प्रस्तावना
दक्षिणेत एक नवीन स्वतंत्र राज्य स्थापिले गेले असा ह्या कृत्याचा अर्थ झाला. तेव्हा शहाजहान स्वत: शक १५५१ च्या शेवटी ब-हाणपुरास आला, त्याचा व आदिलशहाचा लोदीला आश्रय न देण्याचा तह ठरला आणि आदिलशहाने लोदीला आश्रय देणा-या शहाजीच्या पुणे प्रांतावर मुरार जगदेव यास पाठविले. शहाजहानाने आल्याबरोबर पहिली मसलत अशी केली की, शहाजीला लोदी पक्षातून फोडिले. दिल्लीपतीशी सामना करण्याची अद्याप आपली ऐपत नाही व शहागडास आपण उभारलेला डोलारा औट घटकाही टिकणार नाही, हे धूर्त शहाजी जाणून होता. करता शहाजहानचे बोलणे मान्य करून शहाजीने लोदीला निरोप दिला आणि आपण स्वत: दिल्लीश्वराचा मनसबदार बनून मिळविलेला प्रांत दाबून बसला. पातशाही मनसबदारी पत्करण्यात शहाजीचा एक हेतू असा होता की, आदिलशाही मुत्सद्यांच्या हातून आपणास इजा होऊ नये व दुसरा हेतू असा होता की, आपल्या जहागिरीवर निजामशहाने हक्क सांगू नये. पातशाही पंचहजारी सरदारी पत्करण्याचा अर्थच असा होतो की, शहाजीच्या ताब्यातील मुलूख मोंगलाईचा अंश झाला. लढाई केल्यावाचून निजामशाही प्रांत फुकटाफाकट मिळाला व एक उपद्व्यापी लढवय्या गप्प बसविता आला, अशी फुशारकी शहाजहानला वाटली. पुढे मागे हा तह इष्ट वाटेल तेव्हा मोडता येईल असा अंतस्थ मनोदय शहाजी व शहाजहान या दोघांचाही होता. हा तह झाल्यावर आदिलशाही मुत्सद्दी शहाजीच्या वाटेस गेले नाहीत. मुरारपंताने आपला मोर्चा शहाजीवरून काढून निजामशहाच्या कोकण प्रांताकडे वळविला आणि दळवी व मोरे या सरदारांस कोकण प्रांतातील निजामशाही अंमलदारास हुसकून देण्यास सांगितले. शहाजी संगमनेरादी प्रांत दाबून बसला व आदिलशहाने कोकण प्रांत गिळंकृत करण्याचा घाट घातला, तो इकडे शहाजहानाने धारूरपर्यंतचा निजामशाही प्रांत आक्रमिण्याचा विचार केला. असे तिन्ही बाजूंनी महामूर्ख मूर्तिजाच्या अंगाचे तीन हिंस्र श्वापदांनी तीन लचके तोडण्याची तयारी केली व काहींनी ती अंमलातही आणिली.