प्रस्तावना
४१. बेदनूरकरच्या मोहिमेनंतर मुस्तफाखान शक १५७० च्या चैत्रात चंदीकडे निघून गेला व शहाजी बंगळूरास आपल्या जहागिरीत जाऊन राहिला. दोघांमध्ये इतके वैमनस्य वाढले की, शहाजी तेव्हापासून मुस्तफाखानाचे हुकूम मानीनासा होऊन मुखत्यारीने वागू लागला (बृहदीश्वरशिलालेख व साने, पत्रे यादी ४३८). शहाजी आपला म्हणजे अर्थात आदिलशहाचा हुकूम मानीत नाही अशी तक्रार मुस्तफाखानाने महमदशहाकडे केली. त्यामुळे महमदशहाचेही मन दूषित झाले. शहाजी स्वतंत्र होऊन आपल्यावर उलटेल ही जी महमदशहाची फार दिवसांची भीति ती खरी झाली असे त्याला वाटू लागले. ह्या भीतीला पुण्यात शिवाजीच्या अडुसष्ट व एकूणसत्तर सालातील उद्योगाने पुष्टीकरण मिळाले. ह्या दोन सालात शिवाजीने चाकणापासून शिरवळपर्यंतचा पुण्याच्या लगतचा दक्षिणोत्तर प्रांत आक्रमण केला व तेथील आदिलशाही कामदार हाकून दिले. शहाजीचा हत्ती, तोफा वगैरे जंगी सरंजाम पुणेप्रांती पडून राहिला होता त्याची शिवाजीने पुन: जुळवाजुळव करून पाच चार हजार मावळे सरदारांची फौज ठेविली व कांगोरी, तुंग, तिकोना, भोरप, कावरी, लोहगड, राजमाची, पुरंदर, सिंहगड, रायरेश्वराचा डोंगर इत्यादी घाटमाथ्यावरील किल्ले काबीज केले; इतकेच नव्हे तर कल्याणच्या मौलाना अहमद यास लुटले. ह्या उद्योगाची वार्ता महमदशहाला हाकून दिलेल्या कामदारांकडून मुखजबानीने कळली. तेव्हा तर शहाच्या मनाची शहाजीच्या कपटाबद्दल खात्री होऊन चुकली, बापलेकांनी संगनमत करून आदिलशाही दडपण झुगारून देण्याचा इरादा खास धरिला, असा शहाच्या मनाचा निश्चय झाला. दोघाही बापलेकांना सैन्य पाठवून चिरडून टाकण्याचे सामर्थ्य आदिलशहाच्या ताकदीच्या बाहेरचे होते. जे काही सैन्य होते ते सर्व मुस्तफाखान व शिद्दी रैहान यांच्या हाताखाली चंदीकडे गुंतले होते व शहाजीशी सामना करण्याच्या तोलाचे नव्हते. काही सैन्य मोंगलांच्या हद्दीवर किल्लोकिल्ली पसरलेले होते. ते तेथून हलविण्याची सोय नव्हती. करता, शिवाजीवर पाठविण्याजोगे सैन्य महमदशहाजवळ नव्हते. अशी दुर्बल स्थिती असल्यामुळे महमदशहाला कपटयोजना करण्याखेरीज दुसरे गत्यंतर राहिले नाही. पोरगा फार दूर सांदीकोप-याचा आश्रय करून असल्यामुळे, त्याच्याकडे काही काळ दुर्लक्ष करून, बापाचा प्रथम निकाल लाविण्याचा महमदशहाने बेत केला व त्याप्रमाणे मुस्तफाखानास शहाजीला कपटाने पकडण्याचा हुकूम केला.