प्रस्तावना
एक भाषा बदलून तिच्या स्थानी तत्सदृश अशी दुसरी भाषा जेव्हा प्रचलित झालेली दिसते तेव्हा त्या भाषान्तरप्रचलनाच्या बुडाशी दोन राष्ट्रांचे किंवा लोकांचे सम्मेलन झालेले नियमाने आढळते. सामाजिक सेंलन ज्या मानाने दाट किंवा विरळ असेल त्या मानाने त्या दोन भाषांचे मिश्रण दाट किंवा विरळ होते. एक समाज दुसऱ्या समाजाहून अतीच अती बलिष्ठ असला व हे दोन समाज शेजाराला आले व त्यांच्यात विशेष संघटन झाले, तर कनिष्ठ समाजाची भाषा अजिबात मरून जाते व तो कनिष्ठ समाज बलिष्ठ समाजाची भाषा अपभ्रष्ट रूपाने सर्वस्वी बोलू लागतो. त्रैवर्णिक व एतद्देशज क्षुद्र या दोन समाजांचे जेव्हा सम्मेलन झाले तेव्हा हा प्रकार घडून आला. क्षुद्रांची मूळ भाषा सपशेल बुडून गेली. नागांचा व आर्यांचा जेव्हा उत्तर हिंदुस्थानात जनमेजयकाली व तत्पूर्वी संगम झाला, तेव्हाही हाच प्रकार घडला. नागांची मूळ भाषा अजिबात लोपून गेली व ते वैदिक भाषेचा अपभ्रष्ट उच्चार करून ती आर्यभाषा बोलू लागले. माहाराष्ट्रिकांचा व नागांचा जेव्हा दक्षिणेत संगम, सहवास व शरीरसंबंध झाला, तेव्हा नागांचा जुनाट वैदिक भाषापभ्रंश व माहाराष्ट्रिकांची महाराष्ट्री ह्या दोन अपभ्रष्ट आर्यभाषांचा मिलाफ होऊन दोन्हींच्या लकबा जीत दृष्टयुत्पत्तीस येतात ती मराठी भाषा जन्मास आली. मराठी भाषेत महाराष्ट्रीत नाहीत परंतु वैदिक भाषेत आहेत व संकृत भाषेत नाहीत परंतु वैदिक भाषेत आहेत असे प्रयोग व प्रत्यय व क्रियापदरूपे जी दृष्टीस पडतात त्याचे कारण नागांची महाराष्ट्री भाषेहून जुनी अशी वैदिकभाषापभ्रंशभाषा होय. महाराष्ट्रीत नाहीत परंतु वैदिकभाषेत आहेत अशा दोन लकबा उदाहरणार्थ येते उतरतो. मराठीत करूनश्यानी, जेऊनश्यानी, घेऊनश्यानी असे एक धातुसाधित अव्यय क्षुद्रांच्या व देशस्थांच्या बोलण्यात येते. हा श्यानी प्रत्यय आर्ष, मागधी, महाराष्ट्री, सौरसेनी, पैशाची, अपभ्रंश किंवा प्राकृतभाषा ऊर्फ पाअडभाषा ऊर्फ पाली भाषा अश्या कोणत्याच प्राकृत भाषेत नाही. हा प्रत्यय पाणिनीय संस्कृत भाषेतही नाही. हा फक्त वैदिक भाषेत आहे व तोही अत्यंत तुरळक आहे. वैदिक भाषेत सन् ला इ प्रत्यय लागून सनि असे सप्तम्यंत रूप धातूंना जोडून काही थोडी धातुसाधित अव्यये बनतात; जसे गृणीपणि, तरीपणि, नेपणि इ. इ. इ. ह्या सनि-पणि प्रत्ययापासून मराठी श्यानि प्रत्यय आला आहे. आता श्यानि प्रत्यय मराठीत महाराष्ट्रीतून तर आला नाही, कारण महाराष्ट्रीत असा प्रत्ययच मुदलात नाही. तेव्हा मराठीत तो आला कोणत्या द्वाराने? मराठीचा व वैदिक भाषेचा निकट सहवास तर कालान्तरामुळे कधीच शक्य नव्हता. तेव्हा एकच तोड राहिली. हा प्रत्यय नागलोकांच्या वैदिक अपभ्रंशातून मराठीत आला. दुसरे उदाहरण झडकरि, चटकरि इत्यादी धातुसाधित अव्ययांचे. करि हे धातुसाधित अव्यय कोणत्याच प्राकृतात नाही. फक्त वैदिक भाषेत इ प्रत्यय धातूंना लागून दृशि, बुधि, संचक्षि अशी धातुसाधिते आढळतात. कर धातूला इ प्रत्यय लागून झालेले हे करि धातुसाधित नागांच्या वैदिक अपभ्रंशद्वाराच तेवढे मराठीत येण्याचा संभव आहे. तात्पर्य, माहाराष्ट्रिकांचा व नागांचा मिलाफ शकोत्तर पाचशेच्या सुमारास परिपूर्ण होऊन, केवळ महाराष्ट्री भाषा बोलणारे लोक महाराष्ट्रात राहिले नाहीत, माहाराष्ट्रिकनागोत्पन्न अशी सर्व प्रजा मराठी अपभ्रंश बोलू लागली. महाराष्ट्री भाषेला असा हा मृत्यु नागांच्या सेंलनाने आला. महाराष्ट्री भाषा बोलणारेच कोणी न राहिल्यामुळे, त्या भाषेचा उपयोग शकोत्तर चारपाचशेच्या सुमारास चालुक्यादि परकीय संस्कृत भाषा समजणाऱ्या राज्यकर्त्यांनी सार्वजनिक शिलालेखात व ताम्रपटात वगैरेत सहजच केला नाही. मराठीत ताम्रपटे व शिलालेख कोरावे तर त्या नव्या भाषेला अद्याप शिष्टान्यता आली नव्हती. तेव्हा चालुक्यादींच्या सार्वजनिक लेखात संस्कृतभाषेचा उपयोग करण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. नाटकातून वगैरे ग्रंथांतून महाराष्ट्रीचा उपयोग कवी करीत, परंतु तो उपयोग केवळ परंपरागत रूढी म्हणून करीत, महाराष्ट्री भाषा जिवंत होती म्हणजे ती भाषा बोलणारे कोणी लोक शकोत्तर पाचशेनंतर राहिले होते म्हणून करीत नसत.