प्रस्तावना
स्वतंत्र हिंदुराज्य स्थापण्याची शक्यता नसल्यामुळे, विजयानगरच्या राजघराण्याचा अस्त झाल्यावर, यवनसेवा केल्यावाचून ह्या लोकांना गत्यंतर राहिले नव्हते. स्वतंत्र हिंदूराज्य स्थापण्याची शक्यता ह्या मराठा किंवा ब्राह्मण लोकात नसण्याचे कारण असे होते की, मराठा क्षत्रिय व ब्राह्मण यांची लोकसंख्या क्षुद्र कुणब्यांच्या लोकसंख्येहून फारच कमी होती. सामान्यत: हजार पाचशे वस्तीच्या गावात एखाददुसरे ब्राह्मणाचे घर व एखाददुसरे पाटलाचे घर असे, म्हणजे दहा पाच ब्राह्मणांची व दहा पाच मराठ्यांची माणसे असत. कित्येक दहादहा पाचपाच गावांचे गट असे असत की त्या सा-यात मिळून एखादे ब्राह्मणाचे व दोन अडीच पाटलाची घरे असत. मिळून सर्व राष्ट्रात एका ब्राह्मणास दोन मराठे व पंचवीस कुणबी असे सरासरी प्रमाण पडे. ब्राह्मणात किंवा क्षत्रियात जो स्वराज्यविषयक किंवा स्वधर्मविषयकर् ईर्ष्या, आकांक्षा व अभिमान संभाव्य असे तो क्षुद्रात अद्याप जागृतही झाला नव्हता. निरवसितत्वातून अनिरवसितत्वात येऊन म्हणजे अस्पृश्यत्वातून स्पृश्यत्वात येऊन व वनचरत्वातून ग्रामचरत्वात नांदून पोटाकरिता कोणाची पाइकी करण्याइतकीच महत्वाकांक्षा शूद्रात उद्भवली होती, हिंदुत्वाकरिता, स्वधर्माकरिता व स्वराज्याकरिता हिंदुपक्षाच्या वतीनेच तेवढा लढेन, असे स्पृहणीय पक्षपातित्व क्षुद्रवर्गात अद्याप जन्मले नव्हते. त्यामुळे स्वतंत्र राज्याच्या उभारणीला मनुष्यबळाचा जो आत्मयज्ञपूर्वक निस्वार्थी पाठिंबा लागतो तो ब्राह्मणक्षत्रियांना नव्हता. ब्राह्मणक्षत्रियांना क्षुद्रांचे नि:स्वार्थी मनुष्यबळ नव्हते इतकेच नव्हे, तर स्वार्थी किंवा द्रव्यार्थी मनुष्यबळही पैदा करण्याचे सामर्थ्य तत्कालीन ब्राह्मणक्षत्रियांपाशी नव्हते. ब्राह्मण तर बोलूनचालून जातीचाच दरिद्री. तो द्रव्य देऊन मनुष्यबळ कसचा पैदा करणार? मराठ्यांचीही मुसलमानी अमलाच्या प्रथम प्रहरात तीच दुर्दशा होती. दहा पाच हजार पाईक पोशील किंवा पाच चार हजार बारगीर बाळगील, अशा तोलाचा मराठा क्षत्रिय शक तेराशेपासून शक १५०० पर्यंत एकही नव्हता. म्हणजे ब्राह्मण क्षत्रियांपाशी त्या काळी मनुष्यबलही नव्हते व द्रव्यबलही नव्हते. राहिले ज्ञानबल. ते त्या काळी निवृत्तीच्या पाठीमागे लागले होते. निवृत्तीच्या नदीवर गोव्याघ्र व हिंदूमुसलमान यांना सारखीच तृषा भागविता येत असे. तात्पर्य, स्वार्थी किंवा नि:स्वार्थी मनुष्यबल, द्रव्यबल व ज्ञानबल, या तिन्ही बलांचा अभाव ब्राह्मणक्षत्रियांच्या ठायी त्या काळी उत्कटत्वाने जाणवत असून, ते स्वत:च करू नये ती यवनाची सेवा पोटाची खाच भरण्याकरिता पत्करीत असत. असल्या हतभाग्यांना कोठला स्वधर्म व कोठले स्वराज्य! इतकी तीनशे वर्षे ते जिवंत राहिले हेच नशीब!