प्रस्तावना
३०. येथपर्यंत शहाजीच्या हालचालीचे जे वर्णन केले त्यात १५५१ पर्यंत शहाजीचा संबंध निजामशाहीशी व आदिलशाहीशी तेवढा आलेला आपल्यास दिसला. एथून पुढे शहाजीचा संबंध दिल्लीच्या मोंगलांशी पडत चालला. शक १५४८ त शहाजहान मलिकंबराच्या आश्रयास आला. तो जहांगीर पातशहाचा १५४९ च्या कार्तिकात मृत्यू होईतोपर्यंत महाबतखानासह दक्षिणेसच माशा मारीत रिकामा बसला होता. १५४९ च्या पौषात तो दिल्लीस गेला व माघात राज्याभिषेक झाला. किंचित स्थिरस्थावर झाल्यावर दक्षिणच्या बंदोबस्ताचा विचार शहाजहानच्या मनात येतो न येतो इतक्यात त्याच्याविरुध्द खान जहान लोदी याने बंड पुकारले व दक्षिणेचा रस्ता शक १५५० च्या हिवाळ्यात धरला. लोदीने दक्षिणचा आश्रय धरण्याचे कारण असे होते की, जहांगीरच्या राशियतीत त्याची नोकरी दक्षिणेतच विशेष झाली असून मलिकंबराशी व आदिलशाहीतील कारभा-यांशी त्याचा स्नेहच नव्हे तर घरोबा जडला होता. दक्षिणेत असताना मोंगलाच्या कचाटीतून निजामशाही प्रांत सोडविण्याच्या कामी मलिकंबराला त्याने अंतस्थ मदत करून निजामशाहीतील मुत्सद्यांना व लढवय्यांना ऋणी करून ठेविले होते. बंड करून दक्षिणेत येण्यात त्याचा मतलब असा होता की, दक्षिणेतील निजामशहा, आदिलशहा व शहाजी या सर्वांना शहाजहानाविरुद्ध उठवून खुद्द दिल्लीचे तख्त उलथून पाडावे. हा इरादा मनात धरून लोदी दक्षिणेत येतो तो दौलताबादेत एक लहानशी क्रांति होत असलेली त्याच्या दृष्टीस आली. आदिलशहाशी मिळून फतेखानाने धारूरची मोहीम हुकविली व मोंगलांशी मिळून निजामशाही बुडविण्याचा फतेखानाचा विचार आहे, असा संशय हमीदखानाच्या कानगोष्टीवरून मूर्तिजा शहाच्या मनात येऊन, फतेखान नजरकैदेत पडलेला लोदीला दिसला. पुढे ब-हाणपूरच्या मोंगल सुभेदाराला फितूर होऊन लखुजी जाधवरावही मिळणार असा संशय मूर्तिजाला आला व त्या संशयाच्या भरात शक १५५१ च्या श्रावणी पूर्णिमेस लखुजीचा व त्याचा मुलगा अचलोजी याचा त्याने खून करविला. ह्या मूर्ख कृत्याचा परिणाम असा झाला की, लखुजीचा भाऊ उघडपणे मोंगलास मिळाला. ह्याहूनही दुसरा अनिष्ट परिणाम असा झाला की, परंडा प्रांतात रहाणारा लखुजीचा जावई जो शहाजीराजे त्याने निजामशहावर स्वारी करून पुणे व संगमनेर हे निजामशाहीतील पश्चिमेकडील प्रांत जप्त केले व स्वतंत्र राजाप्रमाणे तो नांदू लागला (शक १५५१ आश्विन). जाधवरावाचा व शहाजीचा यद्यपि बेबनाव होता, तत्रापि त्याचा खून झालेला शहाजीला व त्याची बायको जिजाबाई हिला स्वस्थ बसून पहावेना. सास-याचा खून म्हणून शहाजीने व बापाचा खून म्हणून जिजाबाईने सूड उगविण्याच्या इराद्याने निजामशहावर स्वारी केली. आदिलशाही दरबारावर जाधवरावाच्या खुनाचा व शहाजीच्या स्वारीचा निराळाच परिणाम झाला. शहाजी निजामशाही गारत करून आपणच एखादे स्वतंत्र राज्य स्थापील, अशी भीती आदिलशाही मुत्सद्यांना पडली. सबब, वेळीच काटा काढून टाकण्याच्या हेतूने त्यांनी शहाजीवर मुरार जगदेव यास पाठविले. अशा या दंगलीत कोणाचा आश्रय करावा, ह्या विवंचनेने खानजहान लोदी यास घेरले. मूर्तिजा तर बोलून चालून अर्धवट, खुनी व दुर्बल आणि आदिलशहाचे सूत्र मोंगलाकडे लागलेले तेव्हा शहाजीचा आश्रय करण्यावाचून अन्य गती लोदीस राहिली नाही. तो संगमनेरास शहाजीला येऊन मिळाला. शहाजीने १५५१ च्या आश्विनापासून १५५२ च्या वैशाखापर्यंत जुन्नर व संगमनेरपासून अहमदनगर व दौलताबादपर्यंतचा सर्व मुलूख व बालेघाटाजवळील सर्व प्रांत काबीज करून, बहुतेक सर्व निजामशाही आटोपिली. फक्त राजधानी व पूर्वेकडील प्रांत तेवढा मूर्तिजाच्या हाती राहिला. लोदीच्या साह्याने शहाजीचा हा आक्रम पाहून आदिलशहाचे व शहाजहानचे धाबे दणाणले. शहाजीने बहुतेक सारी निजामशाही हाताखाली घातली इतकेच नव्हे, तर भीमगड म्हणून एक मोडकळीस आलेला जुना किल्ला होता तो दुरुस्त करून व त्याचे नाव आपल्या नावावरून शाहगड असे ठेवून त्या गडावर आपले मुख्य ठाणे केले.