प्रस्तावना

आपण यातीचे क्षुद्र आहो, वृत्तीने वाणी आहो व आपल्या पूर्वजांनी रामदेवराव जाधवाच्या अमदानीत लढायात भाग घेतला होता, असे जे स्वत: तुकाराम व त्याचा कुळवट म्हणतो, त्याची आणि वरील विधानाची एकवाक्यता येणेप्रमाणे इतिहाससिद्ध आहे. शहाजीकाली सैन्यातून सामान्य शिपायांचा जो हजारोंनी भरणा होत असे तो ह्या सुप्रज व बहुप्रज कुणबी ऊर्फ कुलपती यांच्यातून होई. ह्या सामान्य शिपायांना मुत्सद्देगिरी, राजकारण इत्यादी बडा व्यवहार करण्याची ऐपत नसे, परंतु मोसमात शेतकाम करून, बाकीच्या काळात शिपाईगिरीवर पोट चालविण्याची धमक ह्या कुणबी लोकात उद्भवली होती. जो जास्त पोटगी देईल त्याची शिपाईगिरी करण्यास व त्याचा पाईक होण्यास हा वर्ग उत्सुक असे, मग तो धनी हिंदू असो की यवन असो, जुना असो की नवा असो, देव फोडणारा असो, की जोडणारा असो. शिपाईगिरीची धामधूम करून लढाऊ राज्ययंत्राचा अंश होणारा असा हा कुणबी वर्ग त्या काळी महाराष्ट्रात होता. कशाकरता लढावयाचे व कदाचित लढून मरावयाचे तर केवळ पोटाकरिता, अशातला हा वर्ग होता. ह्या वर्गाच्या वरचा वर्ग म्हणजे क्षत्रिय जे मराठे त्यांचा. मराठ्यात दोन धंदे करणारे लोक होते. देशमुख्या, पाटिलक्या, चौगुलक्या, मोकदम्या, पटवा-या, मोकाश्या वगैरे करणारा वृत्तिवंत मराठ्यांचा पहिला वर्ग आणि केवळ शेतकीवर निर्वाह करणा-या गरीब मराठ्यांचा दुसरा वर्ग. हा दुसरा वर्ग आपणाला मराठा कुणबी म्हणून म्हणवी. क्षुद्र कुणबी निराळा आणि मराठी कुणबी निराळा. क्षुद्र कुणबी फावल्या वेळात सामान्य पाइकी करी आणि मराठा कुणबी, पाटील, देशमुख इत्यादी लोक हवालदारपासून सरलष्करपर्यंतच्या लहानमोठ्या हुद्देदा-या करी. क्षुद्राप्रमाणेच ह्यांनाही मुसलमान किंवा हिंदू असा वाटेल तो धनी चाले. एक भाऊ पातशाही नोकर व एक भाऊ शिवशाही नोकर असली उदाहरणे महाराष्ट्राच्या इतिहासात शेकडो आहेत. तात्पर्य, क्षुद्राप्रमाणेच ह्या मराठे लोकातही स्वराज्य व स्वराष्ट्र यांचा नि:सीम अभिमान बाळगिणारे लोक शहाजीकाळी फार विरळा असत. तात्पर्य एतत्कालीन मराठे केवळ आयुधोपजीवी गण बनले होते व स्वराष्ट्रसंरक्षक क्षत्रियत्वाचे वारे त्यांच्यातून लुप्त झाले होते. क्षत्रिय जे मराठे त्यांच्याप्रमाणेच ब्राह्मणाचीही दशा होती. मुसलमान किंवा हिंदू अशा वाटेल त्या धन्याची सेवा करण्यात हे सारखेच राजी असत. मराठे व ब्राह्मण यांना यवनाची सेवा मनापासून आवडत असे, असा मात्र ह्या राजीपणाचा अर्थ केल्यास ती चूक होईल. अनन्यगतिक म्हणून हे लोक यवनसेवा पत्करीत.