प्रस्तावना

नवीन वसाहत करावी, तेथे पाच पंचवीस गावे बसवावी व तेथील पट्टकीलपणा व देशमुख्यपणा स्वयमेव स्वीकारून आनंदाने कालक्रमणा करीत असावी, असा व्यवसाय माहाराष्ट्रिकांचा असे. सोळाशे वर्षांत माहाराष्ट्रिकांनी वसाहती वसविण्याचे काम मात्र नमुनेदार केले असे म्हटल्यावाचून रहावत नाही. माहाराष्ट्रिकांनी वसाहती केल्या म्हणजे उत्तरेकडील बलिष्ठ व कर्ते क्षत्रिय येऊन त्यांच्या वसाहती वरती आयतेच अधिराज्य करीत. संस्कृतीने कनिष्ठ दर्जाच्या कोंबडीने अंडी घातली म्हणजे वरिष्ठ संस्कृतीच्या गावढयाने त्यापैकी काही खाल्ली असता कोंबडीचे जसे काहीच बिघडत नाहीसे दिसते, ती अंडी घालण्याचे काम चालूच ठेवित्ये, त्याप्रमाणे माहाराष्ट्रिकांनी वसाहती घातल्यावर त्यातून कर घेण्याचे काम अधिराज येऊन हलकेच करीत व नवीन वसाहती घालण्याचे मेहनतीचे व सोशीकपणाचे काम माहाराष्ट्रिक चालू ठेवीत. माहाराष्ट्रिकांच्या वसाहतीच्या स्थापनेची दिशा त्यांच्या वरील अधिराज्यांच्या स्थापनेच्या दिशेवरून उत्तमोत्तम रेखाटता येते. दक्षिणेत पहिले मोठे साम्राज्य म्हणजे पैठणास आंध्रभृत्यांचे. त्याच प्रमाणे माहाराष्ट्रिकांची पहिली मोठी भरभराटलेली वसाहत म्हणजे पैठणप्रांतातली गोदावरीच्या तीरची. त्याच सुमारास विद्याधर वंशीय शिलाहाराचे राज्य तुंगभद्रेच्या तीराजवळील तवरगिरीस म्हणजे तगरास स्थापिले गेले. म्हणजे तुंगभद्रेच्या तीरी माहाराष्ट्रिकांनी दक्षिणेकडून वसाहती केल्या. नंतर तगरच्या उत्तरेस माहाराष्ट्रिकांनी आपल्या वसाहती वातापि ऊर्फ बादामी प्रांतात नेल्या. त्याबरोबर पूर्व चालुक्यांनी आपले साम्राज्य बादामीस रोवले. पुढे माहाराष्ट्रिक मालखेडपर्यंत उत्तरेस चढले तेव्हा राष्ट्रकूटांनी आपल्या साम्राज्याची राजधानी मालखेडास नेली. कालांतराने माहाराष्ट्रिक मालखेडाच्या उत्तरेस कल्याणीकलबुर्गा प्रांतात शिरले, तो त्यांच्या पाठोपाठ उत्तरचालुक्यांनी कल्याणी शहराला आपल्या राजधानीत्वाचा मान दिला. शेवटी कल्याणीकलबुर्ग्याच्या उत्तरेस देवगिरी प्रांत माहाराष्ट्रिकांनी वसविल्यावर यादवांनी देवगिरीच्या अजिंक्य खडकावरून सर्व दक्षिणापथाचे अधिराज्य हाकिले. इकडे तगराहून काही माहाराष्ट्रिक करवीर टापूत सरकले, तेव्हा शिलाहारांनी करवीर-क-हाड ह्या जागी आपली मुख्य ठाणी उभारिली आणि तेथून खुद्द समुद्रतीरी विजयाचे बाहुटे रोविले. अशा त-हेने सोळाशे वर्षे वसाहती करण्याचा व देशमुख्या पटकाविण्याचा निरुपद्रवी उद्योग माहाराष्ट्रिकांनी चालविला होता आणि उत्तरेकडील साहसी क्षत्रियांनी ह्या वसाहतींच्या पाठोपाठ साम्राज्ये उभारण्याचा खटाटोप अंगिकारिला होता.

९६. शातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव इत्यादी उत्तरेकडील साहसी राज्यकर्त्यांनी दक्षिणेत जी साम्राज्ये उभारिली ती परकीय व अल्पसंख्याक परंतु संस्कृतीने वरचढ अशा लोकांनी कमतरसंस्कृतीच्या माहाराष्ट्रिकांवर उभारलेली अधिराज्ये होती हे लक्षात ठेविले पाहिजे. ह्या परकीय अल्पसंख्याक राजकर्त्यांचे गुण उचलण्याची ऐपत किंवा बुध्दी माहाराष्ट्रिकांच्या ठाई अत्यल्प होती, किंबहुना मुळीच नव्हती म्हटली असता चालेल. शातवाहनांचे विहार, चालुक्यांची व यादवांची सुंदर देवालये व राष्ट्रकूटांची लेणी ह्या परकीय राज्यकर्त्यांच्या राशियतीतील स्थापत्यकलाविषयक प्रावीण्याची साक्ष देतात. फर्दापूर व दौलताबाद येथीलमूर्तिकर्म व चित्रकर्म ह्या राज्यकर्त्यांच्या वेळच्या अद्भुत कारागिरीची मूर्तिंमंत स्मारके आहेत. पण, ह्या परकीय स्थापत्यकलेचा, मूर्तिकर्माचा किंवा चित्रकलेचा गंधही माहाराष्ट्रिकांना कधी शिवलेला दिसत नाही. हे परकीय राज्यकर्ते अस्तंगत झाल्याबरोबर त्यांच्या कलाही त्यांच्या बरोबर अस्तास गेल्या.