारख्या लुंग्यासुंग्यांना शहाजी दाद देत नाही हे पाहून, शहाजहान शक १५५७ च्या माघअखेर जंगी सामान व सैन्य घेऊन स्वत: दौलताबादेस आला. त्याच्या बरोबर अठ्ठावन्न हजार सैन्य असून, त्याच्या जोरावर आदिलशहा व कुतुबशहा यांना तो मार देणार होता व शहाजीचा फन्ना उडविणार होता.