प्रस्तावना

३४. हुसेनशाहा व फतेखान यांनी यद्यपि दौलतीचा शहाजहानास राजीनामा लिहून दिला, तत्रापि तेवढ्याने निजामशाहीचा कायमचा शेवट झाला नाही. हुसेनशहाची आजी व मूर्तिजाची बु-हाणशहाची आई जी मासाहेब ती व निजामशाही वंशातील काही राजन्यक अद्याप हयात होते. फतेखानाच्या हंगाम्यात ही मंडळी निसटून शहाजीच्या आश्रयाने कोंकणप्रांती गेली होती. त्यांना हाताशी धरून निजामशाहीची वहिवाट पुढे चालू करण्याची मसलत शहाजी, मुरारपंत व इतर आदिलशाही मुत्सद्दी यांनी केली. मोहबतखानाला बेदम सडकून सरहद्दीच्या बाहेर घालविल्यावर शहाजी, मुरारपंत व रणदुल्लाखान मोंगलांच्या कब्जातल्या निजामशाही प्रांतातून अपरंपार लूट घेऊन दक्षिण दिशेस जाण्याकरिता मागे फिरले. दौलताबादेच्या भोवतालील मैदान मुलूख मोंगलांच्या ताब्यात पडल्यामुळे बागलाणातून नाशिक-त्र्यंबकावरून ते भीमगडास गेले. तेथे कोकणातून दंडाराजपुरीहून मासाहेब व निजामशाही वंशातील दोन अल्पवयस्क शहाजादे आणून, त्यापैकी मूर्तिजा नावाच्या मुलाला त्यांनी मसनदीवर बसविले आणि निजामशाही दौलत चालू केली. ह्या कृत्याला आदिलशहाची मान्यता होतीच. नंतर मुरारपंत जुन्नर, खेड व पाबळ या रस्त्याने भीमेपार होण्याकरिता तुळापुरास शक १५५५ च्या भाद्रपदात आला. त्याला पोहोचवण्याकरिता शहाजीही तुळापुरापर्यंत त्याच्याशी पुढील मनसब्याचा खल करीत करीत आला. तेथे ज्या महापर्वणीचे मराठी बखरकार वर्णन करण्याची संधी बहुश: दवडीत नाहीत ती सूर्यग्रहणपर्वणी त्यांना आमावास्येस सोमवारी सकाळी अकरा घटकेस घडली. ह्या पर्वणीस मुरारपंताने साग व साभरण गजदान, अश्वदान व गोशतदान केले आणि सुवर्णरजतादी चोवीस तुळादाने दिली. शिवाय सबंध तुळापूर गाव सोळा ब्राह्मणांना अग्रहार समर्पिला. अग्रहार देण्याची अशी अट आहे की, दात्याने देयांना सालंकृत घरे बांधून देऊन खेरीज झाली नसतील त्यांची लग्ने करून द्यावी. त्याप्रमाणे गौडनामक कारागिराकडून ब्राह्मणांना त्याने सोळा घरे बांधून दिली. याव्यतिरिक्त, कालिदास नावाच्या कवीला, वररुचि नावाच्या विद्वानाला, त्रिमलभट नावाच्या स्वपुरोहिताला व रायाराय आडनावाच्या ब्राह्मणाला भूमिदाने दिली. हा सर्व कारभार आटोपण्याला तब्बल महिना पंधरा दिवस लागले. या सावकाशपणाचा व स्वस्थपणाचा अर्थ असा होतो की, शत्रूकडून इजा पोहोचण्याची धास्ती शहाजीला किंवा मुरारपंताला बिलकुल राहिली नव्हती. इतका मोहबतखानाला त्यांनी बेदम हबकला होता. मोहबतखानाची ही दुर्दशा शहाजहानाला कळून त्याने त्या नाकर्त्या व ढिल्या सरदारावर शहाजादा सुलतान शुजा यास मुख्याधिकारी नेमिले.