प्रस्तावना

२९. शहाजीराजे आदिलशाहीत निसटून गेल्यानंतर सहा महिन्यांनी शक १५४९ च्या आश्विनात इब्राहीम आदिलशहा वारला व त्याचा पंधरा वर्षांचा महमदशहा हा मुलगा मसनदीवर बसला. मलिकंबराच्या मृत्यूनंतर शक १५४८ पासून मलिकंबराचा पुत्र फतेखान याच्या हाती निजामशाही दौलतीची सूत्रे गेली. त्याने आपल्या बापाची आदिलशाहीवर स्वारी करण्याची मसलत पुढे चालवून, धारूरवर १५४९ च्या आश्विनात चाल केली. धारूरचा निजामशाही किल्ला इभ्राइम आदिलशहाने निजामशाहीच्या हलाखीत दाबला होता. तो सोडविणे भातवडीच्या व नवरसपूरच्या मोहिमेनंतर मलिकंबरास व त्याच्या मृत्यूनंतर फतेखानास इष्ट व सुलभ दिसले. परंतु फतेखानाचा हा अंदाज चुकला होता, ज्याच्या बळावर भातवडी व नवरसपूर येथील युद्धात निजामशहाला जय मिळाला तो सरदार म्हणजे शहाजी ह्या वेळी आदिलशहाला मिळाला होता. तेव्हा पारडे फिरून धारूरची ही मोहीम निजामशहाच्या अंगावर आली. प्रथम प्रथम निजामशहाला थोडाबहुत जय मिळाला, परंतु कंदरीकजोरी येथील खडाजंगी युद्धात निजामशहाकडील हमीदखान सरलष्कर ह्याचा शहाजीने पुरेपूर मोड केला आणि त्याला निजामशाही हद्दीत पिटाळून लाविले (१५४९ मार्गशीर्ष- पौष). ह्या अपयशाचे खापर हमीदखानाने फतेखानाच्या डोक्यावर फोडिले. फतेखान आपला मेव्हणा मुस्तफाखान याच्याद्वारा आदिलशहाला आतून सामील आहे असे मूर्तिजा निजामशहाच्या मनात हमीदखानाने भरविले. त्यामुळे संशयग्रस्त होऊन मूर्तिजाने फतेखानास कैद करून वजिरीवरून दूर केले (शक १५५०). कंदरीकजोरीच्या लढाईनंतर निजामशहाचा परंडा प्रांत काबीज करून शहाजी आदिलशहाच्या आश्रयाने त्या प्रांतावर सैन्यासुद्धा अंमल करू लागला. जाधवरावाच्या रेट्यामुळे जुन्नर, चाकण, पुणे इत्यादी प्रांतातून शहाजीचे पश्चिम निजामशाहीतून उच्चाटण झाले खरे, परंतु त्याचा सवाई वचपा त्याने दक्षिण निजामशाहीतील परंडा प्रांत घेऊन भरून काढिला. शक १५४३ त बापाच्या जहागिरीचे स्वामित्व मिळविल्यापासून शक १५५० त आदिलशहाच्या आश्रयाने परंडा प्रांतात दाखल होईपर्यंत जी सात वर्षे गेली त्यात शहाजीची बरीच स्थित्यंतरे झाली. प्रथम काही वर्षे मूर्तिजाची त्याच्यावर बहाल मर्जी होती. नंतर मलिकंबराच्या मत्सराने ती मर्जी खपा झाली. पुढे यागी होऊन तो जुन्नर-माहुली प्रांतात स्वतंत्र राहून आदिलशहाशी संबंध ठेवू लागला आणि शेवटी निजामशाही जहागीर गमावून आदिलशाही सरदार म्हणून परंडा प्रांतात अंमल करू लागला. ह्या अवधीत श्वशुर जाधवराव व त्याचे मुलगे, चुलत भाऊ खेळोजी, वजीर मलिकंबर व फतेखान, धनी मूर्तिजा या सर्वांशी वाकडे पडून, जिवलग बायकोचाही वियोग सहन करणे त्याच्या कपाळी आले. परंतु, एका वस्तुचा मात्र वियोग, कितीही संकटे आली तत्रापि त्याने होऊ दिला नाही. ती वस्तू म्हणजे जन्माची प्राणप्रिया त्याची सेना. मनुष्यमात्र म्हटले म्हणजे त्याला काहीतरी त्याच्या दृष्टीने सर्वोत्तम असे व्यसन असते. कोणी दारुबाज, कोणी अफूबाज, कोणी इष्कबाज, कोणी गप्पाबाज, कोणी कविताबाज, कोणी ब्रह्मासक्त, कोणी काही, कोणी काही, असे प्रत्येक मनुष्याला काहीतरी जन्मसिद्ध व्यसन असते. तसे शहाजीला सेनेचे व्यसन होते. सर्व काही गमावील, प्रसंगी प्राणही गमावील, पण सैन्य म्हणून कधीही हातचे जाऊन देणार नाही. शहाजी आपल्या सैन्याची व सैनिकांची इतकी पराकाष्टेची काळजी घेई की संकटसमयी इतर सर्व उद्योगांना गौणत्व देऊन, सैन्याच्या जोपासनेला व मशागतीला तो अनन्य प्राधान्य देई. शहाजीचा जसा सैन्यावर लोभ त्याप्रमाणेच सैनिकांचा सेनाध्यक्षांवर लोभ असे. एतत्संबंधाने बखरकार (शिवप्रताप पृष्ठ २४/२५) लिहितो की, अशा सरदाराच्या सेवेत देह गेला तरी बेहेत्तर अशी भावना सैनिकांची शहाजीविषयी असे. हाताखालील माणसांना भुरळ कशी पाडावी, त्यांची अंत:करणे कशी आकर्षण करावी, न होते कार्य इरेने त्यांच्याकडून कसे करून घ्यावे, ही कला शहाजीराजाच्या ठाई जन्मसिद्ध होती. त्यामुळे सारे जग उलटले तरी त्याच्या सैनिकांनी शहाजीला कधीही अंतर दिले नाही. जय होवो, प्रसंगी माघार घ्यावी लागो, सैन्याची श्रद्धा शहाजीराजाच्या ठाई अढळ असे. असे हे पाचसात हजार सैन्य घेऊन शहाजी परांडे प्रांतात शक १५४९ च्या वैशाखापासून शक १५५१ च्या श्रावणापर्यंत सैन्याची मशागत करीत व परिस्थितीचे अवलोकन करीत, हालचालीस योग्य अशा संधीची वाट पहात होता.