प्रस्तावना
कात्यायनकालीन हे शाकपार्थिव ऊर्फ भाजीखाऊ म्हणून सर्वतोमुखी प्रसिध्द झालेले राजे कोण. ज्या देशात साळीचे भात खूप पिकते व जेथील लोक भाताला तोंडी लावणे भाजीचे सडकून घेतात त्या देशातील हे राजे असावेत. असे देश कात्यायनकालीन म्हटले म्हणजे पूर्वसमुद्राकडील कलिंग व आंध्र हे देश संभवतात. कलिंगदेशचा राजा खारवेल शकपूर्व २४१ ऊर्फ ख्रिस्तपूर्व १६३ च्या सुमारास झाला. शकपूर्व ४०० च्या सुमारास झालेल्या कात्यायनाच्या काली कलिंगदेशात खारवेलाचे पूर्वज हयात असावेत किंवा खारवेलाच्या घराण्याच्या पूर्वीच्या घराण्याचे राजे हयात असावेत. ह्या कलिंगातील म्हणजे त्रिकलिंग किंवा तैलंगदेश म्हणून ज्याला संज्ञा पुढे पडली त्या संयुक्त देशाच्या एका भागातील राजांना त्यांच्या नित्याच्या भातभाजीच्या खाण्यावरून विनोदाने शाकपार्थिव हे नाव कात्यायनकाली रूढ झालेले असावे. तसेच खारवेल या कलिंगराजाने शातकर्णी नावाच्या आंध्रराजाला जिंकल्याचा उल्लेख हत्तिगुंफा येथील लेखात आलेला आहे. म्हणजे शातकर्णी नावाचा कोणी आंध्रराजा खारवेलाच्या समकालीन होता. ह्या शातकर्णीचे पूर्वज कोणी तरी राजे आंध्रदेशावर कात्यायनकाली हयात असावेत. आंध्रदेशातील लोक भात व भाजी खाण्याबद्दल प्रसिध्द आहेत. हीच प्रसिध्दी कात्यायनकाली तेथील राजासंबंधाने लोकांत असून विनोदाने त्या राजांना शाकपार्थिव हे नाव सर्वतोमुखी झालेले असावे. तात्पर्य, शाली व शाक खाण्याबद्दलची प्रसिध्दी कलिंग व आंध्र या देशातील राजांची कात्यायनकाली विशेष होती असे दिसते. मध्यदेशातील राजे प्राधान्याने घीशक्कर किंवा डाळरोटी किंवा शिरापुरी खाणारे असून तोंडी लावण्याला भजी किंवा चटणी थोडीशी घेत,आळ्वादींची भाजी किंवा चिंचेचे आंबट कढण किंवा तिखटाची भसकापुरी पाहून त्यांच्या अंगावर काटा उभा राही. सबब, मध्यदेशातील राजांचा व आंध्रकलिंगादिदेशातील राजांचा जेव्हा युध्दादि शत्रुमित्रभाव उत्पन्न झाला, तेव्हा शाकपार्थिव हा वैनोदिक शब्द निर्माण झाला. एणेप्रमाणे शाकपार्थिव हा शब्द विनोदाने शाकवाहन राजांना लावला जाऊ लागला. मूळचे त्यांचे आडनाव शाकवाहन म्हणजे 'भाजीची गाडी' हे होतेच. कदाचित् शाकपार्थिव हा समास शाकवाहनपार्थिव असा मूळचा असून, नंतर वाहन या मधमपदाचा लोप होऊन शाकपार्थिव असा बनला गेला असल्याचा बहुत संभव आहे. कोणताही संभव स्वीकारिला, तत्रापि भात व भाजी या वरून ह्या आंध्रजातीय राजांना शालिवाहन व शाकवाहन ही आडनावे पडलेली आहेत यात संशय नाही.
आता शातवाहन या तकारी शब्दाचा अर्थ लावू. शाता: वाहना: येषां ते शातवाहना:। शात म्हणजे तिखट आणि वाहन म्हणजे बैल किंवा घोडे. ज्यांचे गाडीचे बैल किंवा घोडे तिखट किंवा चलाख आहेत त्यांना शातवाहन म्हणत. शालिवाहन व शाकवाहन या शब्दांनी भात व भाजी या पदार्थांशी संबंध येतो. शातवाहन या शब्दाचा संबंध बैल किंवा घोडे याशी येतो. मूळचे शातवाहन राजे बैलाच्या गाडयांनी आपल्या उदमाचा व्यवहार करीत असावेत, असा अर्थ शातवाहन या शब्दापासून निघतो.
बहुश: हे राजे मूळचे शेतकरी, कुंभार वगैरे असावेत. या राजांच्या अनेक आडनावात व विशेषनावात शातकर्णी हाही शब्द येतो. शात: कर्णा: येषां ते शातकर्णा:। कापलेले आहेत ज्यांचे कान असे जे बैल त्यांनाशातकर्ण म्हणत. खुणे करता बैलांचे कान चिरफाडण्याची व कापण्याची चाल सध्याप्रमाणेच पुरातनकाली असे. जनावरांच्या कानांवर पाच व आठ ह्या आकडयांचे डाग देण्याची चाल ऋग्वेदकाला पासूनची आहे. तशीच जनावरांचे कान खुणे खातर चिरफाडण्याची चालही पुरातन असून, शातवाहनराजांच्या बट्टीतीलकिंवा गोठयातीलकिंवा पागेतील जनावरांचे कान चिरफाडण्याची चाल असे असे दिसते. त्यावरून शातकर्णी हे नाव शातवाहनकुलातील कित्येक राजांना पडलेले असावे. चिरफाडलेल्या कानांचे बैल ज्यांच्या जवळ आहेत ते शातकर्ण. शातकर्णाचे अपत्य शातकर्णी. ह्या कान कापण्याच्या दृष्टीने पहाता, शातवाहन शब्द शातकर्णवाहन असा मूळचा धरून, नंतर कर्ण या मध्यमपदाचा लोप करून कापलेले कान ज्यांचे आहेत असे बैल ज्यांचे आहेत ते राजे. हा अर्थ घेतला म्हणजे शात या शब्दाचा तीक्ष्ण, चलाख, हा अर्थ करण्याची जरूरी रहात नाही. शातवाहन व शातकर्ण व शातकर्णी या तिन्ही शब्दांचा अर्थ, चिरफाडलेले कान ज्यांचे आहेत असे बैल ज्या राजांजवळ प्रामुख्याने असत ते राजे, असा होतो व तो सर्वतो प्रकारे समीचीन दिसतो.