प्रस्तावना
आंध्र म्हणून कोणी आंध्रदेशीय राजे होते किंवा आंध्र हे राष्ट्र होते, त्या आंध्र राजांना किंवा राष्ट्राला किंवा लोकांना साह्य करून रक्षण करणारे जे ते आंध्रभृत्य. शुंगभृत्य या शब्दाचाही अर्थ शुंगाचे सेवक असा कर्मणी करण्यात सौरस्य नाही, शुंगाचे साह्य करणारे, शुंगाचे भरण, धारण, रक्षण करणारे असा कर्तरी अर्थ करण्यात स्वारस्य आहे. काण्वायनांनी शुंगांचे साह्य करून व रक्षण करून, नंतर त्या दुर्बल शुंगांचे राष्ट्र आपणच स्वत: चालविले. तसेच आंध्रांचे साह्य व रक्षण करून शातवाहनांनी त्या दुर्बल आंध्रांचे राष्ट्र आपणच स्वत: चालविले. तात्पर्य, आंध्रभृत्यांच्या म्हणजे शातवाहनांच्या अगोदर आंध्रदेशावर कोणी आंध्र आर्य किंवा अनार्य राजे होते ते दुर्बल झाले, तेव्हा आर्य जे शातवाहन त्या आर्य आंध्रांनी दुर्बल आर्य किंवा अनार्य आंध्रांचे राज्य व राष्ट्र आपण स्वत: चालविले. असा एकंदर इतिहास दिसतो. पुढे या आंध्रभृत्य म्हणजे आंध्रांचे राष्ट्र रक्षण करणाऱ्या शातवाहनांनी पूर्वेकडील आंध्रदेशापासून पश्चिमेकडील अपरांतादि सर्व देश जिंकून मोठे विस्तीर्ण साम्राज्य स्थापन केले. आंध्र, आंध्रजातीय, आंध्रभृत्य, शालिवाहन, शाकवाहन, शातवाहन, शातकर्णी, इत्यादी शब्दांची मीमांसा ही अशी बरीच विपुल माहिती देणारी आहे. पुराणातून व शिलालेखातून व नाण्यावरून जी आंध्रभृत्यांची पाच पंचवीस नावे उपलब्ध झालेली आहेत, शेवलकुरस व विळिवायकुरस ही दोन सुध्दा. ती सर्व संस्कृत किंवा संस्कृतभ्रष्ट प्राकृत आहेत, ही बाब लक्षात घेतली म्हणजे या शातवाहनांचा राजवंश वंशाने व भाषेने आर्य होता असे म्हणावे लागते. इतकेच की हा राजवंश क्षत्रियवर्णाचा नसून शेतकरी, कुंभार इत्यादी कनिष्ठवर्णाचा होता. ब्राह्मणकन्या व नागपुरुष यांच्या पासून ह्या राजवंशाची उत्पत्ति झाली, अशी ही आख्यायिका आहे. कोणतीही लोककथा स्वीकारली. तत्रापि एवढे निश्चित आहे की हा शातवाहन राजवंश माहाराष्ट्रिकांप्रमाणे क्षत्रिय नव्हता. नाणेघाटातील भित्तिचित्राखाली शातवाहन राजांनी महारठिगनकयिरोचा स्वतंत्र उल्लेख का केला ते आता स्पष्ट उलगडते. शातवाहन राजे वंशाने शूद्रसम व देशाने आंध्र होते व माहाराष्ट्रिक लोक वंशाने क्षत्रिय व देशाने दंडकारण्यक होते.
शाकवाहन शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे. मूळशब्द शक्रवाहन. त्याचा अपभ्रंश सक्कवाहण. सक्कवाहणाचे साकवाहण. त्याचे अज्ञानाने पुन:संस्कृतीकरण शाकवाहन. शक्रस्वामिकं वाहनं शक्रवाहनं. सकवाहनं येषां चिन्हं ते शक्रवाहना:। शक्रवाहन हे आंध्रभृत्यांचे मूळ आडनाव होते, असा ह्या निरुक्तीचा अर्थ होतो.
शाकवाहनवंशात गौतमीपुत्र, वासिष्टीपुत्र इत्यादी नावे मातेच्या नावावरून पडलेली स्पष्ट आहेत. त्याअर्थी मातृवंशपध्दती ह्या शातवाहनवंशात प्रचलित होती असे म्हणता येते. माहाराष्ट्रिकांत मातृवंशपध्दती नव्हती. शातवाहन माहाराष्ट्रिक नव्हते, या विधानाला हे एक आणिक पोषक कारण उपलब्ध होते.