प्रस्तावना
६) मूळारंभी पितृसावर्ण्याची पध्दत ब्रह्मन् लोकांत होती. ती मुळे तांबडा,पिवळा व श्वेत वर्ण कालांतराने त्रैवर्णिकात सरमिसळ दिसू लागले. तांबडा व पिवळा हे रंग श्वेत रंगाला व इतरेतरांना विद्रूपता आणणारे नसल्यामुळे तत्संबंधाने, अगदीच नव्हे असे नव्हे, विशेष तिटकारा वाटला नाही. परंतु शौद्र जो काळा रंग त्याने श्वेतादि वर्णाला विद्रूपता येत असल्यामुळे तत्संबंधाने तिरस्कार वाटे. तशांत क्षुद्र नाकाडोळयांनीही विद्रूप असत. त्या कारणाने क्षुद्रस्त्रीच्या पोटी ब्राह्मणादी त्रैवर्णिकांकडून जी ब्राह्मणादी प्रजा निपजे ती नाकाडोळयांनी शौद्र निपजे. काळा रंग आणि शौद्र अवयव विशेष तिटकारा आणीत. क्षुद्रांचा नुसताच काळा रंग असता तर तो खपला असता. नाग लोक वर्णाने काळेसावळे असत, परंतु चेहऱ्याने नीटस असत, तेव्हा ते त्रैवर्णिकांना खपत.
७) दासकर्मा करिता त्रैवर्णिकांनी क्षुद्रांना घेऊन चातुर्वण्य संस्था स्थापिली. नंतर शरीरसंबंध होऊ लागला. तो अतिशय वाढून बौध्दादी धर्मक्रांती, राज्यक्रांती व समाजक्रांती झाली.
८) तेव्हा पितृसावर्ण्याची पध्दत बंद करून मातृसावर्ण्याची पध्दत व कायदा त्रैवर्णिकांनी पसार केला. त्यामुळे जाती अस्तित्वात आल्या. वर्ण हे कातडीच्या रंगावर बसविले होते. जातीचा रंगाशी काही एक संबंध नाही. जाती ह्या जन्मावर बसविल्या गेल्या. गोरा ब्राह्मण व काळी क्षुद्रीण यांच्यापासून झालेला जो पारशव तो वर्णाने गोरा, काळा किंवा सावळा असला, तथापि जातीने म्हणजे ज्ञातीने म्हणजे जन्मानेक्षुद्र समजला जाई. अशा तऱ्हेने मांगापासून ब्राह्मणापर्यंत सर्व जातीत गोरी, तांबडी, पिवळी, काळी, सावळी, विटकरी, उजळ, फेफटी,नाकेली अशी सर्व प्रकारची माणसे दिसू लागली. त्याचप्रमाणे मनाने वेदनिष्ठ किंवा वेदभ्रष्ट, श्रध्देने पितृभक्त किंवा पितृनिंदक, कर्माने यज्ञकर्ती किंवा यज्ञभक्त्री अशी तऱ्हेतऱ्हेची माणसे निपजून वैदिक संस्कृती दुभंग झाली.
९) अशा काली माहाराष्ट्रिक, राष्ट्रिक व वैराष्ट्रिक हे गणराज्य करणारे कनिष्ठ संस्कृतीचे क्षत्रिय दक्षिणेत वसाहती करण्यास निघाले.
१०) तेथे त्यांच्याही पूर्वी हजारो वर्षे वस्ती करून राहिलेले आर्यभाष नागलोक त्यांना भेटले.