प्रस्तावना

नागलोकांची शंभर कुळे होती पैकी जनमेजयाने वासुकी, तक्षक, ऐरावत इत्यादिकांची अनेक कुळे मारिली. ह्या नागलोकांत स्त्रियांचे प्राबल्य प्रधान असे. अर्वाचीन नायर लोक नागांचे वंशज होत. नाग शब्दाला संबंधार्थक प्राकृत केर प्रत्यय लागून नागकेर हा प्राकृत शब्द झाला. ह्या नागकेर शब्दाचा अपभ्रंश नाअएर, नाएर, नायर. यलबुर्ग्याचे सिंद (शक ९००-११००) नागवंशीय होते व ह्यांच्या ध्वजेवर नागांचे चित्र असे. सध्या ग्वालेरच्या शिंद्यांच्या मुद्रेवरही दोन नागांच्या प्रतिमा असतात. शिंदा हा शब्द शक ९०० तील सिंद: ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. सेंद्रक: शब्दांपासून सिंदा शब्द झाला अशी कित्येकांची समजूत आहे, परंतु ती साधार नाही. सेंद्रक शब्दांपासून शेंद्रे हे मराठा आडनाव होते. तात्पर्य, हे नागलोक माहाराष्ट्रिक लोकांच्या फार पूर्वी नर्मदेपासून त्रावणकोरपर्यंतच्या मुलखात पसरले होते. माहाराष्ट्रिकांचा व नागांचा मिलाफ शकपूर्व ६०० पासून शकोत्तर ४०० पर्यंत एक हजार वर्षे होऊन, त्या दोघांच्या मिश्रणाने मराठे म्हणून ज्यांस म्हणतात त्या लोकांची उत्पत्ती झाली.दोन्ही लोक गणराज्यांसारख्या क्षुद्रराज्यपध्दती चालविणारे असून, त्यांना त्याहून वरिष्ठ राज्यपध्दती चालविण्याची ऐपत व अर्थात अक्कल आलेली नव्हती. तेव्हा उत्तरेकडील चालुक्य, राष्ट्रकूट, यादव वगैरे सम्राटांची पाइकी करण्यात ह्यांचे क्षात्रतेज खर्ची पडे ते यथायोग्य होते. माहाराष्ट्रकांच्या महाराष्ट्र भाषेत काही काव्यवाङ्मय तरी असे. नागांच्या नागभाषेत जे काय वाङ्मय असे ते सर्व तोंडी असून त्याला अक्षरसंनिवेश कधीच मिळाला नाही. अशा ह्या निरक्षर नागांचे व ईषदक्षर माहाराष्ट्रिकांचे प्रज जे मराठे त्यांच्यात ह्या दोन्ही वंशांतील दोष व गुण उतरून त्यांची संस्कृती माहाराष्ट्रिकांहून कमतर व नागांहून किंचित् उच्चतर अशी निपजली. माहाराष्ट्रिक हे वंशाने सूर्यवंशी क्षत्रिय होते आणि नाग हे शेषवंशी क्षत्रिय होते. ह्या दोन वंशांचा मिलाफ होऊन जे मराठे लोक शक चारशेंच्या सुमारास निपजले त्यांच्यात सहजच सूर्यवंश व शेषवंश असे दोन वंश दिसू लागले. देवधर्माच्या बाबतीत माहाराष्ट्रिक पुराण वैदिक धर्माचे व बौध्दक्रांतिकालानंतर उद्भवलेल्या रामकृष्णादींच्या उपासनामार्गाचे अनुयायी होते. नागलोक फार पुरातनकालापासून सर्पपूजक व वनदेवताभजक असून, बौध्दक्रांतिकालानंतर बौध्दधर्माचाही पगडा त्यांच्यावर बसला. बौध्द भिक्षु व श्रमणक दक्षिणेत सर्वत्र पसरून जेथे जेथे नागांची वसती होती तेथे तेथे त्यांनी आपले विहार व धागोबा स्थापिले. दक्षिणारण्यातील नागांच्या वसतीची कोणतीही डोंगरी किंवा मैदानी तर्फ घ्या, तेथे तेथे बौध्दांच्या विहार व धागोबा यांच्या खुणा मुबलक सापडतात. उदाहरणार्थ, पुण्यापासून खंडाळयापर्यंतच्या तीस मैलांच्या डोंगरी तर्फेत (१) पर्वती, (२) भांबुर्डे, (३) घोरवडी, (४) इंदुरी, (५) फिरंगाइचा डोंगर, (६) भाजे, (७) बेडसें, (८) कार्ले ह्या आठ स्थली बौध्दांच्या धर्माचे अवशेष आढळतात. पुण्यापासून पळसदेवापर्यंतच्या मैदानी टापूतही बौध्द अवशेष असेच विपुल आहेत. तात्पर्य, बौध्दांची छाप नागलोकांवर त्या काली अतिशय बसली. नागमाहाराष्ट्रिकोत्पन्न मराठ्यांच्यावर, अर्थात, वैदिक धर्माची, उपासनामार्गाची, वनदेवतापूजेची, सर्पोपासनेची व बौध्दधर्माची अशी पंचविध छाप बसून, त्यांच्या मनोभूमिकेचा देवधार्मिक भाग एकनिष्ठ न रहाता चित्रविचित्र रंगविला गेला. त्यामुळे अमूक देवधर्माचे मराठे कट्टे विश्वसनीय अनुयायी आहेत असे म्हणण्याची सोय राहिली नाही. सगळयाच देवधर्माचे जे अनुयायी ते कोणत्याच देवधर्माचे कट्टे भक्त रहाणे शक्य नव्हते. अशी ह्या मराठा क्षत्रियांची देवधार्मिक स्थिती शक चारशे पाचशेच्या पुढील तीन चार शतकांच्या अवधीत होती. त्यांना धड आर्य ऐतिह्यही माहीत नव्हते, धड बौध्द ऐतिह्यही अवगत नव्हते आणि नागांच्या वन्यदेवधर्मात मुळी ऐतिह्यच नव्हते. त्यामुळे मराठे म्हणजे महाराष्ट्रात ज्या काळी एक आडमुठ्यांचा अव्यवस्थित जमाव होऊन बसला होता.