प्रस्तावना
शालिवाहन, शाकवाहन, शातकर्णी व शातवाहन, या चार शब्दांवरून खालील बाबी निष्पन्न होतात : १) आंध्रभृत्य राजे साळींचे तांदूळ खाणारे होते. २) आळ्वादींच्या भाज्या खाणारे होते, ३) कलिंग किंवा आंध्र देशातील मूळचे होते, ४) त्यांच्या बैलांचे कान खुणे खातर चिरडलेले असत, व ५) मूळचे आंध्रभृत्य राजे शेतकरी, कुंभार, वगैरे खालच्या वर्गापैकी होते. शालिवाहन राजाचा कुंभाराशी असलेला संबंध शालिवाहनाच्या मराठी बखरीत वर्णिलेला सर्वप्रसिध्दच आहे.
आता आंध्र, आंध्रजातीय व आंध्रभृत्य या शब्दांचा अर्थ लावू. शातवाहन राजे मूळचे पैठणचे पेटेनिक ऊर्फ प्रप्तिष्ठानकनिवासी नव्हेत. मूळचे आंध्रदेशातील होत, याबद्दल वाद नाही. पुराणातून यांना आंध्र व आंध्रजातीय म्हटलेले आहे, तेही ठीकच आहे. आंध्रदेशातील फारा दिवसांचे रहिवाशी यादृष्टीने देशावरून शातवाहन राजांना आंध्र हे नाव पडावे हे संयुक्तिक दिसते. आंध्रदेशात पुष्कळ दिवस पिढयानपिढया राहिल्यावरून आंध्र हे नाव यद्यपि पडले असले, तत्रापि शातवाहन राजे मूळचे कोणत्या जातीचे होते, या बाबीचा निर्णय तेवढया वरून कायमचा होत नाही. आंध्र या शब्दाचेदोन अर्थ आहेत. १) आंध्रदेशात असलेले जे मूळचे भौम ऊर्फ भूमिज अनार्य आंध्र ते लोक आंध्र या संज्ञेने ओळखिले जात हा एक अर्थ आणि आंध्रदेशात जेते म्हणून वसती करावयाला जे आर्य लोक गेले त्यांचा निवास त्या अनार्य देशात फारकाल झाला म्हणून त्या आर्यांनात्या देशावरून आंध्र हे नाव पडले, असा दुसरा अर्थ. म्हणजे आंध्रदेशात १) आर्य आंध्र व २) अनार्य आंध्र, असे दोन प्रकारचे लोक असत, अशी निष्पत्ती होते. पैकी शातवाहन राजे अनार्य आंध्रांपैकी होते किंवा आर्य आंध्रांपैकी होते? या शंकेचे निवारण करण्यास एक साधन आहे. यांची पाचपंचवीस नावे पुराणातून व शिलालेखांतून व नाण्यांवर दिलेली उपलब्ध आहेत. ही नावे आर्यभाषेतील आहेत किंवा अनार्यभाषेतील आहेत. शातवाहनांची एकोनएक स्त्रीपुरुषनामे आर्य जी संस्कृत भाषा किंवा प्राकृत भाषा ती पैकी आहेत. तेव्हा उघडच झाले की शातवाहनराजे आर्ध आंध्र होते. ते अनार्य आंध्रभाषा बोलत नसत, आर्य प्राकृत भाषा बोलत. आंध्रभृत्यांच्या कारकीर्दीत माहाराष्ट्री नावाची जी प्राकृत ती अत्यंत उदयास आली, हे सर्वामान्य आहे. एणेप्रमाणे शातवाहनांना लाविलेल्या आंध्र व आंध्रजातीय या नावाची उपपत्ती निर्णीत झाली. आता आंध्रभृत्य या शब्दाचा अर्थ काय तो पाहू. आंध्रांचे भृत्य ते आंध्रभृत्य, असा उघडउघड समास सोडविता येतो. एथं असे प्रश्न उद्भवतात की १) ज्यांचे भृत्य शातवाहन राजे होते ते आंध्र कोण?, २) स्वत: शातवाहन जर आंध्र होते तर त्याहून निराळे असे हे त्यांचे धनी दुसरे आंध्र कोण? व ३) भृत्य या शब्दाचा खरा अर्थ काय? पैकी तिसरा प्रश्न प्रथमविचारात घेऊ व तदनुषंगाने इतर दोन्ही प्रश्नांचा निर्वाह करू. भृ धातूला क्यप् लागून भृत्य हा शब्द साधतो. क्यप् कर्तरी असतो किंवा कर्मणी असतो. सूर्य हा शब्द सृ धातूला कर्तरी क्यप् लागून झालेला आहे. स्तुत्य हा शब्द स्तु धातूला कर्मणी क्यप् लागून झालेला आहे. भृ धातूला हे दोन्ही क्यप् लागतात. कर्मणी क्यप् लागून झालेल्या भृत्य: या शब्दाचा अर्थ भ्रियते इति भर्तव्य: असा होतो. कर्तरी क्यप् लागून झालेल्या भृत्य: या शब्दाचा अर्थ भरति इति भृत्य: असा होतो. भृ म्हणजे धारण करणे. भृत्य म्हणजे धारण करणारा. आंध्रभृत्य म्हणजे आंध्रांना भरण करणारा, धारण करणारा, साह्य करणारा, रक्षण करणारा.