प्रस्तावना

सायणाच्या ह्या साहसी विधानाबद्दल तुच्छतादर्शक आश्चर्य दर्शविण्याचे कारण नाही. पूर्ववैदिक भाषेत व वैदिक भाषेतही प्रथमेचे अनेकवचन अन्प्रत्यय लागून होत असे हे मला नुकतेच अलीकडे दोन वर्षांखाली कळून आले आहे. पुत्रान् हे प्रथमेचे अनेकवचन ज्या एका पूर्ववैदिक भाषेत होते त्या पूर्ववैदिक भाषा बोलणाऱ्या ऋषिलोकांचा व नागांचा मिलाफ होऊन नागांनी हे अन्प्रत्ययान्त रूप उचलले. ह्या पूर्ववैदिक पुत्रान् रूपाचा अपभ्रंश नागभाषेत पुत्तां, पुत्ताँ असा होऊन त्या नागभाषेच्या द्वारा मराठीत पूतां, पूताँ अशा रूपाने तो प्रविष्ट झाला. पूताँ, पूतानों, इत्यादी मराठी अनेकवचनी रूपात अनुस्वार-अनुनासिक कोठून आले त्याचा हा असा हिशेब आहे. त्याँना व त्यान्ला, त्याँतून व त्यान्तून्, त्यांचे व त्यान्चे, अशी अनुनासिक-अनुस्वार-न्कारयुक्त रूपे येतात, त्याचे कारण वैदिक भाषेतून नागलोकांनी उचललेले हे प्रथमेचे अनेकवचनी अन्प्रत्ययान्त रूप होय. पूतान्हो=पूतानों या मराठी रूपात तर हे अन्प्रत्ययान्त रूप स्पष्ट दिसते. महाराष्ट्रीत संबोधनाच्या अनेकवचनी अन् प्रत्ययान्त किंवा अनुस्वार-अनुनासिकयुक्त रूप नाही. वर दिलेल्या सोळा मराठी विभक्तीरूपात असेच आणिक निदान दहा बारा नागभाषेतील विशेष दाखवून देता येतील. म्हणजे सोळा महाराष्ट्री रूपात नागभाषेच्या संसर्गाने सुमारे वीस पंचवीस फेरफार झाले, अशी फलनिष्पत्ति होत्ये. सबंध महाराष्ट्री भाषा सबंध मराठी भाषेशी जर तोलली तर नागभाषेचा संस्कार महाराष्ट्री भाषेवर एकास दीड ह्या प्रमाणावर झालेले आढळावा असा स्थूल अंदाज आहे. ह्या नैरुक्तिक विधानाचा समाजदृष्टया असा अर्थ होतो की महाराष्ट्रिक लोकांत नागलोकांचे मिश्रण एकास दीड ह्या प्रमाणात होऊन मराठे लोक ज्यास म्हणतात ते निर्माण झाले. माहाराष्ट्रिकांची संस्कृती नागलोकांच्या संस्कृतीहून किंचित श्रेष्ठ असल्यामुळे, नागमाहाराष्ट्रिकोत्पन्न नव्या लोकांना मराठे हे नाव माहाराष्ट्रिक ह्या नावावरून प्रचलित झाले, नागलोकांच्या नावावरून नागे असे नाव प्रचलित झाले नाही.

९८. नागस्त्रियांशी आस्तिकादि ऋषींचे व अर्जुनादि क्षत्रियांचे शरीरसंबंध होऊन पितृसावर्ण्याने ब्राह्मण व क्षत्रिय प्रजा झालेली महाभारतादी इतिहासांतून प्रसिध्द आहे. महाभारतात व विष्णुपुरादि पुराणेतिहासग्रंथांत कश्यपाच्या तेरा स्त्रियांपैकी कद्रूच्या पोटी नागांची उत्पत्ती सांगितली आहे. ह्या दंतकथेत इतिहासभाग असा समजावयाचा की कश्यप समुद्राभोवतालील म्हणजे अर्वाचीनकाळी युरापियन लोक ज्याला क्यास्पियन समुद्र म्हणतात त्याच्या भोवतालील प्रांतातून राक्षस, गरुड, नाग, इत्यादी लोक अत्यंत प्राचीन काली रहात असत. तेथून परिभ्रमण करीत करीत नागलोक काश्मीर, तक्षशिला, सिंधु, मथुरा इत्यादी प्रदेशातून पाताळात म्हणजे नर्मदेच्या दक्षिणेस उतरले. तसेच दक्षिणेत वसाहती करून त्यांनी अनेक गावे वसविली व क्षुद्र राज्यपध्दती निर्माण केल्या.