प्रस्तावना

हुकमाप्रमाणे खानजमान १५५८ च्या ज्येष्ठात नगराहून भर बरसातीच्या प्रारंभी जुन्नरास गेला व किल्ल्याला वेढा घालण्यास लोक ठेवून त्याने स्वत: पुण्याचा रस्ता धरला. मध्ये घोड, भीमा, भामा, इंद्रायणी इत्यादी पावसाळ्यात पाण्याने फुगणा-या नद्या आहेत. पैकी घोडनदीस पूर आल्यामुळे तेथे त्याला महिनाभर चिखलात मुक्काम करावा लागला. नंतर श्रावणात लोहगावास आल्यावर तेथे त्याला कळले की, शहाजी सिंहगडाखाली सुखाने मुक्काम करून आहे व त्याच्या आपल्यामध्ये अनेक नद्या व नाले श्रावणझडीने तुडुंब भरून गेले आहेत. अश्या स्थितीत काय करावे हे त्याला सुचेना. शहाजीच्या पाठीमागे धावत जाणे शक्य नव्हते व पावसात स्वस्थ भिजत राहणे सह्य नव्हते. तेव्हा रणदुल्लाखान, आदिलशहाकडून त्याच्या मदतीस आलेला, काय करतो ते पाहाण्याकडे त्याचे डोळे लागले. रणदुल्लाच्या मध्यस्थीने शहाजी शरण थोडाच येतो! किल्ले निमूटपणे जमान ह्न (मराठे लोकन चाल करून जमाल उच्चार करतात, बहुश: रात्री लावण्या म्हणून करमणूक करताना हमाल या शब्दाशी प्रास जुळविण्याकरिता) च्या हवाली करण्याचे सोडून, तो द्वाड मराठा सह्याद्री उतरून कुंभ्याच्या घाटाने कोकणात उतरला. कोकणात उतरला अशी बातमी जमानास लागत व जमान कोकणात जाण्याला रस्ता सुधारतो तो दुसरी बातमी आली की, शहाजी पुन: वरघाटी परत आला. बहुश: शहाजीकडील मुत्सद्यांनी जमानला फसविण्याकरिता उठविलेली शहाजी गेल्याआल्याची ही केवळ हूल असावी. जमानने ती खरी मानून आपल्या रिपोर्टात पातशहाला कळविली व त्या रिपोर्टावरून दरबारी दफातकारांनी ती नमूद करून ठेविली. दंडाराजपुरीस शहाजी आश्रय मागण्यास गेला होता, ही तर निव्वळ गप्प दिसते. तेथे आश्रय कोणापाशी मागावायचा? पातशाही शिद्यापाशी? शिवाय, दंडाराजपुरीस लपून राहून, माहुलीत बसलेल्या मासाहेबाची व मूर्तिजाची काय वाट? तेव्हा ह्या सर्व गप्पा होत. खेरीज, सह्याद्रीभोवती रंगण घालावयाला लावून, जमानला आपण दमवून घामाघू करून टाकू ही शहाजीला खात्री होती. सबब, लपण्याचे किंवा पळून जाण्याचे त्याला कोणतेच समर्पक प्रयोजन नव्हते. जमानचा रोख कोणीकडे आहे हे शहाजी जाणून होता. ज्याच्या नावावर व ज्याच्या जिवावर शहाजीने निजामशाहीचे छत्र पुन: उभारले तो मूर्तिजा निजामशहा जमानच्या कोंकणातील सफरीचा विषय होता. करता, कुंभ्याच्या घाटाने कोंकणात उतरून, जमान खोपवलीच्या रानातून पुढे येतो न येतो तो त्याला उजव्या बाजूस टाकून पाल, जांबूळपाडा, खालापूर, कल्याण ह्या रस्त्याने शहाजी मुरंजनास पोहोचला. शहाजी गोंधळला किंवा गडबडला बिलकुल नाही. उलट जमानचा डाव त्याने शिताफीने हुकविला. शहाजीच्या अगोदर जमान माहुलीला पोहोचता व मूर्तिजाला पकडता तर शहाजीच्या सामर्थ्याची मुख्य अधिदेवताच शत्रूच्या हाती पडती व त्याला चुकूनही कोणी न पुसते. असली ढोबळ व अक्षम्य चुकी करणारा शहाजी नव्हता. जमानच्या दुप्पट वळण घेऊन शहाजी जमानच्या निमपट वेळात माहुलीस जाऊन पोहोचला, यात त्याचे व त्याच्या मावळी सैन्याचे गतिकौशल्य व्यक्त होते. माहुलीत शिरल्यावर शहाजी जमानचा बाप होऊन बसला. जमानने किल्ल्याच्या वाटा बंद केल्या. काही परिणाम होईना. उलट जमानला व जमानच्या लोकांना पावसात, चिखलात व तापसराईत खितपत मात्र पडावे लागले.